डोंबिवली व ठाकुर्ली स्थानका दरम्यान गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे रुळावर कोणीतरी भरपूर दगड मांडून ठेवल्याचे सुरुवातीला निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हे दगड बाजूला केले. हे कृत्य कुणी केले याबाबत सुरुवातीला मात्र पोलिसांकडे कसलीही माहिती नव्हती.
गुरुवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास रेल्वेच्या ट्रॅकवर १५-२० दगड ठेवल्याचे आढळले होते. आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्तर यांनी घटनेचे परीक्षण केले. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीगार वापरून तांत्रिक शोध घेत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराच्या मदतीने डोक्यात दुर्बुद्धी आली म्हणून खोडसाळपणाने त्याने असे केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्याच्या या खेळामुळे मोठा अनर्थ देखील होऊ शकला असता. त्यामुळेच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू ठेवला असून दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. या अगोदर रेल्वेवर खोडसाळपणे दगडफेक केली जात होती मात्र आता चक्क रुळाखालची दगडीच रुळावर मांडल्याने खळबळ माजली आहे.
स्टेशन मास्तरांनी स्लॉ डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवली असल्याची माहिती दिली. यानंतर आम्ही आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्टर अशा सर्वांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रॅक खाली लहान मोठी दगडं असतात. असे १५-२० दगडं त्यावेळी ट्रॅकवर होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी तपासादरम्यान परिसरातील फुटेज काढल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतलं. हा आरोपी अल्पवयीन आहे. आता या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. इतर आरोपी सापडल्यास त्यांच्यावरही पुढील कारवाई करण्यात येईल.
कोरोना पासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात राज्य सरकारने मुभा दिल्यानंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसींच्या तुलनेत कमी टोकन देत असल्याने लसींच्या टोकनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसींचा तुटवडा नेहमीच जाणवत असतो. आठवड्यातून केवळ २ ते ३ दिवसच लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. २७ गावांमध्ये असलेल्या पिसवली प्रभागात मोठी लोकसंख्या असून येथील नागरिकांच्या सोयीसाठी पेन्थोन स्कूल याठिकाणी शुक्रवारी लसीचे ३०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये २० डोस हे ऑनलाईन पद्धतीसाठी तर उर्वरित २८० डोस हे ऑफलाईन पद्धतीने नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. असे असतांना २०० नागरिकांना देखील लसीचे टोकन देण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी केला आहे.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या लसींच्या तुलनेत नागरिकांना कमी टोकन देण्यात येतात. तसेच स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त बाहेरील नागरिक देखील या लसीकरण केंद्रावर येत असल्याने स्थानिकांना मात्र लसीपासून वंचित रहावं लागत आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी विचारले असता काही डोस हे पालिका कर्मचाऱ्यांसाठी ठेवले असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण कार्यक्रम सुरु होऊन कित्येक महिन्यांचा कालवधी लोटला असतांना अद्यापही पालिका कर्मचारी लसीपासून वंचित कसे असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेने आधी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा उपरोधिक टोला देखील स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी लगावला आहे.
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरु राहतील. ही उपलब्ध सुविधा किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
वीजबिल भरणा केंद्रांसोबतच थकीत वीजबिल वसुलीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (फोन पे, पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत अतिधोकादायक इमारती कोसळून होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेञ अधिकारी यांना अतिधोकादायक इमारती निष्कासित करणेबाबतचे निर्देश यापूर्वीच दिले होते. त्यानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील महात्मा फुले रोडवरील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई आज सुरू करण्यात आली.
सुनंदा निवास ही इमारत तळ +2 मजल्याची असून 1974 साली बांधलेली होती. या इमारतीमध्ये 6 भाडेकरू आणि 3 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस 2018 पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्याचप्रमाणे चिंतामण बिल्डींग(तळ+2) ही 30 वर्षे जुनी असून त्यामध्ये 4 भाडेकरु आणि 2 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजावण्यात येत होती. सदर दोन्ही इमारतींमधील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन, रहिवास मुक्त करून आज निष्कासनाची कारवाई ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे 20 कर्मचारी/कामगार, 1 जेसीबी, 1 पोकलेन , महापालिकेचे पोलिस कर्मचारी व विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केली.
