कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगोरी नाही; राजकारणी असोत किंवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच -खा. श्रीकांत शिंदे

राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखेच आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. अप्रत्यक्ष नियमाचे चाललेले उल्लंघन समाज मनावर सावत्र वागणूक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

कोरोनाचे नियम सर्वांना सारखे आहेत. कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच पुढे बोलतांना आपल्या मतदारसंघात मोठ्या गतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय ३८० कोटी रुपये कल्याण डोंबिवली, एमआयडीसीतील रस्त्यांसाठी मिळालेले आहेत. त्याचबरोबर कल्याण – शिळ रोडचे काम प्रगतीपथावर असून पलावा उड्डाणपूल, काटई उड्डाणपूल यांची कामेही मंजूर झाली आहेत. विकासकामे संथगतीने सुरू असतील तर त्यांना गती प्राप्त करून देणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबाबत बोलता आहेत की आपल्या मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलत आहेत हे माहिती नसल्याची कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावली.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणूका जवळ आल्याने राजकीय वातावरण पावसाळा असून सुद्धा गरम होऊ लागले आहे.

-रोशन उबाळे

पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाची लूट

कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरातल्या रेती बंदर रोडला भद्रनिसा चाळीत राहणारे अमीर बुडान शेख (५७) यांनी मंगळवारी लुटमारी संदर्भात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका भाड्यावर गेले असताना भुरळ घालून त्यांना प्रवाशांनी पेढा खायला दिला. आणि गुंगी येताच लुटारूनी आपला दावा साधला.

अमीर शेख हे शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एम एच ०५/डी झेड/ २६१८ क्रमांकाची त्यांची रिक्षा घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी डेपो समोर प्रवासी भाडे घेण्यासाठी थांबले होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी रिक्षास हात दाखवून त्यांना वालधुनी येथिल रेल्वे हॉस्पीटल येथे जायाचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर शेख यांनी ७० रूपये भाडे होईल असे सांगितले. हे दोघेजण रिक्षात बसले. वालधुनी दिशेकडे जात असताना त्या इसमांनीअमीर यांना उल्हासनगर येथे जाण्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी उल्हासनगरच्या सेंटल हॉस्पीटल येथे नेले. त्यातील एका प्रवाश्याने अमीर यांना पत्नीस भेटून येतो असे, असे सांगून रिक्षातून उतरून तो इसम निघून गेला. पुन्हा काहीवेळात पुन्हा रिक्षाजवळ आला असता त्याच्या हातात असलेला पेढ्यांचा बॉक्स पुढे करून मला मुलगा झाला आहे असे बोलून अमीर यांना पेढा खाण्यास दिला. आनंदाच्या भरात अमीर यांनी त्यातला पेढा खाल्ला.

त्यानंतर त्या अनोळखी इसमांनी मावशीला भेटण्याकरीता उल्हासनगरच्या खेमाणी येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी त्यांची रिक्षा खेमाणी येथे नेली. त्यातील एक इसम उतरून काहीवेळाने परत रिक्षात आला आणि अमीर यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे सोडण्यास सांगितले. रिक्षा चालवत असताना अमीर शेख यांना थोडे अंधुक दिसू लागले. चालकाला गुंगी आल्याचे रिक्षातील लुटारू प्रवाश्यांना हेरले. त्यांनी अमीर यांना वालधुनी जकात नाक्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितले आणि घात केला.

लुटारूंनी आपल्याकडील मोबाईल, घड्याळ आणि काही रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध केल्यानंतर ठोसा-बुक्क्याने मारहाण करून रिक्षासह बिर्ला कॉलेजसमोर सोडून पळ काढल्याचे या वयोवृद्ध रिक्षावाल्याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान कोरोना काळात लुटीच्या सर्रास घटना वाढू लागल्या आहेत .या प्रकरणी  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील फरार लुटारूंनी हुडकून काढण्याची जबाबदारी सपोनि देविदास ढोले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

सात वर्षे स्वतःच अस्तित्व बदलून राहणारा आरोपी सापडला महात्मा फुले पोलिसांच्या सापळ्यात

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात एका आरोपी विरोधात २०१४ साली विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा आरोपी मागील सात वर्षे पोलिसांना चकवा देऊन स्वतःचे अस्तित्व बदलून लपून छपून आपले जीवन जगत होता. आता आपल्याला कोणी ओळखणार नाही या भ्रमात असतानाच पोलिसांनी आज त्याला यशस्वीपणे आपल्या सापळ्यात पकडले आहे.

