कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांना मंडपाचे शुल्क नाही; महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय

‘एक आदर्श घालूया- नियम पाळून श्रीगणेश उत्सव साजरा करु या’ असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. 10 सप्टेंबर ते 19 सप्‍टेंबर या कालावधीत साज-या होणा-या गणेशोत्‍सवाबाबत कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत माहिती देतांना त्यांनी हे आवाहन केले.

कोरोनाचे संकट पाहता यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी साठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तथापि सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनी देखील फायर एनओसी घेणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या वर्षीच्या गणेशोत्सवाकरीता महापालिका सज्ज असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक शाखा यांचा ना-हरकत दाखला, अग्निशमन विभागाच्या ना-हरकत दाखला, म.रा.वि.वि.कं.लिमिटेड यांच्याकडील तात्पुरती परवानगी व पोलिस स्टेशनच्या ना-हरकत दाखला इ. करीता संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत असणा-या स्थानिक पोलिस स्टेशननिहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचा-याची नियुक्ती करुन “एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यात येत असून परवानगीसाठी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असेही ते पुढे म्हणाले.

महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून विसर्जन स्थळी व विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांची त्याचप्रमाणे 2447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील “विसर्जन आपल्या दारी” हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघ‍डीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते बुजविणेबाबतच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती देखील आयुक्तांनी यावेळी दिली.

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच असावी, गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करुन जबाबदारीने, आनंदात पण शिस्तीत त्याचप्रमाणे विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करावा आणि उत्सवादरम्यान जेष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन महापालिका आयुक्तांनी या बैठकीत केले. या ऑनलाईन बैठकीसाठी महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.

-कुणाल म्हात्रे

कल्याण रेल्वे स्थानकात तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणारा वाटमाऱ्या गजाआड

कोरोना काळात राजरोसपणे मारहाण करून लुटणे, हत्यारांचा धाक दाखवणे अशा प्रकारात सर्रास वाढ झाली आहे. रात्री ११  वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली होती. प्रवाशाने आरडा ओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत लुटारूला अटक केली.

निखिल वैरागर असे या चोरट्याच नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा चोख बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

आंबिवली येथे राहणारा तरुण हा २९ ऑगस्ट रोजी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर २  नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या निखिल वैरागर या २१ वर्षीय तरुणाने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.

सुदैवाने लोकलच्या प्रतिक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला आणि त्यांनी आरडा ओरड सुरू केली. यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांच लक्ष गेलं त्यांनी तत्काळ घटना स्थळी धावून येत. तलवार दाखवणाऱ्या निखील या लुटारूला ताब्यात घेतलं. कल्याण जी आर पी मध्ये निखीलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ सतर्क राहून आरोपी याला मुसक्या आवळल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

-रोशन उबाळे

पाच-दहा नाहीत तब्बल इतके मोबाईल फोन कल्याण पोलिसांनी केले परत

नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी परत केले आहेत. मोबाईल परत करण्याची प्रक्रीया सुरुच आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल मोठय़ा प्रमाणात हस्तगत केले आहेत. नागरीकांना हे मोबाईल परत केले जात आहेत. कोरोना काळात वीस वीसच्या टप्प्यात हे मोबाईल परत करण्याचे काम सुरु आहे. आज खडकपाडा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी २० मोबाईल कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहे.

कल्याण खडक पाडा परिसरातील  सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेले  व हारवलेले पाच लाख पंचवीस हजाराचे मोबाईल स्थानिक खडक पाडा पोलीसाच्या  पथकाने शोधले आहेत. खडक पाडा पोलीस अंतर्गत  महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस संयुक्त अनिल पोवार व खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अशोक पवार यांही पोलीस स्थानकात एक पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.

 या पथकात कार्यरत असलेल्या हवालदार सुनिल पवार व कॉन्स्टेबल कुशाल जाधव यांनी मोबाईलचा तांत्रिक  पद्धतीने शोध घेत ठाणे जिल्ह्याच्या विविध ठिकाण हुन ५२ मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 

-कुणाल म्हात्रे