कल्याण नजीकच्या एनआरसी कंपनीतील बेरोजगार कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर कामगारांच्या शिष्टमंडळाने काही लोकप्रतिनिधींसह भेट घेऊन कामगारांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली.
या शिष्ठमंडळात कामगार प्रतिनिधी, युनियन पदाधिकारी, भूमी पुत्र कामगार संघर्ष समिती, महिला प्रतिनिधी तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हा निबंधक सहकारी संस्था, कामगार आयुक्त ठाणे, पीएफ़चे अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कामगारोच्या वतीने जे. सी. कटारिया, उदय चौधरी, अविनाश नाईक, सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, दासू ठोबरे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत माहिती दिली. यावेळी रामदास आठवले यांनी या कामगारांचे प्रश्न सोडविण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत अदानी उद्योग समूह यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन न्याय मिळण्याकामी सर्वं प्रकारचे आश्वासन दिले.
या बैठकीस माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, रामदास वळसे, अर्जुन पाटील, सुरेश पाटील, एस बी शुक्ला, संजय वाघमारे, फरीदा पठाण , राजेश त्रिपाठी, मछिंद्र दवचे यांच्यासह अन्य कामगारही उपस्थित होते.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कल्याण शहर मंडळ व मोहने टिटवाळा मंडळातील २७ ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, कोरोना योद्धे सन्मान, मोफत वह्या वाटप, अन्नधान्य वाटप, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, वृक्षारोपण, रुग्णांना फळ वाटप, स्वच्छता अभियान, ब्लॅंकेट वाटप, स्मशानभूमी स्वच्छता यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राणी लक्ष्मीबाई उद्यानात वृक्षारोपण व जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा प्रभाग ४ मध्ये श्याम मिरकुटे यांनी कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम, प्रभाग २ मध्ये हॉटेल मानसी येथे संजय कारभारी यांनी कोरोना योध्यांचा सन्मान, प्रभाग २७ मध्ये सचिन खेमा यांनी रुग्णांना फळ वाटप केले. प्रभाग ३२ सिद्धेश्वर आळी तर्फे राहुल भोईर यांनी भव्य रक्तदान शिबिर, प्रभाग २३ मधील फ्लॉवर वॅली येथे नीता देसले यांनी कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १८ मध्ये डॉ राजू राम यांच्यातर्फे कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १६ योगिधान मध्ये कल्पना पिल्ले यांनी कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १४ मध्ये प्रमोद घरत व रमेश कोनकर यांनी पाटील बालमंदिर शाळेत वाचनालयात पुस्तके भेट व कोरोना योद्धे सन्मान करण्यात आला.
प्रभाग १४ मोहने येथे श्रीकांत पाटील व विमला ताई भोसले यांनी वृक्षारोपण, अन्न धान्य वाटप, प्रभाग १३ मध्ये विवेक जाधव यांनी कोरोना योध्याना सन्मान, प्रभाग १२ मध्ये अनंता पाटील यांनी आदिवासींना अन्नधान्य वाटप व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ११ मध्ये विनायक भगत, हेमा गायकवाड, मुन्ना रईस व संदीप गायकवाड यांनी सफाई कामगार व डॉक्टरांचा सन्मान, मोहिली महिला मंडळातर्फे अरुणा शिंगोळे यांनी कार्यक्रम आयोजित केला. प्रभाग ९ मांडा पूर्व येथे उपेक्षा भोईर व शक्तीवान भोईर यांनी वृक्षारोपण व कोरोना योद्धे सन्मान तसेच बालिका आश्रम व अंकुर बालिका आश्रम येथे मदत केली.
प्रभाग ८ मांडा पश्चिम येथे विजय आव्हाड व तात्यासाहेब फड यांनी धान्य वाटप व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ७ आंबिवली येथे दशरथ पाटील, अनंता पाटील यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ७ आंबिवली येथे शशिकांत पाटील यांनी धान्य वाटप व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ६ अटाळी येथे नवनाथ पाटील, राजन पाटील यांनी ब्लॅंकेट वाटप, स्मशानभूमी स्वच्छता व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १५ शहाड येथे मोहन कोनकर यांनी कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग २ स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये प्रकाश पाटील यांनी कोरोना योद्धे शिक्षक व डॉक्टर यांचा सन्मान केला. प्रभाग ३५ बैलबाजार येथे कल्पेश जोशी यांनी कोरोना योद्धे सन्मान आयोजित केला या सर्व ठिकाणी नरेंद्र पवार यांनी भेट दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने मरगळ झटकत काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध नागरी प्रश्नावर महापालिका मुख्यालयात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक संतोष केणे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना काँग्रेस महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.
