कल्याण डोंबिवलीत ३०० हून अधिक इमारती डीपी रस्त्यात; दावडीतील एक इमारत नेस्तनाबूत

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. या इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या सहा मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई केली. या कारवाई दरम्यान इ प्रभाग अधिकारी भारत पवार, अधीक्षक किशोर खुताडे हे देखील उपस्थित होते. या बांधकामाबाबत वास्तुविशारद संदीप पाटील यांनी तक्रार केली होती.

       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये सुमारे ३०० हून अधिक अशा इमारती आहेत.  अशाच प्रकारे दावडी येथील विकासक मुन्ना सिंग यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक सहा मजल्याच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

        या इमारतीच्या बांधकामाबद्दल तक्रार आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. आज आय आणि इ प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक जॉब प्रेशर मशीन च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. 

       दरम्यान डीपी रोडमधील इमारती निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली असून आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणांवर कारवाई देखील सुरु आहे. यापुढे डीपी रोडवरील बांधकामांवर केवळ तोडक कारवाई न करता हि बांधकामे पूर्णतः निष्कासित केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसी कारवाई पथकाने फोडले इसमाचे डोके? संतप्त नागरीकांची पालिका मुख्यालयात धाव

एकीकडे ठाण्याला फेरीवाल्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण मध्ये महापालिकेच्या कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाने एका जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि जखमी झालेल्या नागरिकांनी केला आहे.  

 कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील बाबाजी चाळ ही धोकादायक झाल्याने ती तोडण्याची कारवाई गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने सुरु केली. यावेळी कारवाईस विरोध केल्या प्रकरणी पथकाने एका ७३ वर्षीय राणा देवराज प्रजापती या चाळकर्याचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ केले असून केडीएमसी प्रशासन बिल्डरच्या दावणीला बांधल्याचा आरोप जखमी झालेल्या नागरीकाने केला आहे. संतप्त झालेल्या चाळकार्यांनी कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान कारवाई पथकाने संबंधित नागरीकाला जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिका:याने केला आहे.

काळा तलाव परिसरात असलेल्या बाबाजी चाळ याठिकाणी पागडी पद्धतीने अनेक नागरिक रहात आहेत. या जागेच्या मूळ मालकाने हि जागा विकासकाला विकसित करण्यासाठी दिली आहे. विकासकाने याठिकाणी हि जागा विकसित करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली असून जागेभवती पत्र्यांचे कुंपण करण्यास सुरवात केली आहे. बहुतांश जागा विकासकाने रिकामी केली असून येथील बाबाजी चाळीतील नागरिकांनी अद्यापही आपली घरे रिकामी केलेली नाहीत. आपल्या घरांच्या जागेपेक्षा कमी जागा विकासक देत असल्याचा आरोप करत हे नागरिक हि जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे जागा मालक आणि विकासकाने पालिका प्रशासनाला हाताशी घेऊन हि चाळ धोकादायक घोषित करून चाळीवर कारवाई सुरु केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. धोकादायक चाळ असल्याची नोटीस देखील मिळाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.    

यासंदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे. त्यांना कारवाई पथकाने मारहाण केली नसून त्यांनी स्वत: स्वत:ला जखमी करुन घेतले आहे. त्याचा व्हीडीओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हीजेटीआयकडून करुन घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे. ठाणे शहरात फेरीवाला पथकाच्या अधिकार्यावर कारवाई दरम्यान हल्ला केल्याची घटना ताजी असताना आत्ता कारवाई दरम्यान नागरीकांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरुन अधिकार्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांना मंडपाचे शुल्क नाही; महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय

‘एक आदर्श घालूया- नियम पाळून श्रीगणेश उत्सव साजरा करु या’ असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. 10 सप्टेंबर ते 19 सप्‍टेंबर या कालावधीत साज-या होणा-या गणेशोत्‍सवाबाबत कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत माहिती देतांना त्यांनी हे आवाहन केले.

