गाडी चोरीच्या उद्देशाने वाहन चालकाची हत्या; नऊ वर्ष कोर्टात चाललेल्या केसचा लागला निकाल

जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच २०१२ साली कल्याण मधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांकडून शिर्डी साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी एक गाडी बुक झाली होती. मात्र या वाहनचालकाची हत्या झाली आणि संशयितांविरोधात कोर्टात खटला उभा राहिला. जवळ्पास नऊ वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना आता कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

कल्याण येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे रेवणकर यांच्याकडे वाहन चालक म्हणून घनश्याम पाठक हे काम करीत होते. २०१२ साली शिर्डी साईबाबा देवस्थानाचे दर्शन घेण्याकरिता चार जणांनी गाडी बुक केली आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरु असतानाच या चौघांच्या डोक्यात जी डाळ शिजत होती ती वाहनचालकाला अनाकलनीय होती. शिर्डीला जातानाच ओतूर येथे थांबून त्यांनी रश्शी विकत घेतली. ही रश्शी कशासाठी घेतली याची कल्पना ड्रायव्हरला मात्र नव्हती. शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शन घेतले. आणि नंतर पेटपूजा करून परतीचा प्रवास सुरू केला.

नाशिक येथे आल्या नंतर आडबाजूला वाहन चालकाला गाडी थांबविण्याची सूचना त्या चौघांनी केली. कस्टमरच्या सुचनेचे पालन करीत वाहनचालक घनश्याम पाठक (५३) यांनी वाहन रस्त्याहून बाजूला केले. वाहन थांबवल्या नंतर रश्शीने या चारही आरोपींनी त्याचा गळा आवळला. ड्रायव्हरची जिवाच्या आकांताने तरफड सुरू होती. मात्र चौघांच्या कचाट्यातून त्याला मानेभोवती गुंडाळलेला मृत्यूचा दोर सोडवता आला नाही आणि त्यातच त्याने दम तोडला. चौघांपैकी एकाने गाडीवर ताबा घेतला आणि नाशिक ते कसारा प्रवास करीत असताना त्यांनी मृतदेहाला मधोमध बसवीले. पुढे गाडी कसारा घाटात आणली आणि वाहनचालक घनश्याम पाठकचा मृतदेह निर्दयीपणे खोल दरीत फेकून दिला.

इकडे वाहन चालक व वाहन दोन्ही गायब असल्याने टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकांची चिंता वाढली. काहीही शोध लागत नसल्याने त्यांनी थेट महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. वाहनचालक विश्वासू असल्याने त्यांनी अपहरण झाल्या संदर्भात गुन्हा दाखल केला. वाहन व चालक मिळून येत नसल्याने महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहिती व शिर्डी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार आरोपींबरोबर वाहनचालक ही आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र पोलिसांकडे या हत्येसंदर्भात प्रथमदर्शी असा कोणताही पुरावा नव्हता.

पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक तपासावर शहापूर मध्ये राहत असणारे चारही आरोपी गजाआड करण्यात आले. आकाश गजानन साळुंखे, सचिन उर्फ बटाट्या उर्फ सुभाष नीचीते, सचिन उर्फ सच्या सुभाष नीचीते व दिनेश काळूराम फर्डे अशी त्या चौघांची नावे. यातील तीन जणांना कालांतराने न्यायालयाने जामिनावर सोडले होते. तर एक आरोपी कारागृहातच होता. केवळ गाडी चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. शहापूर येथे राहत असणाऱ्या आरोपीच्या वतीने कल्याणातील २ ख्यातनाम वकील केस लढवित होते. तब्बल नऊ वर्ष कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.कचरे यांच्या दालनात काल अंतिम सुनावणी झाली आणि इतक्या वर्षांनंतर मृत व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. गुन्हा सिद्ध झाल्याने वाहनचालकाची हत्या करणाऱ्या शहापूर मधील चारही आरोपींना न्यायालयाने आता संपूर्ण जन्मभर तुरुंगवासाची सजा सुनावली आहे.

एक चारचाकी वाहन जे मिळवण्यासाठी चार व्यक्ती एका निष्पाप जीवाचा बळी घेतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच कुटुंब देखील अंधारात येत. शिवाय काही लाखांच्या गाडीसाठी चार लोकांना आजन्म कारावास होऊन त्यांची कुटुंबाना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे चार पैसे मिळवण्याची ही हाव माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाते हे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे नऊ वर्षाने का होईना अखेर न्याय निवाडा झालाच. सदर तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात २०१२ साली नोंदवली होती. मात्र नुकतेच तीन-चार दिवसांपूर्वी देखील याच पोलीस ठाण्यात अगदी अशीच तक्रार नोंदवली गेली आहे. ज्यात गाडी चोरी साठी उबेर चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला गेला आहे.

♏♓ वृत्तांकन :- रोशन उबाळे

♏♓ पुनर्लेखन :- संतोष दिवाडकर

गाडीच्या चोरीसाठी उबेर चालकाची हत्या. क्लिक करा खालील लिंकवर

https://mhmarathi.in/?p=1033

कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा; डॉग स्कॉटसह होतेय कसून तपासणी

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शहरांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर, डॉग स्कॉट्सद्वारे शोध घेतला जात आहे. यासाठी, उच्च पोलीस अधिकारी स्वतः सुरक्षा तपासण्यात मग्न आहेत. जेणेकरून दहशतवाद्यांची कोणतीही योजना यशस्वी होऊ दिली जाणार नाही. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर डॉग स्कॉटसह कसून तपासणी करण्यात आली.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ज्यात रेल्वे संरक्षण दलाचे प्रभारी भूपेंद्र सिंह स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवान दिसले. संभाषणादरम्यान स्टेशन प्रभारी भूपेंद्र सिंह म्हणाले की, दहशतवादी घटना कोणालाही सांगून घडत नाही. त्यामुळे पूर्ण दक्षतेसह रेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या मेल गाड्या तसेच संशयास्पद व्यक्तींवर बारीक नजर ठेवली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कल्याण आणि जवळपासच्या स्थानकांवरील अधिकाऱ्यांसह डॉग स्कॉटची टीम जिमी नावाच्या कुत्र्याचा साहाय्याने  शोध घेत आहे.  सुरक्षेच्या संदर्भात शोध मोहिमेचा भाग म्हणून मोठ्या संख्येने महिला सुरक्षा दलांनाही तैनात करण्यात आले आहे. आणि सर्वच फौजफाटा रेल्वे स्टेशनवर लक्ष ठेवण्यात गुंतला आहे.

-रोशन उबाळे

‘या’ कारणाने वाहतूक पोलिसाच्या डोक्यावर घातला दगडाचा घाव; कल्याणमध्ये नाकाबंदी दरम्यान घडला प्रकार

pc – रोशन उबाळे

कल्याणमध्ये नाकाबंदी दरम्यान  भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतल असून राहुल रोकडे असं तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीसांनी राहुलला ताब्यात घेतले आहे.

कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु असून शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. विना हेल्मेट कारवाई सुरू असतांना राहुल  रोकडे हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता. पटाईत यांनी त्याची गाडी थांबवली, मात्र राहुल ने कट मारत निघून गेला. काही अंतरावर गाडी लावून काही क्षणातच राहुल परत आला. त्याने पटाईत यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णलयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी राहुल  रोकडे याला ताब्यात घेतलं आहे.

-कुणाल म्हात्रे

डीपी रस्त्यात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर क.डों.म.पा.ने चढवला बुलडोझर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरात डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या तीन मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, इ प्रभाग अधिकारी भारत पवार, किशोर खुताडे यांच्या पथकांसह संयुक्तपणे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. अशाच प्रकारे दावडी येथील तुकराम चौक याठिकाणी विकासक राम लखन यादव यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

या अगोदर एमआरटीपी प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आज आय, इ आणि ड प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक पोकलेन, एक गॅस कटर च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेत मालवाहतूक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पूनालिंक तिसगाव रोडवरील दुर्घटना

कल्याण पूर्व तिसगाव पूना लिंकरोडवर आज दुपारी ४ च्या दरम्यान एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मालवाहतूक ट्रकच्या धडकेत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मंधाता मिश्रा हा तीस वर्षीय तरुण आपल्या दुचाकीवरून प्रवास करीत होता. पूना लिंकरोडहुन जात असताना एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली आणि या धडकेत ट्रकखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तात्काळ पंचनामा केला व मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवून दिला.

अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण मंधाता मिश्रा हा डोंबिवलीत राहणारा असल्याचे माहिती मिळाली. शिवाय त्याच्याजवळ सापडलेल्या ओळ्खपत्रा नुसार तो रिलायन्स कंपनीचा कर्मचारी असल्याचेही समजत आहे. या अपघाताचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.

-शरद शिंदे

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १६ ऑगस्ट पासून जन आशिर्वाद यात्रा

केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीयमंत्री १६ ते २० ऑगस्ट दरम्यान जन आशिर्वाद यात्रा देशभरात काढणार असून केंद्रीय राज्यमंत्री  कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर शहरात ते १८ तारखेला यात्रेतुन फिरणार आहेत.

