लाच घेताना कल्याणच्या तहसीलदारांना रंगेहात अटक; महसूल विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर ?

कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे आणि त्यांचे शिपाई मनोहर हरड यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. एकूण एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना ते जाळ्यात सापडले आहेत. या घटनेनंतर महसूल विभागात होत असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे असे दिसत आहे.

कल्याण तालुका वरप गावातील एका कंपनीचे जमिनीबाबतच्या हरकती वरील सुनावणीचे निकाल पत्रक देण्यासाठी तहसीलदार दीपक आकडे यांनी एक लाखाची मागणी केली होती. तर शिपाई मनोहर हरड व इतर स्टाफ करिता २० हजारांची मागणी २६ ऑगस्टला केली होती. या लाचेची रक्कम स्वीकारताना कल्याण तहसीलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड यांना ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्या टीमने रंगेहात सापळा रचून पकडले आहे. यावरून आज कल्याण महसूल विभागाला मोठा झटका लागल्याचे दिसून आले.

आज दुपारी पावणे एकच्या दरम्यान ही मोठी घटना घडली आहे. यावरून महसूल विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर नक्कीच आला आहे असे दिसते. याबाबत तहसीलदारांची अधिक चौकशी सुरू आहे. पुढे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील स्पष्ट होणार आहे. या संपुर्ण घटनेनंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

-संतोष दिवाडकर

मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिरात भाजपाचे शंखनाद आंदोलन

कोरोना निर्बंधांमुळे राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई जरी मरी मंदिर येथे भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे अशा घोषणा देत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथील मंदिराचे दार उघडत आत जाऊन पूजा अर्चा केली.

संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर -धार्मिक स्थळे बंद असे काळे चित्र उभे केले आहे. या काळ्या निर्णयाविरेधात आणि मंदिरे-धार्मिक स्थळे तातडीने उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्मांचार्य, साधु-संत, अनेक धार्मिक संघटना यांसह पुरोहित, फुल-प्रसाद विक्रेते एकत्र येत अध्यात्मिक समन्वयक आघाडी च्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे व आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कल्याण पूर्व मंडळाअंतर्गत जागृत देवस्थान तिसाई मंदिर, तिंसगांव, कल्याण पूर्व येथे टाळ, घंटा, शंख वाजवत ‘मंदिर हम खुलवायेंगे। धर्म को न्याय दिलायेंगे।। हा नारा देत मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, परिवहन समिती माजी सभापती सुभाष म्हस्के, ह.भ.प चंद्रकांत सांगळे महाराज, कल्याण पूर्व मंडल सरचिटणीस नितेश म्हात्रे, अरुण दिघे, संदीप तांबे, पांडुरंग भोसले, गुड्डू खान, नगरसेविका हेमलता पावशे, अॅड. राखी बारोद आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

-कुणाल म्हात्रे

वाहनं चोरणारा अल्पवयीन चोर अडकला कल्याण क्राईम ब्रांचच्या पिंजऱ्यात

शनिवार दि.२८ ऑगस्ट रोजी एक इसम डोंबिवली परिसरात एक चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला त्यांच्या गुप्त माहितगाराच्या मदतीने प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे क्लासिक हॉटेलच्या समोर मानपाडा रोड येथे सापळा रचला. आणि या सापळ्यात पिंजऱ्यात उंदीर फसावा तसा हा चोर अडकला.

या इसमास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने विक्रीसाठी आणलेली रिक्षा ही चोरीची असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्याचे वय १७ वर्षे असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याचबरोबर तो मुंब्रा येथे राहणारा असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. संशयित विधिसंघर्षीत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडुन तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. एकुण २,३०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याबरोबरच त्याच्यावर दाखल असल्याच्या गुन्ह्याची तपासणी केली असता एकूण सात गुन्हे ह्या आरोपीवर दाखल असून तीन गुन्हांची उकल कल्याण क्राइम ब्रांचने करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विधिसंघर्षीत बालकास कासावडवली पोलीस ठाणे येथे मुददेमालासह पुढील कायदेशीर कारवाई करिता ताब्यात देण्यात आले. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, दत्ताराम भोसले, मंगेश शिर्के, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

‘मनसे सोबत युती नुकसानकारक, हे मी भाजपाला सांगणार आहे’ – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये आले होते. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवास ते उपस्थित राहिले होते. यावर त्यांना मनसे आणि भाजपा युती बाबत माध्यमांकडून रिपाईची भूमिका काय असेल अशी विचारणा केली होती. त्यावेळी ही युती अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मनसेची भूमिका ही मराठी माणसाप्रति कट्टर आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मनसेशी युती करणे हे भाजपला परवडणारे नसून या युतीमुळे भाजपचे नुकसान होईल असा तर्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. जर मनसे सोबत युती करण्याचे विचार भाजपा कडून होत असेल तर मी युती न करण्याबाबत त्यांना सांगणार आहे. रिपाई असताना राज ठाकरेंच्या पक्षाची काही आवश्यकता नाही. मुंबईत इतर भाषिक लोक आहेत आणि त्यांचं समर्थन आमच्या युतीला आहे.

आगामी काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत देखील रिपाई भाजपा सोबतच असणार आहे. आमच्या पक्षाला जागावाटपात अधिकाधिक जागा मिळण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. असे आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर राज्यात शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं असाही दावा त्यांनी यावेळी केला.

-संतोष दिवाडकर