‘ते’ दोघं ठरले भाजपासाठी सुपरहिरो; शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

भाजपा कार्यलयावर हल्ला करणाऱ्या शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या प्रताप टूमकर आणि वैभव सावंत या भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजपतर्फे जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नंदू परब, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी आदींसह इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधा तील शिवसेनेच्या आंदोलनाचे पडसाद कल्याणात देखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी व शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यानी काल कल्याण पश्चिमेकडील भाजपच्या कल्याण शहर कार्यालयाला लक्ष करत दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी भाजपचे हे दोन पदाधिकारी त्याठिकाणी कार्यलयाच्या संरक्षणासाठी उपस्थित होते. व्हायरल व्हिडीओमध्ये त्या ठिकाणी आणखी दोन जण देखील दिसत होती. मात्र आक्रमक शिवसेनेच्या नेत्यांनी खिडकीवर दगड मारताच त्या दोघांनी काढता पाय घेतला. निघून जाणारे दोघे जण कोण होते ? याबाबत ठोस माहिती नाही. मात्र इतर दोन जन शिव्या आणि धक्काबुक्की झेलत त्याठिकाणी दिसत होते.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रताप टूमकर व वैभव सावंत या दोन्ही कार्यकर्त्यांचा भाजप जिल्हा कार्यलयात भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गायकवाड यांनी हा सत्कार नसून सन्मान असल्याची प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशाचा स्वातंत्र्य दिवस कितवा हे माहीत नसणं खूप मोठं दुर्दैव आहे. अतिशय खेदजनक बाब आहे आणि त्यावर फक्त प्रतिप्रश्न विचारला म्हणून केंद्रीय मंत्र्याला सूडबुद्धीने अटक करणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये धरून आहे. या घटनेवरून पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणे, तोडफोड करणे, मारहाण करणे या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका; एका कंपनीशी झाला सामंजस्य करार

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने क्रेडाय एमसीएचआय, कल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे.

महापालिकेच्या विकास आराखडयातील वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

   महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड( सुचक नाका) ते विठ्ठलवाडी , चक्की नाका ते मलंग रोड, चेतना नाका ते साकेत कॉलेज, नेतीवली नाका ते चक्की नाका, मूरबाड डायव्हर्शन रोड( दुर्गाडी ते प्रेम ऑटो), गांधारी रोड ( लाल चौकी ते गांधारी पुल), संतोषी माता रोड ( सहजानंद चौक ते इंदिरा नगर), बेतुरकरपाडा ते खडकपाडा, बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), बिर्ला कॉलेज ते चिकणघर, निक्की नगर ते माधव संकल्प, निक्की नगर मधील भोईर चौक, विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, कोलीवली रोड, विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी,काली मश्जिद ते चिकणघर, प्रेम ऑटो ते शहाड पूल, शहाड – मोहने रोड, वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड), ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, घारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजकांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड  कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, कोलीवली सर्कल, प्रांत ऑफिस वायले नगर चौक, टिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूकबेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिली आहे. यानंतर याबाबतचा करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि क्रेडाय एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, क्रेडाय एमसीएचआयचे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे