रस्त्याच्या अभावाने भिंतीवरून पलीकडे नेलं प्रेत; सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या गावातील घटना

अंत्यसंस्काराला जाताना मृतदेहाची परवड झालेला व्हीडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता. सदरचा व्हिडिओ कल्याण ग्रामीण भागातील रायते गावातील असल्याचे समोर आले आहे. देशातील सैनिक एका रस्त्यासाठी विनवणी करत प्रशासन केव्हा सक्रिय होईल याबाबत खंत व्यक्त करीत आहे.

ग्रामपंचायतीत कुठले निययोजन नसते? स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रहिवाश्याना मार्ग नसल्याने “इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’. या घटनेमुळे अशा काही काव्य पंक्ती आठवतात. वास्तव्यातही आणि प्रत्यक्षात मेल्यानंतरही काही व्यक्तींच्या आयुष्यातलं दुःख संपत नसल्याचे विदारक चित्र कल्याण तालुक्यातील रायते गावातील सुखदेव भोईर यांच्या अत्यंयात्रेने समोर आले आहे.

अरुणाचल प्रदेश मध्ये सीमेवर लढणाऱ्या योगेश घावट या जवानाने २०२० मध्ये निधन झालेल्या सुखदेव भोईर यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून रस्त्याबाबत चे वास्तव समोर आणले होते. 
सैनिक योगेश घावट यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून  प्रशासनाची चालढकल कशी असते याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान या व्हिडिओची सत्यता पडताळणी नंतर प्रकाश भोईर यांचे वडील सुखदेव भोईर यांची ही अंत्ययात्रा असल्याचे समोर आले. कल्याण तालुक्याच्या तहसीलदारांनी प्रस्तावित केलेल्या रस्त्याचा मार्गातील अडथळे दूर करून रहिवाश्यांच्या मागणी कडे लक्ष देण्याची अत्यावश्यकता या व्हायरल मधून दिसून येत आहे. या प्रश्नाला स्थानिक ग्रामपंचायत आणि सत्ता धारी  पक्षाने हातभार लावणे आवश्यक आहे नाही तर रस्त्याच्या अभावी होणारी विदारकता समोर येईल यात दुमत नाही. मी शहीद झालो तर माझी अंत्ययात्रा कुठून नेणार असा खडा सवाल देखील एका जवणाने प्रशासनाला विचारला आहे.

-रोशन उबाळे

कल्याण परिमंडळात लाखो ग्राहकांनी थकवली करोडो रूपयांची बिलं; महावितरणावर गुडघे टेकवण्याची वेळ

महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल ८ लाख ७९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी महावितरणला कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

धनंजय औंढेकर हे नुकतेच कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू झाले आहेत. यापूर्वी ते मुख्य कार्यालयातील देयके व वसुली विभागात मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. कल्याण परिमंडलातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रिडींग, वीजबिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत १ लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनमधील २ लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागाचा समावेश असलेल्या वसई मंडलात ३ लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे लाख १०३ कोटी ८२ लाख रुपयांची तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे भाग समाविष्ट असलेल्या पालघर मंडलात १ लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. 

यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी ७ लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे २ कोटी ८६ लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीचा समावेश आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे. 

महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे