मलंगगड भागात डोहात बुडून तरुणाचा मृत्यू; दीड महिन्यांत पाचवा बळी

मलंगगड भागातील कुशिवली नदीच्या डोहात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. मागील दीड महिन्यातील बुडून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. या अगोदर चार लोकांचा बळी गेला होता व त्यानंतर आता आणखी एकाला जलसमाधी मिळाली आहे.

डोंबिवली सागाव मधील हा तरुण या ठिकाणी विकेंड निमित्त पर्यटनासाठी आला होता. याचदरम्यान नदीपात्रात पाय घसरून त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने या तरुणाचा बुडून झाल्याचे सांगण्यात येते. विवेक मेहरा असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या एका मित्रासह या ठिकाणी आला होता. दोघेजण विकेंडचा आनंद घेण्यास आले होते मात्र त्यांचा हा आनंद दुःखात परिवर्तित झाला. डोहात बुडून या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. यानंतर हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे मलंगगड भागात या वर्षी मृत्यूंची शृंखला सुरू असल्याचे दिसत आहे. या अगोदर याच भागातील दोन स्थानिक नाबालिकांचा नेवाळी जवळील तलावात बुडून मृत्यू झाला होता. व त्यानंतर कल्याण पूर्वेतील दोन तरुणांचा बंधारा भागात बुडून मृत्यू झाला होता. या दोन घटनांत चार जणांनी प्राण गमावले होते. व त्यानंतर आज अशाचप्रकारची ही तिसरी घटना समोर आली आहे. यामुळे ही मालिका थांबवावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-संतोष दिवाडकर

दुर्बुद्धी सुचली आणि डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे रुळावर मांडली दगडं

डोंबिवली व ठाकुर्ली स्थानका दरम्यान गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे रुळावर कोणीतरी भरपूर दगड मांडून ठेवल्याचे सुरुवातीला निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हे दगड बाजूला केले. हे कृत्य कुणी केले याबाबत सुरुवातीला मात्र पोलिसांकडे कसलीही माहिती नव्हती.

गुरुवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास रेल्वेच्या ट्रॅकवर १५-२० दगड ठेवल्याचे आढळले होते. आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्तर यांनी घटनेचे परीक्षण केले. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीगार वापरून तांत्रिक शोध घेत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराच्या मदतीने डोक्यात दुर्बुद्धी आली म्हणून खोडसाळपणाने त्याने असे केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्याच्या या खेळामुळे मोठा अनर्थ देखील होऊ शकला असता. त्यामुळेच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू ठेवला असून दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. या अगोदर रेल्वेवर खोडसाळपणे दगडफेक केली जात होती मात्र आता चक्क रुळाखालची दगडीच रुळावर मांडल्याने खळबळ माजली आहे.

स्टेशन मास्तरांनी स्लॉ डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवली असल्याची माहिती दिली. यानंतर आम्ही आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्टर अशा सर्वांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रॅक खाली लहान मोठी दगडं असतात. असे १५-२० दगडं त्यावेळी ट्रॅकवर होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी तपासादरम्यान परिसरातील फुटेज काढल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतलं. हा आरोपी अल्पवयीन आहे. आता या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. इतर आरोपी सापडल्यास त्यांच्यावरही पुढील कारवाई करण्यात येईल.

– मुकेश ढगे (पोलीस निरीक्षक)

-संतोष दिवाडकर

लसीकरण केंद्रावर टोकनचा काळाबाजार? कमी टोकन देत असल्याचा नागरिकांचा आरोप

कोरोना पासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात राज्य सरकारने मुभा दिल्यानंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसींच्या तुलनेत कमी टोकन देत असल्याने लसींच्या टोकनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसींचा तुटवडा नेहमीच जाणवत असतो. आठवड्यातून केवळ २ ते ३ दिवसच लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. २७ गावांमध्ये असलेल्या पिसवली प्रभागात मोठी लोकसंख्या असून येथील नागरिकांच्या सोयीसाठी पेन्थोन स्कूल याठिकाणी शुक्रवारी लसीचे ३०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये २० डोस हे ऑनलाईन पद्धतीसाठी तर उर्वरित २८० डोस हे ऑफलाईन पद्धतीने नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. असे असतांना २०० नागरिकांना देखील लसीचे टोकन देण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी केला आहे.

      प्रत्येक लसीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या लसींच्या तुलनेत नागरिकांना कमी टोकन देण्यात येतात. तसेच स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त बाहेरील नागरिक देखील या लसीकरण केंद्रावर येत असल्याने स्थानिकांना मात्र लसीपासून वंचित रहावं लागत आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी विचारले असता काही डोस हे पालिका कर्मचाऱ्यांसाठी ठेवले असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण कार्यक्रम सुरु होऊन कित्येक महिन्यांचा कालवधी लोटला असतांना अद्यापही पालिका कर्मचारी लसीपासून वंचित कसे असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेने आधी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा उपरोधिक टोला देखील स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी लगावला आहे.

-कुणाल म्हात्रे

आता सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र असणार सुरु

ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरु राहतील. ही उपलब्ध सुविधा किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

वीजबिल भरणा केंद्रांसोबतच थकीत वीजबिल वसुलीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (फोन पे, पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत पालिकेने चढवला अतिधोकादायक इमारतींवर जेसीबी

पावसाळ्याच्या कालावधीत अतिधोकादायक इमारती कोसळून होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेञ अधिकारी यांना अतिधोकादायक इमारती निष्कासित करणेबाबतचे निर्देश यापूर्वीच दिले होते. त्यानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील महात्मा फुले रोडवरील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई आज सुरू करण्यात आली.

सुनंदा निवास ही इमारत तळ +2 मजल्याची असून 1974 साली बांधलेली होती. या इमारतीमध्ये 6 भाडेकरू आणि 3 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस 2018 पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्याचप्रमाणे चिंतामण बिल्डींग(तळ+2) ही 30 वर्षे जुनी असून त्यामध्ये 4 भाडेकरु आणि 2 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजावण्यात येत होती. सदर दोन्ही इमारतींमधील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन, रहिवास मुक्त करून आज निष्कासनाची कारवाई ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे 20 कर्मचारी/कामगार, 1 जेसीबी, 1 पोकलेन , महापालिकेचे पोलिस कर्मचारी व विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केली.

-कुणाल म्हात्रे