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात २१ नोव्हेंबर २०१४ साली माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख याच्या विरोधात फसवणूकीच्या प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी तसेच विविध कलमा नुसार गुन्हा नोंदवला गेला. मात्र अटक होण्याच्या भीतीने तो फरार झाला. न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याची लखनऊ येथील पाऊने दोन कोटींची प्रॉपर्टी लिलावास काढली. मात्र तरीही माजिद अली हा काही समोर आला नाही. आणि पोलीस पुढील सात वर्षे त्याचा शोध घेत राहिली. पण माजिद अली स्वतःच अस्तित्व बदलून राहत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता.

पोलिसांना चकवा देऊन राहत असलेल्या मन्सूर अलीला पकडण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदाराची मदत घेतली. यानंतर त्याचा सध्याचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक शोध घेतला. यानुसार तो आता नवी मुंबईत कामोठे येथे राहत असल्याचा पत्ता त्यांना प्राप्त झाला. व अधिक शोध घेऊन त्याचा सध्याचा फोटो देखील पोलिसांनी मिळवला. आणि सापळा रचून सात वर्षे लपंडाव खेळणाऱ्या माजिद अलीचा गॅम ओव्हर केला आणि त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात हजर केले.

माजिद अली सध्या पोलिसांच्या कैदेत असून त्याच्यावर या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तरप्रदेश येथेही त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

जन आशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपच्या पदधिकाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीत गुन्हे दाखल

कोरोना नियम असताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. सर्वसामान्य जनतेला नियम आणि राजकीय नेते आणि पक्षांना वेगळा न्याय याबाबत जनतेत वेगळी भावना पसरली होती. याचे गांभीर्य ओळखत पोलीस प्रशासनाने “जन आशिर्वाद  यात्रा” आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कोविड १९ नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.  हे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक होते. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.  मंगळवारी त्यांच्या भेटीचे आयोजन डोंबिवली पूर्व मध्ये डोंबिवली नागरिक सहकारी बँक चौक, सोनार पाडा कल्याण शील रोड वर देखील करण्यात आले होते. या घटनेत पोलिसांच्या मनाई आदेश आणि कोविड -१९  प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आले. प्रचंड गर्दी पाहाता आणि कोरोनाची गांभीर्य विसरलेल्या भाजपा पदाधिकारी  व नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात मानपाडा पोलिसांनी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली ग्रामीण मंडळ अधिकारी संजय तिवारी, दत्ता मळेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर खडकपाडा, महात्मा फुले व कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही विविध पदाधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

-रोशन उबाळे

तरुणांच्या लसीकरणला प्राधान्य देण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आयुक्तांकडे मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तरुणांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्षांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

कल्याण डोंबिवलीत तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. त्यातील ७०% ते ८०% घरातील एकमेव कमावते असल्याकारणाने त्यांचा रोज प्रवास किवा रोजगार निमित्त जास्त लोकांसोबत संपर्क येतो. त्यामूळे त्यानां कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्य सरकारने जाहिर केलेल्या नविन नियमावली नुसार फक्त २ डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची मुभा आहे.