या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनाबाबत कल्याणमधील आचिवर्स कॉलेजमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार संजय केळकर, किसन कथोरे, यात्रा प्रमुख आमदार निरंजन डावखरे, सहप्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश चौगुले तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्या, मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जन आशिर्वाद यात्रेचा मार्ग तसेच इतर नियोजनाबाबत सुक्ष्म नियोजन करून पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ही जन आशिर्वाद यात्रा कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर मधील विविध भागातून जाणार असून मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासोबतच जनतेचे आशिर्वाद घेतले जाणार आहे. या यात्रेत आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, कौशल्य विकास, पीक योजना, कृषि सिंचन योजना, पंतप्रधान युवा योजना यासह केंद्र सरकारने अन्य गरीब कल्याणकारी योजना सुरू केल्या या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या जन आशिर्वाद यात्रेतून केले जाणार आहे.

केंद्र सरकारमधील ३९ नवनियुक्त  केंद्रीयमंत्री जन आशिर्वाद यात्रा काढणार असून २१२ लोकसभा क्षेत्रातून १९ हजार ५६७ किलोमीटर चा प्रवास करून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे व जनतेचा आशिर्वाद घेण्याचे काम करणार आहे.

-कुणाल म्हात्रे

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरुवात

PC – रोशन उबाळे

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४  ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती या समितीचे स्वागताध्यक्ष तथा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.

या वेळी ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक गिरीष लटके, ज्येष्ठ नाटय़ अभिनेते आणि कवी सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास वामनदादा कर्डक यांच्या गावचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्यासह जे. जे. आर्ट स्कूलचे गणेश तरतरे,  कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटना निमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ह्या लोककवीला मानवंदना म्हणून पुल कट्टा, कल्याणने त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा मानस केला आहे. यास्तव कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी आणि प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

वामनदादा याचे साहित्य आणि कार्य जनसामान्य आणि नव्या पिढी पर्यंत पोहोचवणे या उद्देशाने समितीने वर्षभर जन सहभाग केंद्रस्थानी ठेवून काही अभिनव संकल्प केले आहेत. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

जन्मशताब्दी निमित्ताने उदघाटन व समारोप समारंभ होणार असून  जलसा, शॉर्टफिल्म, वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे गायन स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, कॅलिग्राफी, एकांकिका, आठवणी संकलन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक संस्था, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दिंडी वामनदादाच्या जन्म गावांतून डिसेंबर २०२१ मध्ये निघेल व जानेवारी २०२२ मध्ये कल्याण येथे सांगता होईल. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

-कुणाल म्हात्रे

मनसे आमदार राजू पाटील दिल्ली दौऱ्यावर; दिवा-पनवेल रेल्वे लोकल व इतर मागण्यांसंदर्भात मंत्र्यांच्या भेटीगाठी

मनसे आमदार राजू पाटील हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. राजू पाटील यांनी दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

दिवा ते पनवेल लोकलसेवा सुरु व्हावी अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. दिवा ते पनवेल दरम्यान दातिवली, निळजे, तळोजा पंचानंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल अशी स्टेशन येत असून हा भाग मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येत असल्याने नागरी वस्ती वाढत आहे. सध्या दिवा ते रोहा दरम्यान रेल्वे शटल सेवा सुरु असून दर दिवशी ठराविक वेळेतच या गाड्या सुटतात. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. दातिवली, निळजे, तळोजा पंचानंदसह अगदी कळंबोली पर्यंत मोठमोठे गृहप्रकल्प झालेले आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे सुरु असून दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे.

निळजे, तळोजा येथील नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या स्टेशनवर गेल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सदर स्टेशन गाठण्यासाठी प्रवाशांना जवळ जवळ सात ते आठ किमी प्रवास करावा लागतो त्यामुळे वेळ, पैसा वाया जातोच व प्रवाशांची प्रचंड गैरसोयही होते. त्यातच परिवहन सेवाही अपुरी असून या परिसरातून मुंबई-ठाणे परिसरात नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात. सध्या नवी मुंबई विमानतळाचेही काम सुरु झालेले आहे. त्याचाही बराचसा भाग या परिसराला जोडलेला आहे. तसेच या परिसरातून केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मल्टीमॉडेल कॉरिडॉर जाणार असून त्याचेही काम सुरु आहे.

अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्य वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टीकोनातून लोकलसेवा सुरु करणेच हाच उत्तम पर्याय आहे. असे मनसे आमदार यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे दिल्लीत जाऊन केली आहे.

दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सुद्धा भेट घेतली. यावेळी त्यांनी कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तसेच काही ठाणे जिल्ह्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

-कुणाल म्हात्रे

गोकुळधाम सोसायटीच्या रहिवाश्याला बिल्डरकडून मारहाण; पाणी कनेक्शन कापल्याचा विचारला होता जाब

पाणी कनेक्शन का कापले अशी विचारणा करणा-या रहिवाशी मनोज प्रजापती (वय 33) यांना बिल्डर रामप्रताप सिंग आणि विकास रामप्रताप सिंग या पिता-पुत्राने रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पिसवली येथील अमरदीप कॉलनीतील गोकुळधाम सोसायटीत सोमवारी घडली. मनोज यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात सिंग पिता-पूत्र विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज हे गोकुळधाम सोसायटीत गेल्या पाच वर्षापासून पत्नी आणि मुलासह राहतात. सोमवारी ते संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी आले. त्यावेळी घरी पाणी नसल्याचे समजले असता ते सोसायटीच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी असलेले बिल्डर रामप्रताप सिंग यांना माझ्या घरात पाणी नाही तुम्ही माझे पाणी कनेक्शन का तोडले अशी मनोज यांनी विचारणा केली. यावर रामप्रताप यांनी आधी मेंटेनन्स भर तेव्हा पाणी चालू करतो असे सांगितले.

मी ५ हजार रूपये सोसायटीसाठी दिलेले आहेत तुम्ही आधी माझे पाणी कनेक्शन चालू करा असे मनोज बोलले असता रामप्रताप यांनी त्याला शिवीगाळी करीत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मनोज यांनी प्रतिकार करताच रामप्रताप यांनी त्यांचा मुलगा विकासला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. त्याठिकाणी आलेल्या विकासने लोखंडी रॉडने डोक्याला, हाताला व पायावर प्रहार केला. यात मनोज यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न; आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार -मेहबूब शेख

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये केलेल्या विकासकामांच्या आणि पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जी घोडदौड सुरू आहे. त्या घोडदौडींकडे पाहता आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शंभर प्लस जागांचा नारा देत महापौर राष्ट्रवादीचाच बसेल यात संदेह नसावा असा आत्मविश्वास युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.

कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. आता जनता युतीच्या करनाम्यांना कंटाळली असून केवळ राष्ट्रवादी हा पर्याय समोर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पक्षामध्ये युवकांचा प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये होत असून आजच्या मेळाव्याला आलेली उपस्थिती हे त्याचं प्रतिक आहे. असाच उत्साह कार्यकर्त्यांनी मनामध्ये बाळगून एकमेकांशी सहकार्याची भावना घेऊन पुढे जावं असे आवाहन त्यांनी केले.

यानिमित्ताने महिलांना देखील उमेदवारी मध्ये संधी देऊन मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणाचा विचार यावेळी पुढे आला. त्याचे उपस्थितांनी स्वागत केले. तसेच पक्षाला तीन आकडी बळ देण्यास आम्ही सज्ज आहोत असा नारा देखील दिला. तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. नागरिकांमध्ये वावरताना त्यांच्या अडचणी व समस्या सोडवताना प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले. शहरांमधील नागरी समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर द्यावा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

ग्रामीण भागातील पाणी समस्या तसेच शहरी भागातील खड्डे, कचरा, प्रदूषण, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, शाळांच्या फी वाढीबद्दलच्या समस्या या सर्वांवर प्रकाशझोत टाकल्यास नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. आणि त्या माध्यमातून एक सक्षम कार्य देखील होऊ शकत. आपली नाळ नागरिकांशी असून त्यानिमित्ताने सगळ्यांनी निवडणूकीच्या धागा पकडून पुढे जायला हवं हे सूत्र लक्षात घेऊन कामाला लागावे असे आवाहन करून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने लोकसभा, विधानसभेला जशी बुथ रचना चांगली केली होती. तशीच पुन्हा मोट बांधण्याचे कार्य ज्येष्ठांनी करावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षम करावा असा विचार पुढे आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने १००+ जागा तसेच आघाडी असली तरी पक्षाचा महापौर बसेल असा दावा या बैठकीत उपस्थित केला. क.डों.म.पा. निवडणुकीत सध्या १२२ प्रभाग असून याच जागांसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे नुकसान झाले होते. काँग्रेस बरोबर आघाडी असूनही राष्ट्रवादीला फक्त दोन जागी विजय मिळाला होता. तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. सर्वाधिक ५२ जागांसह शिवसेनेने पुन्हा आपला महापौर बसविला होता. मात्र आता येथील सर्वात मोठा पक्ष शिवसेने सोबत राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादी कोंग्रेसला कल्याण डोंबिवलीत त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण राज्यातील सध्याची कारकीर्द ही समाधानकारक व स्थिर असल्याचे दिसत आहे.

-कुणाल म्हात्रे