कोरोनाचे संकट पाहता यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी साठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तथापि सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनी देखील फायर एनओसी घेणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या वर्षीच्या गणेशोत्सवाकरीता महापालिका सज्ज असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक शाखा यांचा ना-हरकत दाखला, अग्निशमन विभागाच्या ना-हरकत दाखला, म.रा.वि.वि.कं.लिमिटेड यांच्याकडील तात्पुरती परवानगी व पोलिस स्टेशनच्या ना-हरकत दाखला इ. करीता संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत असणा-या स्थानिक पोलिस स्टेशननिहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचा-याची नियुक्ती करुन “एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यात येत असून परवानगीसाठी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असेही ते पुढे म्हणाले.

महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून विसर्जन स्थळी व विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांची त्याचप्रमाणे 2447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील “विसर्जन आपल्या दारी” हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघ‍डीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते बुजविणेबाबतच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती देखील आयुक्तांनी यावेळी दिली.

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच असावी, गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करुन जबाबदारीने, आनंदात पण शिस्तीत त्याचप्रमाणे विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करावा आणि उत्सवादरम्यान जेष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन महापालिका आयुक्तांनी या बैठकीत केले. या ऑनलाईन बैठकीसाठी महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.

-कुणाल म्हात्रे

कल्याण रेल्वे स्थानकात तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणारा वाटमाऱ्या गजाआड

कोरोना काळात राजरोसपणे मारहाण करून लुटणे, हत्यारांचा धाक दाखवणे अशा प्रकारात सर्रास वाढ झाली आहे. रात्री ११  वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली होती. प्रवाशाने आरडा ओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत लुटारूला अटक केली.

निखिल वैरागर असे या चोरट्याच नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा चोख बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

आंबिवली येथे राहणारा तरुण हा २९ ऑगस्ट रोजी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर २  नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या निखिल वैरागर या २१ वर्षीय तरुणाने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.

सुदैवाने लोकलच्या प्रतिक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला आणि त्यांनी आरडा ओरड सुरू केली. यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांच लक्ष गेलं त्यांनी तत्काळ घटना स्थळी धावून येत. तलवार दाखवणाऱ्या निखील या लुटारूला ताब्यात घेतलं. कल्याण जी आर पी मध्ये निखीलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ सतर्क राहून आरोपी याला मुसक्या आवळल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

-रोशन उबाळे

पाच-दहा नाहीत तब्बल इतके मोबाईल फोन कल्याण पोलिसांनी केले परत

नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी परत केले आहेत. मोबाईल परत करण्याची प्रक्रीया सुरुच आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल मोठय़ा प्रमाणात हस्तगत केले आहेत. नागरीकांना हे मोबाईल परत केले जात आहेत. कोरोना काळात वीस वीसच्या टप्प्यात हे मोबाईल परत करण्याचे काम सुरु आहे. आज खडकपाडा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी २० मोबाईल कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहे.

कल्याण खडक पाडा परिसरातील  सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेले  व हारवलेले पाच लाख पंचवीस हजाराचे मोबाईल स्थानिक खडक पाडा पोलीसाच्या  पथकाने शोधले आहेत. खडक पाडा पोलीस अंतर्गत  महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस संयुक्त अनिल पोवार व खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अशोक पवार यांही पोलीस स्थानकात एक पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.

 या पथकात कार्यरत असलेल्या हवालदार सुनिल पवार व कॉन्स्टेबल कुशाल जाधव यांनी मोबाईलचा तांत्रिक  पद्धतीने शोध घेत ठाणे जिल्ह्याच्या विविध ठिकाण हुन ५२ मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 

-कुणाल म्हात्रे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांचा कल्याण डोंबिवली दौरा

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस माधव मुंडे यांनी सोमवारी कल्याण डोंबिवली दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. मात्र त्यांचा हा दौरा राजकीय नसून सदिच्छ भेटीचा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तसेच बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय तसेच खंदे समर्थक म्हणून माधव मुंडे यांची परळी तालुक्यात एक वेगळी ओळख आहे. कल्याण मधील त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन सोनवळे यांच्या विनंतीखातीर त्यांनी हा कल्याण डोंबिवली दौरा केला होता.

