कल्याण बैलबाजार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी; रात्री चालताना नागरिकांचा जीव भांड्यात

कल्याण पश्चिम भागात स्टेशन परिसरा लगत असलेला  बैलबाजार व पत्री पूल रोड हा संवेशीलशील परिसर म्हणून ओळखला जातो. या भागालगत असलेल्या सांगळेवाडी, रहेजा कॉम्प्लेक्स या आतील भागात नेहमीच समाजकंटकांचा वावर असल्याने येथे मारामाऱ्या, छोटी मोठी लुटमार अश्या घटना घडत असतात. अश्या घटनांवर नजर ठेवण्या साठी या भागात सीसीटीव्ही केमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी या भागातील समाजसेवक नईम खान यांनी एका निवेदना द्वारे सिस्टम मॅनेजर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांना केली आहे. या निवेदनाची प्रत महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना देखील पाठवण्यात आली आहे.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैल बाजार प्रभाग क्रमांक ३६ येथे सीसीटीव्ही केमेरे अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. काही समाजकंटक प्रवृत्तीचे लोक हा कल्याण रेल्वे स्थानका जवळचा परिसर असल्याने येथे वावरत आसतात. अश्या लोकांवर नजर ठेवण्या साठी सीसीटीव्ही केमेरे लावणे येथे गरजेचे झाले आहे.
बैल बाजार परिसर येथील सांगळे वाडी, रहेजा कॉम्प्लेक्स येथे हे केमेरे लावल्यास येथून येणाऱ्या जाणाऱ्या अश्या समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवू शकतात.असे केमेरे या परिसरात लावले गेल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते एक चांगले पाऊल उचलले जाईल.

तरी सदर सीसीटीव्ही केमेरे बैल बाजार प्रभागात लावण्याच्या साठी लवकरात लवकर पाऊले उचलावी. या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ही आवश्यक बाब आहे. तरी सकारत्मक विचार करून हे सीसीटीव्ही केमेरे या भागात लावण्याची कृपा करावी ही नम्र विनंती असे समाजसवेक नईम खान यांनी म्हटले आहे.

-रोशन उबाळे

कल्याण डोंबिवलीत ३०० हून अधिक इमारती डीपी रस्त्यात; दावडीतील एक इमारत नेस्तनाबूत

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. या इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या सहा मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई केली. या कारवाई दरम्यान इ प्रभाग अधिकारी भारत पवार, अधीक्षक किशोर खुताडे हे देखील उपस्थित होते. या बांधकामाबाबत वास्तुविशारद संदीप पाटील यांनी तक्रार केली होती.

       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये सुमारे ३०० हून अधिक अशा इमारती आहेत.  अशाच प्रकारे दावडी येथील विकासक मुन्ना सिंग यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक सहा मजल्याच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

        या इमारतीच्या बांधकामाबद्दल तक्रार आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. आज आय आणि इ प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक जॉब प्रेशर मशीन च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. 

       दरम्यान डीपी रोडमधील इमारती निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली असून आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणांवर कारवाई देखील सुरु आहे. यापुढे डीपी रोडवरील बांधकामांवर केवळ तोडक कारवाई न करता हि बांधकामे पूर्णतः निष्कासित केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसी कारवाई पथकाने फोडले इसमाचे डोके? संतप्त नागरीकांची पालिका मुख्यालयात धाव

एकीकडे ठाण्याला फेरीवाल्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण मध्ये महापालिकेच्या कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाने एका जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि जखमी झालेल्या नागरिकांनी केला आहे.  

 कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील बाबाजी चाळ ही धोकादायक झाल्याने ती तोडण्याची कारवाई गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने सुरु केली. यावेळी कारवाईस विरोध केल्या प्रकरणी पथकाने एका ७३ वर्षीय राणा देवराज प्रजापती या चाळकर्याचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ केले असून केडीएमसी प्रशासन बिल्डरच्या दावणीला बांधल्याचा आरोप जखमी झालेल्या नागरीकाने केला आहे. संतप्त झालेल्या चाळकार्यांनी कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान कारवाई पथकाने संबंधित नागरीकाला जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिका:याने केला आहे.

काळा तलाव परिसरात असलेल्या बाबाजी चाळ याठिकाणी पागडी पद्धतीने अनेक नागरिक रहात आहेत. या जागेच्या मूळ मालकाने हि जागा विकासकाला विकसित करण्यासाठी दिली आहे. विकासकाने याठिकाणी हि जागा विकसित करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली असून जागेभवती पत्र्यांचे कुंपण करण्यास सुरवात केली आहे. बहुतांश जागा विकासकाने रिकामी केली असून येथील बाबाजी चाळीतील नागरिकांनी अद्यापही आपली घरे रिकामी केलेली नाहीत. आपल्या घरांच्या जागेपेक्षा कमी जागा विकासक देत असल्याचा आरोप करत हे नागरिक हि जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे जागा मालक आणि विकासकाने पालिका प्रशासनाला हाताशी घेऊन हि चाळ धोकादायक घोषित करून चाळीवर कारवाई सुरु केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. धोकादायक चाळ असल्याची नोटीस देखील मिळाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.    

यासंदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे. त्यांना कारवाई पथकाने मारहाण केली नसून त्यांनी स्वत: स्वत:ला जखमी करुन घेतले आहे. त्याचा व्हीडीओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हीजेटीआयकडून करुन घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे. ठाणे शहरात फेरीवाला पथकाच्या अधिकार्यावर कारवाई दरम्यान हल्ला केल्याची घटना ताजी असताना आत्ता कारवाई दरम्यान नागरीकांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरुन अधिकार्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.

-कुणाल म्हात्रे