विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाचा होतोय कायापालट; खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला कामाचा आढावा

कल्याण लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रेल्वे विषयक कामांचा पाहणी आढावा घेण्याकरिता आयोजित दौऱ्यामध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक बी.के. झा यांच्यासोबत विठ्ठलवाडी स्थानकात जाऊन तेथे सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. सदर कामे आता पूर्णत्वास आली असून या सर्व कामांची पाहणी करुन नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उ.म.पा.चे नगरसेवक धनंजय बोराडे उपस्थित होते.

विठ्ठलवाडी स्थानकात पूर्व दिशेला नागरिकांना जाणे सोयीचे जावे यासाठी तिकिट घर बांधण्यात आले असून येत्या महिन्याभरात ते नागरिकांकरिता खुले करण्यात येणार आहे. विठ्ठलवाडी येथील पूर्व दिशेकडील रस्त्यावरुन स्थानकात जाण्यासाठी थेट पर्याय उपलब्ध करुन तेथे प्रवाशांकरिता २ सरकते जिने (एस्कलेटर्स) बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे एस्कलेटर्स नागरिकांच्या सेवेत रुजू होतील. तसेच अंबरनाथ दिशेकडील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे सोयीचे व्हावे याकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविण्यात आले असून येत्या २० दिवसांत ही सुविधा सुरु होणार आहे.

विठ्ठलवाडी स्थानकातील पादचारी पूल पश्चिमेला उतरण्यात यावा या नागरिकांच्या मागणीची दखल घेत यासाठी प्रयत्नशील राहून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विठ्ठलवाडी स्थानकात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार आहे. या मार्गिकांच्या संरेखनाचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच या पुलासाठीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणच्या खासदारांचा लॉकल मोटरमन केबिनमधून प्रवास; फोटो पाहून वाटेल खासदार चालवताहेत रेल्वेगाडी

शनिवारी कल्याणच्या खासदारांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील रेल्वेचे कामकाज कसे सुरू आहे याबाबत एक पाहणी दौरा केला होता. याचदरम्यान त्यांनी लॉकल मधून प्रवास देखील केला. लॉकलच्या शेवटच्या डब्याच्या केबिनमधून त्यांनी हा प्रवास केला आणि प्रस्तावित कामाची पाहणी केली.

कोविड काळात मध्य रेल्वेने ठाणे जिल्ह्यातील काही स्थानकांची शिल्लक कामे पूर्णत्वास नेली आहेत. ह्याच काळात डोंबिवली स्थानका जवळील कोपर स्थानकात पूर्ण झालेल्या होम प्लॅटफॉर्मची कल्याण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. हा होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्या नंतर या प्लॅटफॉर्मवरून मुंबईकडे तसेच खोपोली, कसारा मार्गाकडे गाड्या सुटतील. या नव्या प्लॅटफॉर्म नंतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र पाचव्या आणि सहाव्या लाइन चे काम येत्या फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस चा वेग वाढणार आहे आणि लोकल लाइनचा होणारा खोळंबा होणार नाही अस मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

-संतोष दिवाडकर

“कल्याण डोंबिवलीत भाजपची सत्ता येणार”; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा दावा

महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकासकामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले.

कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या स्व लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

या उद्यानात तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची साहित्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे