कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दिवा जंक्शनहून विशेष रेल्वे गाड्या सोडा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडे केली असून त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.

याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की कोकणातील बहुतांश रहिवासी नोकरी व्यवसायानिमित्त दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा-खोपोली राहतात. दरवर्षी सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आपआपल्या मुळ गावी जाऊन पारंपारीक पद्धतीने सण साजरा करतात. गेल्या दिड वर्षापासून कोविडचे संकट सुरु आहे. त्यामुळे पहिला लॉकडाऊन सुरु लागल्यापासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वरदान ठरणारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर व दिव्याला थांबा असणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या बंद करण्यात आलेल्या असून अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. आता गणेशोत्सवानिमित्त रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये दिवा जंक्शनमधून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणकर संभ्रमात पडले आहेत.

कोविडची तिसरी लाट गृहीत धरुन शासनाकडून रेल्वे प्रवासालाही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सद्यस्थिती पाहता बहुतांश जणांना दोन डोस नाहीच पण एकही डोस अजून पर्यंत मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये दिवा ते अगदी खोपोली, कसारा पर्यत राहणाऱ्या कोकणकरांना गावी जाण्यासाठी ठाणे, दादर, सीएसएमटी किंवा पश्चिम रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होणार आहेत.

त्यामुळे कोकणात जाण्यासाठी जवळपास रेल्वे सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तरी रेल्वेने याची तातडीने दखल घेऊन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे ठरणाऱ्या दिवा जंक्शनवरुन दिवा-सावंतवाडी व दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह जास्तीत जास्त गणेशोत्सव स्पेशल ट्रेन सोडून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप; ११९४ विद्यार्थ्यांनी साकारला आपला बाप्पा

ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपमध्ये ११९४ विद्यार्थ्यांनी आपला बाप्पा साकारत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा मूलमंत्र दिला आहे. आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन, एनजीओ गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करत आले आहे. प्रेत्येक वर्षी असंख्य विदयार्थी या वर्कशॉपच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या आपल्या कलेला नवीन आयाम देत असतात. नावीन्य पूर्ण कौशल्य आत्मसात करत असतात.

        यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्कशॉप घेणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जागतिक इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप आविष्कारच्या माध्यमातून घेण्यात आला. यातून ११९४ विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बसून इकोफ्रेंडली गणेशा (आपला बाप्पा) बनवण्याचा आनंद घेतला.  कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात सकारत्मक ऊर्जा आणि कार्य, नाविन्यपूर्ण कला शिकण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना आविष्काने दिली.  यातूनच आपण सर्व एकत्र येऊन पर्यावरण संवर्धन करू शकणार आहोत. पर्यावरण संवर्धनाच्या आमच्या प्रयत्नांना जन्सामण्यांमधून खूप उत्तम प्रतिसाद, साथ मिळत आहे.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना  सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

या तीन दिवसीय वर्कशॉप मध्ये पहिल्या दिवशी मनीष व्यापारी या गणेशमूर्ती कलाकार तसेच कलाशिक्षक यांनी हाताने गणपती बाप्पा कसा बनवायचा हे शिकवले. दुसऱ्या दिवशी गणेश गव्हाणकर यांच्या गणेशमूर्ती वर्कशॉमध्ये शाडूच्या मातीपासून साच्याच्या माध्यमातून गणपती कसा बनवायचा त्याचे फिनिशिग, अलंकार, सजावट कशी करायची हे शिकविण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी आपण बनवलेल्या बाप्पाचे रंगकाम, सजावट, डोळ्याची आखणी व घरच्या घरी इकोफ्रेंडली पद्धतीने बाप्पाचे विसर्जन कसे करावे हे सांगण्यात आले. यासाठी गणेशमूर्ती कलाकार गणेश गव्हाणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

       शाडूची भिजवलेली माती किंवा लाल भिजवलेली माती, चमचा, पेन रिफिल व इतर, बाप्पासाठी पाठ, सुती कापड, प्लॅट ब्रश, पाण्यासाठी वाटी किंवा मग अशा साहित्याचा उपयोग करण्यात आला.  या वर्कशॉमध्ये धुळे, जळगाव, मलकापूर, पुणे, कोल्हापूर, नागपूर, आनंदवन, सांगली, सातारा, औरंगाबाद, वाशी, पनवेल, मुंबई अश्या विभागातून अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी साहबाग नोंदवला.