 या सर्व बाबी लक्षात घेवुन तरुणांना प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून द्यावे असे निवेदन कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा कार्याध्यक्ष यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुक डॉ. विजय सुर्यवंशी यांना दिले. याबाबत आयुक्तांनी लवकरच लसीकरणासाठी एक मोबाइल वॅन उपलबध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

हायटेन्शन वायरमुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय राज्य मंत्र्यांना साकडे

कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसारत हायटेन्शन वायर असून यामुळे भविष्यात मोठी  दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनाच निवेदन देत येथील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

योगीधाम परिसरातून काही इमारतीपासून  खूप कमी अंतराने लागूनच मध्य रेल्वेची ३५ केवीए हायटेन्शन वायर गेली असून वायर खालून लोकांचा वापर असलेले रस्ते सुद्धा आहेत. उन्हाळ्यात या तारा प्रसरण पावतात व खाली लोंबकळतात व पावसाळ्यात सुद्धा खालून  चालताना किंवा वाहन चालवताना नागरिकांना भीती वाटते. तसेच अमृतधाम प्रोजेक्टचे क्लब हाऊस व योगीधाम क्लब हाऊस चे अंतर सुद्धा या वायरिंग पासून खूप कमी आहे.

ब्रेकडाऊनसाठी वायरी पासून ५० मिटर जमिनीचे क्षेत्र मोकळे सोडण्यात यावे, असा नियम आहे. परंतु याठिकाणी केडीएमसी पालिका प्रशासनाकडून सगळे नियम धाब्यावर बसवून बांधकामांना परवानगी देण्यात आली  व  प्रोजेक्टना बांधकाम  पूर्णत्वाचा दाखला  सुद्धा देण्यात आला. यामुळे हजारो लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले आहेत. सध्या याच परिसरात योगीधाम फेज ५ अजमेरा ब्लीस  नावाच्या प्रोजेक्टचे काम सुरू असून वरच्या वायरला हातातील लोखंडाच्या रोडचा स्पर्श होऊन काम करणारा तरुण दगावला. अशाप्रकारे लोकांचे जीव टांगणीला लागले असून, या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी एका महिला भाजपा पदाधिकारीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोना आणखी वाढण्याची भीती; राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला टोला

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्ली वरून येतांना राज्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी केंद्राकडून किती लस आणल्या असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी केला असून भाजपाच्या या जनआशीर्वाद यात्रेमुळे नियंत्रणात आलेली कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सीबीएससी शाळांना १५ टक्के फी कपात करण्यास राज्य सरकारने भाग पाडले असतांना केंद्राने या सीबीएससी शाळांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्य मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपातर्फे काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत देखील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्राकडून लसींचा साठा कमी येत असल्याने लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या हाणामारी देखील होत आहेत. असे असतांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांनी केंद्राकडून महराष्ट्रासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी किती लसी आणल्या असा सवाल किरण शिखरे यांनी केला आहे.

एकीकडे लसींची कमतरता असतांना जनआशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा प्रसार आणखी होण्याची भीती असून कपिल पाटील यांनी याची काळजी घेण्याची विनंती शिखरे यांनी केली आहे. तसेच कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असतांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांची सक्तीने फी वसुली सुरु आहे. यावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने १५ टक्के फी कमी करण्याच्या सूचना या शाळांना दिल्या आहेत. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या शाळांवर केंद्र सरकारचा कोणताही अंकुश नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी या विषयात लक्ष घालून विद्यार्थी आणि पालकांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा धोका वाढेल असा टोला विरोधकांनी लगावला आहे. मात्र कोरोना प्रसाराची खबरदारी घेऊन कपिल पाटील या यात्रेत स्वतः मास्क वापरत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सभांना उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांना देखील मास्क तोंडावर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवली कोरोना मुक्त होण्याच्या वाटेवर; पहा काय म्हणताहेत आकडे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दुसरी लाट ओसरल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून एक्टिव्ह रुग्णसंख्या देखील लोकसंख्येच्या तुलनेत जेमतेम राहिलेली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवसाला २४०० हुन अधिक रुग्णांची नोंद केली गेली होती. एक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इंजेक्शन मिळवण्यासाठी लोकांना खूप कसरत करावी लागली. अशा परिस्थितीत दिवसाला २० पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागत होते. म्हणून महानगरपालिका क्षेत्रात कडक निर्बंध लागू केले गेले. नागरिक आणि व्यापारी दुसऱ्या लॉकडाऊनला सामोरे गेले. मात्र आता लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुढे पालिका आयुक्तांनी एकेकाळी गच्च भरलेले टाटा आमंत्रा रुग्णालयाला देखील टाळा लावला.