स्थानिक पातळीवर पक्षाचा कार्यक्रम नसल्याने कमकुवत असलेली काँगेस स्वबळावर लढून किती जागा निवडून घेऊन येईल या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात सेना राष्ट्रवादी बरोबर आघाडीत असलेली काँग्रेस कल्याण डोंबिवलीत मात्र स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत १२२ नगरसेवक असलेल्या महापालिकेत काँग्रेसचे फक्त ४ नगरसेवक निवडून आले होते.
महापालिकेत आयुक्तांना नागरी प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, माजी नगरसेवक रवी पाटील, कल्याण पूर्व अध्यक्ष शकील शेख आदी बरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरवस्था, अपुरा पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन कर, वाहतूक कोंडी, बी.एस.यु.पी घरे, कचोरे येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी, स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पा तसेच शहरातील वाढते प्रदूषण या बाबत निवेदन देण्यात आले आहे.
नागरिकांच्या भूमिकेत जाऊन काम करणे आवश्यक आणि त्यासाठी मनाची संवेदनशिलता व कमिटमेंन्ट हवी, सर्वांनी अशाप्रकारे एकत्र येवून काम केलं, तर काय होऊ शकतं याचं उत्कृष्ठ उदाहरण म्हणजेच डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालय होय, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले.
कोविडच्या पहिल्या लाटेत कोविड हॉस्पिटल ही संकल्पना सगळयांसाठी नविन होती, त्यामुळे डोंबिवली जिमखाना बॉस्केटबॉल मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी हे एक आश्चर्यच आहे. त्यामुळे ज्यांनी हे रुग्णालय उभारले त्यांचा सत्कार करणे अत्यावश्यक आहे. महापालिका कर्मचारी/अधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व महापालिकेला मदत करणारी डॉक्टर्स आर्मी यांनी झोकुन देवून केलेल्या कामामुळे महापालिकेला ” कोविड इन्हावेशन अवार्ड” सारखा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला, याचा उल्लेख आपल्या भाषणात करीत आयुक्तांनी कोविडसाठी मदत करणा-या सर्वांचेच आभार आपल्या भाषणात मानले.
आयुक्तांनी दाखविलेल्या आत्मविश्वासामुळे सर्वांनी मिळून आपत्तीतून निभावून नेलं आणि यापुढेही निभावून नेतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. तात्पुरत्या स्वरुपातील कोविड रुग्णालय उभारण्याचा अजिबात अनुभव नसतांना सर्वत्र पाहणी करुन, माहिती घेवून हे रुग्णालय उभारले, अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी दिली. जिमखाना कोविड रुग्णालय चालविणा-या ओमसाई केअरचे डॉ. साहिल शेख यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले.
डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयात प्रारंभी 122 बेडची संख्या उपलब्ध होती. त्यामध्ये 70 आयसीयू बेडस्, 3 डायलेसिस बेडस् आणि उर्वरित बेडस् ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. कोविडच्या दुस-या लाटेत कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढली. दरम्यानच्या काळात सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या पत्नी टाटा आमंत्रातील उत्कृष्ठ व विनामुल्य उपचाराअंती ब-या झाल्यामुळे विजय भोसले यांनी जिमखाना कोविड रुग्णांसाठी 10 बेडस्, 10 गादया व 10 उशांची उपलब्धता करुन दिली. त्यामुळे आता जिमखान्यामध्ये एकुण132 बेडस् रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
आतापर्यंत 3747 रुग्णांनी जिमखाना रुग्णालयात उपचार घेतले आहेत. जिमखाना कोविड रुग्णालय पूर्णपणे वातानुकुलित असून तिथे निगेटिव्ह प्रेशरची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच वातानुकुलनाची हवा रिसायकल न होता नविन हवेचा पुरवठा सतत होत असतो. सद्यस्थितीत एकुण 63 कोविड रुग्ण जिमखाना कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कोविड रुग्णालयात प्रामुख्याने क्रिटीकल पेशंट दाखल केले जात असून , डायलेसिसची उपलब्धता असल्याने नागरिकांची चांगली सुविधा उपलब्ध होत आहे.
डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालय वर्षपूर्ती निमित्त जिमखान्याचे सचिव महेंद्र मोकाशी, माजी अध्यक्ष दिपक मेजारी, ऑक्सिजन पुरवठादार भाऊ चौधरी, महापालिकेचे डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. समिर सरवणकर तसेच डॉ. प्रशांत पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिमखाना कोविड रुग्णालयासाठी सर्वत्तोपरी मदत करणा-या इतर संस्था इतकेच नव्हे तर या रुग्णालयात काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग/महापालिका अधिकारी वर्ग यांचा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आयुक्तांनी स्वतः सत्कार केल्यामुळे कोविडच्या बिकट कालावधीत रुग्णसेवा करणा-या कर्मचारी वर्गाच्या चेह-यावरील सार्थ अभिमान व आनंद द्विगुणित झालेला दिसून आला. या समयी अतिरीक्त आयुक्त सुनील पवार, डोंबिवली जिमखानाचे महेंद्र मोकाशी, उपायुक्त सुधाकर जगताप, उपायुक्त रामदास कोकरे, आयएमए कल्याणचे अध्यक्ष प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पाटील व्यास पीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिमखाना कोविड रुग्णालयाच्या मॅनेजर तथा उप अभियंता रोहिणी लोकरे यांनी केले.
अंत्यसंस्काराला जाताना मृतदेहाची परवड झालेला व्हीडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदरचा व्हिडिओ कल्याण ग्रामीण भागातील रायते गावातील असल्याचे समोर आले आहे. देशातील सैनिक एका रस्त्यासाठी विनवणी करत प्रशासन केव्हा सक्रिय होईल याबाबत खंत व्यक्त करीत आहे.
ग्रामपंचायतीत कुठले निययोजन नसते? स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रहिवाश्याना मार्ग नसल्याने “इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’. या घटनेमुळे अशा काही काव्य पंक्ती आठवतात. वास्तव्यातही आणि प्रत्यक्षात मेल्यानंतरही काही व्यक्तींच्या आयुष्यातलं दुःख संपत नसल्याचे विदारक चित्र कल्याण तालुक्यातील रायते गावातील सुखदेव भोईर यांच्या अत्यंयात्रेने समोर आले आहे.
अरुणाचल प्रदेश मध्ये सीमेवर लढणाऱ्या योगेश घावट या जवानाने २०२० मध्ये निधन झालेल्या सुखदेव भोईर यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून रस्त्याबाबत चे वास्तव समोर आणले होते. सैनिक योगेश घावट यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून प्रशासनाची चालढकल कशी असते याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान या व्हिडिओची सत्यता पडताळणी नंतर प्रकाश भोईर यांचे वडील सुखदेव भोईर यांची ही अंत्ययात्रा असल्याचे समोर आले. कल्याण तालुक्याच्या तहसीलदारांनी प्रस्तावित केलेल्या रस्त्याचा मार्गातील अडथळे दूर करून रहिवाश्यांच्या मागणी कडे लक्ष देण्याची अत्यावश्यकता या व्हायरल मधून दिसून येत आहे. या प्रश्नाला स्थानिक ग्रामपंचायत आणि सत्ता धारी पक्षाने हातभार लावणे आवश्यक आहे नाही तर रस्त्याच्या अभावी होणारी विदारकता समोर येईल यात दुमत नाही. मी शहीद झालो तर माझी अंत्ययात्रा कुठून नेणार असा खडा सवाल देखील एका जवणाने प्रशासनाला विचारला आहे.
महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल ८ लाख ७९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी महावितरणला कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
धनंजय औंढेकर हे नुकतेच कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू झाले आहेत. यापूर्वी ते मुख्य कार्यालयातील देयके व वसुली विभागात मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. कल्याण परिमंडलातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रिडींग, वीजबिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत १ लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनमधील २ लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागाचा समावेश असलेल्या वसई मंडलात ३ लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे लाख १०३ कोटी ८२ लाख रुपयांची तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे भाग समाविष्ट असलेल्या पालघर मंडलात १ लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी ७ लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे २ कोटी ८६ लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीचा समावेश आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे.
महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.