       या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसीलदार रतीलाल चव्हाण, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, आविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव, खजिनदार गिरीश मंजुळे, दलजीत बोन्स, स्पूर्ती फाऊंडेशनचे बजरंग तांगडकर, प्रणय काटे, अदिती कदम, हे उपस्थित होते. आविष्कार चे संस्थापक सचिव विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. रोहित माळी आणि तन्मय चव्हाण यांनी हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली.

-कुणाल म्हात्रे

गावातच ११ वी १२ वीचे वर्ग सुरु करण्याची कल्याण तालुक्यातील फळेगाव ग्रामस्थांची मागणी

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गोवेली किंवा कल्याण मधील कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी  लागणारा वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११वी आणि १२ वीचे आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचे वर्ग सरू करण्याबाबत छत्रपती विद्यालय यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. भविष्यात फळेगाव येथे ११ वी, १२ वी चे वर्ग लवकरात लवकर सुरु व्हावेत अशी भावना अनेक पालकानी व्यक्त केली आहे.

-कुणाल म्हात्रे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुस्तीच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट

कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कुस्ती खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट दिली आहे. कल्याण मधील नांदीवली गावात असलेल्या जय बजरंग तालीम संघाने आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडवले आहेत. आधी कुस्ती मातीत खेळली जात होती. आता वेळ आणि काळ बदलला असून स्पर्धा  वाढली आहे. त्यासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे  नांदवली गावचे माजी सरपंच रामदास ढोणे, पंढरीनाथ ढोणे व खेळाडूंनी केली होती.

 या मॅटचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी मुलांनी मॅटवर कुस्तीची प्रात्याक्षिके दाखविली. या मॅटवर उत्तम सराव करुन उत्तम खेळाडू घडतील. केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेर नाव कमाविण्यासाठी त्यांना उर्जा व प्रशिक्षण मिळेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जय बजरंग तालीम संघाच्या व्यायाम शाळेच्या जागेत कुस्तीगीरांना आणि परिसरातील नागरिकांना नियमित व्यायामाकरिता लागणारे व्यायामशाळा साहित्य देखील उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या लोकर्पण कार्यक्रमाप्रसंगी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, उल्हासनगर महापालिका गटनेता धनंजय बोडारे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, कल्याण पंचायत समिती माजी सभापती सदाशिव गायकर, माजी नगरसेवक महेश गायकवाड, मारुती पाटील, विभागप्रमुख रामदास ढोणे, मदन चिकणकर, उपमहाराष्ट्र केसरी व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर युवराज वाघ  तसेच कल्याण व ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीर व वस्ताद उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

आपल्याच पोलीस ठाण्यातील सहकाऱ्याला अटक करण्याची डोंबिवलीच्या पोलिसांवर आली वेळ; गंभीर दुष्कृत्य केल्याने हवालदार निलंबित

डोंबिवलीच्या राम नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतच जर कुंपण खायला लागले तर सामान्य नागरिकांनी जायचे कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. या अगोदर सचिन वझे आणि पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या गाजलेल्या प्रकरणा मुळे पोलीस खात्यावर विविध प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यातच डोंबिवलीतील घटनेने पुन्हा पोलीस खाते वाईट गोष्टीसाठी चर्चेत आले आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. दुष्कृत्य करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. ज्या रामनगर पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे. सतीश कारले असे या पोलीस हवालदाराचं नाव असून आता त्याच पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी विविध कलमा अन्वये या पोलिस हवालदारावर गुन्हे दाखल केले आहेत. अश्या निकृष्ठ वृत्तीच्या पोलिसांमुळे समाजातील इतर चांगल्या व इमानदार पोलिसांना देखील नाईलाजास्तव खाली मान घालावी लागते. त्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उठण्या पूर्वी अशा वृत्तीच्या पोलिसांचा निकाल लावणे गरजेचे ठरू लागले आहे.

-रोशन उबाळे

अरेच्चा! एवढे मोठे केंद्रीय राज्यमंत्री आणि एवढीशा खुर्चीसमोर नतमस्तक ? कपिल पाटलांनी असं का केलं बरं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यातच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाच दिवस भेटी दिल्या. याचदरम्यान शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता झाल्यानंतर त्यांनी एका खुर्चीला वंदन करून तिच्यासमोर ते नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी असे का केले ? याबद्दल काही लोक अनभिज्ञ आहेत.