कल्याण डोंबिवली आता लवकरच कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे समोर येणाऱ्या आकड्यांवरून वाटत आहे. आज दि.१७ ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रात ३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तर या बरोबर एकाचा मृत्यू देखील नोंदवला गेला आहे. मात्र सुखद बाब म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात आता फक्त ४७४ इतकेच पोजीटिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पुढे हा आकडा आणखी कमी होत कल्याण डोंबिवली कोरोना मुक्त होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. हत्ती निघून गेलाय फक्त शेपूट राहिलंय असे म्हणायला हरकत नाही.

-संतोष दिवाडकर

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांची जन आशीर्वाद यात्रा; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात केला पहिल्या दिवसाचा समारोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंदीय मंत्रिमंडळात भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातून पाच दिवस त्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असणार आहे. कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली.

सोमवारी सकाळपासूनच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. ठाणे, कळवा, मुंब्रा झाल्यानंतर शिळफाटा मार्गे ते कल्याण डोंबिवलीच्या दिशेने निघाले. येथून कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व अश्या तीन विधानसभा मतदारसंघात ते फिरण्यासाठी निघाले होते. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तिथून पुढे ही यात्रा डोंबिवलीकडे निघाली. त्यानंतर रात्री कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांच्या पहिल्या दिवसाच्या यात्रेचा समारोप करण्यात आला. याठिकाणी स्थानिक आमदार गणपत गायकवाड तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आज पहिल्या दिवसाची जन आशिर्वाद यात्रा ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पू. असा प्रवास करत संपन्न झाली. कल्याण पू. येथील आमदार मा. श्री. गणपत गायकवाडजी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे या यात्रेचा समारोप झाला. सर्वच ठिकाणी जनतेचा या यात्रेसाठी उदंड प्रतिसाद लाभला. मा. मोदी साहेबांनी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्राला एवढी मोठी जबाबदारी देऊन ठाणे जिल्ह्याचा सन्मान केला आहे. अशी भूमिका मी यावेळी मांडली. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विभागातील जनतेशी संवाद साधण्याची संधी आज मिळाली. आपल्या साऱ्यांचे मिळालेले हे प्रेम, हा आशिर्वाद माझ्यासाठी अमूल्य आहे.

कपिल पाटील (केंद्रीय राज्यमंत्री)

-संतोष दिवाडकर

लसीकरण झालेल्या व्यक्तींना रेल्वे प्रवास करण्याची मुभा; सकाळी लॉकल गाड्यांत प्रचंड गर्दीसह पुन्हा रेल्वे गाड्या फुल

दोन कोरोना लस घेण्याऱ्या व्यक्तींना रेल्वे प्रवासात मुभा मिळाल्या नंतर सोमवारी सकाळ पासून पुन्हा नेहमी सारखी होणारी गर्दी दिसू लागली आहे. सीट मिळण्यासाठी तारेवरची कसरत करताना रेल्वे प्रवाशी दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कोविड वैक्सीन च्या दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांनंतर १५ ऑगस्ट रोजी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. 

सोमवार सकाळ पासून रेल्वे गाड्यात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे लॉकल गाड्या त्यात ती जलद असो किंवा सर्व ठिकाणी थांबणाऱ्या गाड्या असो सर्वात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पतेती सरकारी सुट्टी असून ही सोमवारी कल्याण- डोंबिवली, दिवा, बरोबर सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची लगबग दिसून आली होती. अन्य प्रवासात होणारा वाढीव खर्च पाहता बचत होत असल्याने प्रवाश्यात आनंदा चे वातावरण पसरले होते . दरम्यान त्यामुळे रेल्वे स्थानक अधिकारी यांच्या कडून मंगळवारी यापेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे आज देखील तोब्बा गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

-रोशन उबाळे