कल्याण फाटा – महापे उड्डाण पूल ४ लेन करण्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून कल्याणफाटा-महापे उड्डाण पूल ४ लेन करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ऐरोली काटई एलिव्हेटेड प्रकल्पातल्या अडचणी दूर झाल्या असून   शिळफाटा येथे लवकरच उड्डाणपुलाचे तर  कल्याणफाटा येथे अंडरपास व उड्डाणपुलाच्या कामास ऑक्टोबर पासून सुरवात होणार आहे.

नगरविकासमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, एम.एम.आर.डी.ए. आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघात  एम.एम.आर.डी.ए.च्या अंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात आली. ऐरोली काटई मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचे काम वेगात सुरु असून ऐरोली बाजूस असलेल्या बोगदातल्या मार्गात “विजेच्या टॉवर” (ट्रान्समिशन टॉवरमुळे) कामांमध्ये अनेक अडचणी सामोरे जावे लागत होते. आज बैठकीत सदर टॉवर दुसऱ्या जागी हलवण्यासाठी वनविभागाने मंजुरी दर्शवली असून टॉवरची पर्यायी जागा वनविभागातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 ह्या एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवीमुंबई आणि कल्याण-डोंबिवली हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ह्या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मी. मध्ये पार करणे शक्य होणार आहे. “ऐरोली ते मुंब्रा येथील व्हायजंक्शन पर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

कल्याण फाटा व शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी ह्यासाठी कल्याण शिळफाटा येथे उड्डाणपूल व कल्याणफाटा येथे अंडरपास आणि ओव्हरब्रिजचे काम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल. कल्याण फाटा येथे ग्रेड सेपरेशन  ह्या प्रणाली द्वारे मुंब्रा बायपास  येथून येणारी वाहतूक अंडरपास द्वारे तळोजा-पनवेल मार्गाकडे जाण्यास मदत होईल व डोंबिवली-नवीमुंबई वाहतुकीसाठी कल्याणफाटा येथेच उड्डाणपुलाच्या उभारणी करण्यात येणार आहे.

 कल्याणफाटा येथील उड्डाणपुलासाठी शिळफाटा-महापे मार्गातल्या एम. आय. डी. सी. च्या पाईपलाईन पर्यायी जागी स्थलांतरित करणे गरजेचे होते परंतु पाईपलाईन स्थलांतरित करणे अतिशय खर्चिक असल्या कारणाने कल्याण फाटा येथील उड्डाणपुलाचे अलाईंगमेंट बदलण्यात येणार आहे व हा उड्डाणपूल महापे येथील एम.आय.डी.सी. ची पाईपलाईन ओलांडून महापे-शिळफाटा  मार्गावरच उतरवण्यात येईल. सुमारे ९० कोटीचा हा उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा अश्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व ४ लेन साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास एम.एम.आर.डी.ए. च्या आयुक्तांनी संमती दर्शवली आहे.

४ लेन उड्डाणपुलाच्या कल्याणफाटा येथील वाढीव जमीन अधिग्रहणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी बैठकीत सांगितले. पत्रीपूल व दुर्घडी किल्ल्याजवळील खाडीपुलाच्या उभारणी नंतर निळजे येथील उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रगतीपथावर आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत सुरू होणार पासपोर्ट सेवा केंद्र; जवळच्या शहरातील नागरिकांना दिलासा

कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सन २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली व लवकरात लवकर हे केंद्र सुरू व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे नेहमीच तत्पर होते. परंतु जागेअभावी सदर पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब होत होता, त्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश प्राप्त झाले, परंतु त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाला. त्यासाठी खा. शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली असता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी दिरंगाई न करता लवकरच लवकरच पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु करण्याचे आश्वासित केले. आणि ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याचे संचार राज्य मंत्रालयाकडून खा. डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवंगत परराष्ट्रमंत्री मंत्री स्वराज यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली एम आय डी सी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली. यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालय व टपाल खात्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे.

       ठण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एम एम आर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

-कुणाल म्हात्रे