राजकारण असोत किंवा इतर कोणतेही क्षेत्र प्रत्येकाची सुरुवात ही तळा गाळातून आणि शून्यातूनच होत असते. आणि शून्यातुन सुरुवात करून केंद्रीय राज्यमंत्री पद मिळवणारे कपिल पाटील हे देखील त्यातीलच एक. कपिल पाटील यांनी ज्या खुर्चीला वंदन केले ती केंद्रीय खुर्ची नसून ज्या खुर्चीने त्यांना घडवलं ती ही खुर्ची होती. राजकारणात पहिलं मिळालेलं मोठं यश म्हणजे हीच खुर्ची जिला कपिल पाटील यांनी विनम्रपणे हात जोडले. ती खुर्ची होती सरपंच पदाची. म्हणूनच कपिल पाटील यांनी कुटुंबातील लोकांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले.

कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी म्हणजेच १९८८ मध्ये ते दिवे अंजूर गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होते. आणि याच गावचे ते सरपंच बनले होते. सरपंच पदाच्या लहान मात्र गावात प्रचंड मान असणाऱ्या खुर्चीवरून कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या खुर्चीवरून पुढे एवढा मोठा प्रवास होईल असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. सरपंच कपिल पाटील ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील हा प्रवास ज्या खुर्चीमुळे शक्य झाला त्या खुर्चीला मी कधीही विसरणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांना गहिवरून आले. आयुष्यात कितीही उंची गाठा पण पहिल्या पायरीला कधीही विसरू नका असा संदेश कपिल पाटलांनी यातून लोकांना दिला आहे. यातून कपिल पाटील हे किती भावनिक आहेत याचाच एक प्रत्यय लोकांना आला आहे.

-संतोष दिवाडकर

ईव्हीएम मशीन हॅकिंग प्रकरणाची चौकशी करा; शिवसेना नेत्यांनी केली मागणी

कल्याणमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचा ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हा गंभीर प्रकार असून सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दै.बातमीदारने प्रसिद्ध केलेल्या या व्हडिओ मुळे उडाली खळबळ

व्हायरल होत असलेल्या व्हडिओमध्ये आशिष चौधरी नामक इसम आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडुन आल्याचा दावा करताना दिसत आहे. आणि हीच व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्टिंग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडियो स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या मुलाची जवळपास ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी याने १९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालय, पोलीस महा संचालक आणि संबंधी सरकारी यंत्रणांना तक्रार केली आहे. त्याच मे महिन्यातील हा व्हिडियो असून २०१९ च्या कल्याण पूर्व विधान सभेत काही ठिकाणी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला आहे आणि याबदल्यात ५० लाख रुपये मिळाले होते असे त्याने म्हटले आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडियोत दावा करणाऱ्या आशिष चौधरीने आपल्या मूलाची ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तो अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडियोची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समवेत पोलीस उपयुक्ताची भेट घेत त्यांना याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करत असल्या बाबत पोलिसात तक्रार

आतापर्यंत आमदारांनी मशीन मध्ये घोळ केल्याची शंका होती मात्र आता या क्लिप मुळे ते स्पष्ट झाल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीनमधून चुकीचे काम केले जात असल्याची सर्व पक्षीय राजकारण्यांची ओरड सुरू आहे. ईव्हीएम मशीन मधील गोंधळामुळे चुकीचा निर्णय लागला आहे. मतदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डोळ्यात धूळफेक करत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा कायदेशीर ब होणे गरजेचे आहे यासाठी शुक्रवारी पोलिस उपायुक्तांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितलं.

ईव्हीएम मशीन हॅक करणे हा देशद्रोह आहे आणि चौधरी याने आपण पैशासाठी हे काम केल्याची कबुली दिली आहे. सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने यातील दोषींवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे. आतापर्यंत १३५ करोड लोकांच्या आणि राजकारण्यांच्या मनात असलेल्या संशयाला आणि चर्चेला हॅकरने सिद्ध करून दाखवले आहे. लोकशाही वर विश्वास असून आपण याप्रकरणी पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित यंत्रणा चौकशी करून न्याय देतील असा विश्वास गोपाळ लांडगे ( कल्याण जिल्हा प्रमुख) यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची प्रतिस्पर्धी धनंजय बोडारे यांची मागणी

-रोशन उबाळे

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; माजी आमदाराचा आंदोलनाचा पवित्रा

११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियामध्ये ओबीसी, एन टी, व्हीजेएनटी, आणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती केली जात असून यामध्ये तातडीने बदल करावा अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला आहे. याबाबत नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आज निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

      मुंबई एमएमआर क्षेत्रासह राज्यातील अन्य भागात ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्याची विद्यार्थ्यांना सक्ती केली जात असून याचा फटका राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्ही जे एन टी तसेच एन टी विद्यार्थ्यांना बसत आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३० ऑगस्ट असल्याने एव्हड्या कमी कालावधीत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर अनेक विशेष प्रवर्ग, एन टी, व्ही जे एन टी, व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागणार असून हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरणार आहे.