सोमवारी सायंकाळी आर पी सेक्युरिटी सर्व्हिसेसच्या कार्यालयात श्री शिव साई प्रतिष्ठाण कडून त्यांचे कल्याण नगरीत स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक चंद्रसेन सोनवळे, ठाणे जिल्हाध्यक्ष ताराचंद सोनवणे, सचिव मंगेश बाईत, दीपक मोरे, अमित होरंबे, रोशन बाईत, शंकर गंगासागरे, विजय पवार, गणेश सोनवणे व महिला उपस्थित होत्या. यावेळी समस्त मित्रपरिवाराच्या हस्ते शाल श्रीफळ तुळशीच रोपट देऊन मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच उपस्थितांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

समाजसेवक अरुण गवळी स्थापित अखिल भारतीय सेनाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश दाखिनकर यांच्या कार्यालयाला देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दाखिनकर यांनी देखील त्यांचे सहर्ष स्वागत केले. पुष्पगुच्छ व साईंची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिवसेना उपशहर संघटक दिलीप दाखिनकर, शास्त्रीनगर शाखाप्रमुख अजित चौगुले यांनी आई प्रतिष्ठानच्या कार्यालयात देखील त्यांचे स्वागत केले.

कोळसेवाडी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली सार्वजनिक ग्रंथालयाला देखील भेट देण्यात आली. संचालक सहाने सर आणि राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राहुल महाजन यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी काही वाचक वर्ग तसेच शिवभक्त त्यांच्या स्वागतार्ह उपस्थित होते. राजे प्रतिष्ठाण कडून महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या निर्मनीत समाधी स्थळांचा आराखडा दाखवून त्यांना माहिती देण्यात आली. याबाबत शासन दरबारी हा प्रस्ताव मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी राजे प्रतिष्ठाणला कळवले तसेच वाचनाप्रति असलेली आवड आणि महत्त्व देखील उपस्थित वाचकांना पटवून दिले.

माधव मुंडे यांनी कल्याण दौरा संपवून पुढे डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव तेजस पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी काही युवक व युवती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. व त्यानंतर छत्रपती शिवरायांची मूर्ती त्यांना भेट स्वरूपात दिली गेली. उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

-संतोष दिवाडकर

माधव मुंडे यांचा कल्याण डोंबिवली दौरा
धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला; कोळसेवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू

किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून कल्याणमध्ये भर रस्त्यात टवाळखोरांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिस यंत्रणा या टवाळखोरांना आवरण्यात कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे यांना आवर घालण्यासाठी परिसरात गस्त मारण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. चौकाचौकात पोलीस दिसल्यास अपराधीक कृती दहशत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण पूर्व भागातील काका ढाबा परिसरात काही तरुणानी कापड दुकान चालविणाऱ्या संतोष प्रजापती आणि विजय दुबे या दोघांवर धारदार शस्त्र आणि काठीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विजय आणि संतोष हे दोघे दुकान बंद करुन पानाच्या टपरीवर पान खाण्यासाठी गेले होते. त्याच ठिकाणी काही तरुणांशी धक्का लागण्यावरुन या दोघांचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणारीत झाले. टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात विजय आणि संतोष हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णलायात उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून चक्कीनाका, खडेगोळवली, चिकणीपाडा, काकाचा ढाबा परिसरात टवाळखोर गुंडांची दहशत खूपच वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून वाढणाऱ्या घटनांवर आवर घालावे अशी प्रतिक्रिया व्यापारी विजय दुबे दिली आहे.

-रोशन उबाळे