वास्तविक पाहता मागील वर्षी अशा प्रमाणपत्राची कोणतीही अट शालेय शिक्षण विभागाने टाकली नव्हती. यंदा देखील कोरोनाचा काळ पाहता नॉन क्रिमिलिअर ची सक्ती करण्यात येऊ नये. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नॉन क्रिमिलिअरचे प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात. याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन एन टी, व्ही जे एन टी, एसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव या अन्यायाविरोधात शालेय शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

जन आशीर्वाद यात्रेमुळे भाजप पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल मग राष्ट्रवादीच्या नेत्यांवर का नाही? उठवला जातोय सवाल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात कोरोना काळात गर्दी जमावल्या प्रकरणी कल्याण डोंबिवली च्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यातील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील काही पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत असा सवाल सध्या विचारला जात आहे.

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतचा कार्यक्रम मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन कोरोना काळात गर्दी जमवील्या प्रकरणी गुन्हे का दाखल नाहीत ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आगरी समाजातुन असलेल्या कपिल पाटील यांचा सत्कार सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या आगरी समाजाच्या नेत्यांनी मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन गर्दी जमवून देखील या बाबत गुन्हे का नोंद झाले नाहीत? हा वादाचा विषय ठरला आहे. सर्वपक्षीय संघर्ष समिती व राष्ट्रवादीचे नेते असलेल्या गुलाब वझे व दत्ता वझे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची पोलिसांना माहिती नव्हती का? की डोळेझाक केली जात आहे? अशाप्रकारे दुजाभाव केला जात असल्याने नागरिकांत पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. एकाला एक न्याय आणि त्याच प्रकरणात दुसऱ्याला दुसरा न्याय हे खरंच खेदजनक आणि निषेधार्थ आहे. असा सूर उमटला जात आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसून शासनाने सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. भाजपने डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नियम पायदळी तुडवल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन बंधनकारक असताना यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत लोकांना एकत्र जमा करणे, मास्क चा वापर न केल्याने ४३६/२०२१ भा.द.वी.कलम १८८,२६९,२७० सह साथीचा रोग कायदा १८९७ चे कलम २,३,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ब ) महा. पो.अधि.सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे आयोजकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास  जन आशीर्वाद कार्यक्रमा वेळी डोंबिवली नागरीक सहकारी बँक चौक, सोनारपाडा कल्याण शिळ रोड येथे जन आशीर्वाद यात्रा काढून नियमांचे पालन न केल्याप्रकरणी  भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, नंदू परब, शशिकांत कांबळे, संजय उर्फ बबलू तिवारी, दत्ता माळेकर व इतर पदाधिकारी  व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मग बाकीच्यांना वेगळा न्याय का ? अशा चर्चा सध्या नागरिकांमध्ये तसेच राजकिय वर्तुळात सुरू आहेत.

-रोशन उबाळे

घरफोडी करणारा टिटवाळ्यातील १९ वर्षीय सराईत आरोपी पोलिसांच्या हिरासतीत; कल्याण क्राईम ब्रांचने फेकलं जाळं

टिटवाळा येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवा आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने बुधवारी जाळं पसरून अटक केली. अत्यंत शिताफीने केलेल्या या शोधात हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागला असून त्याच्या कडून काही ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.

तमन उर्फ नरेंद्र बाबू भंडारी हा १९ वर्षीय युवक सराईत आरोपी असून तो घरफोडी आणि चोऱ्या माऱ्या करीत होता. गुन्हे शाखा ३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपीची माहिती काढली. त्यानंतर गोपनीयपणे ओळख पटवून त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे ३८ हजार रुपये किंमतीचे ६ मोबाईल फोन सापडले. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी घरफोडी केली असल्याचे त्याने चौकशीत मान्य केले. यासाठी त्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

या कारवाईत वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३, कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक, मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर