डॉ.आनंद कासवेकर यांना आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी शांति पुरस्कार; ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन तर्फे सन्मान

ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन ने या वर्षी आंतरराष्ट्रीय पीस अवार्ड चे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील संविधान सभा (कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया ) येथे २ ऑक्टोबर रोजी केले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमात टिटवाळयातील युवा उद्योजक डॉ.आनंद कासवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते “महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२१” देऊन गौरविण्यात आले.

टिटवाळा येथील जय भवानी इंटरप्राइजेस व जे बी ग्रुप कंपनीचे डायरेक्टर डॉ. आनंद कासवेकर यांनी ‘रियल इस्टेट डेव्हलपर्स’ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. युवकांना त्यांनी रोजगार प्राप्त करून देऊन त्यांना रिअल इस्टेट बद्दल मार्गदर्शन करून स्वयंसिद्ध केले. कोरोना काळात बरेच लोकउपयोगी कार्य त्यांनी केले.

हा पुरस्कार संपूर्ण भारतातील सामान्य जीवन ते त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या मान्य वरांना दिला जातो. अशा मान्यवरांना ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन हि संस्था त्यांना पुढिल उंतुग प्रवासा साठि कौतुकाची थाप म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित करतात. हि संस्था २००८ पासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार देऊन दर वर्षी २आॉक्टबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

डॉ. आनंद कासवेकर हे गेली २००८ पासुन रिअल इस्टेट & डेव्हलपर या क्षेत्रात काम करत आहे.
२००८ मध्ये एक रिअल इस्टेट एजंट म्हणुन मुंबई मध्ये काम चालू केले ते २०१४ पर्यंत ते पुर्ण महाराष्ट्रभर काम करु लागले. महाराष्ट्रात कुठे ही एखाद्या ग्राहकाला जमीन /घर खरेदी करायचे असेल तर त्याची आपण उपलब्धता करुन देतो. तसेच घर,बंगला,फार्म हाऊस यांचे ही बांधकाम त्यांची कंपनी करते. २०१४ नंतर त्यांनी महाराष्ट्र बाहेर ही कामे करायला सुरुवात केली. आता संपूर्ण भारतात मी माझ्या सर्व सामान्य ग्राहक ते श्रीमंत यांना सेवा देण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे मी सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या बजेट नुसार घरांची उपलब्धता करुन देतो. असे त्यांनी या वेळी सांगितले. घनःश्याम कोळंबे (एम्पॉवर ट्रेनर प्रा. लि.), सुरट माटे (ट्रेडिंग सर्विसेस), डॉ राज काले (इंटरनेशनल ट्रेनर), राजेश वारणकर यांची विशेष साथ त्यांना मिळाली.

-जैनेन्द्र सैतवाल

दीड वर्षांची धूळ उडाली; कल्याण डोंबिवलीमध्ये शाळा-कॉलेजच्या बाकांवर विद्यार्थी पुन्हा विराजमान

आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.

कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु  करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार शाळा कॉलेज उघडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला.

वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे शाळा कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

तब्बल दीड वर्षानंतर कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातही शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा व्यवस्थापनाच्या विद्यमाने या शाळेच्या शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात  विद्यार्थ्यांवर पुष्प उधळून व औक्षण करून जंगी स्वागत केले. इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी फक्त घड्याळी तीन तासाचे  वर्ग भरविले जाणार असून विद्यार्थ्यांचे काही दिवस समोपदेशन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शासन परिपत्रकाप्रमाणे  सर्व अटी शर्तीचे पालन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आल्यावर काही विद्यार्थी भावूक होऊन त्यांचे डोळे आनंद अश्रूने ओले झाल्याचे दिसून आले.

-कुणाल म्हात्रे

      

‘आयपीएल’ सामन्यांवर सट्टेबाजी; उल्हासनगरात तीन बुकींना अटक

उल्हासनगर मध्ये आयपीएल सामन्यावर बेटिंग केल्याप्रकरणी तीन बुकींना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आणि उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. २ ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदरच्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील थारासिंग दरबार शेजारी असलेल्या ‘माँ बजाज व्हिला’ या बंगल्यात ठाणे पोलिसांच्या सेंट्रल युनिटने शनिवारी संध्याकाळी धाड टाकली. यावेळी या बंगल्यात ‘आयपीएल’च्या सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली कॅपिटल्स या खेळल्या जाणा-या क्रिकेट सामन्यावर बेटिंग नावाचा जुगार खेळला जात असताना तीन बुकींना पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा असे या ताब्यात घेतलेल्या बुकींची नावे आहेत.

पोलिसांना घटनास्थळी लॅपटॉप, मोबाईल फोन, ट्रान्समिशन मशिन, इंटरनेट राउटर आदी साहित्याचा वापर करून मोबाईलवर लाईव्ह चालू असलेल्या लाईव्ह क्रिकेट मॅचवर खेळणा-या आणि खेळविणा-या इसमांशी संपर्क साधून हवाला व्दारे व गुगल पे व्दारे क्रिकेट बेटिंग घेवून लॅपटॉप वर जे.एम. डी. खेल खेल खेल या नावाच्या लेजर सॉफ्टवेअर नोंद केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

पोलिसांनी बुकींकडून एकूण २५ लाख रुपये रोख, एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले. हि कारवाई दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत सदरच्या बंगल्यात सुरू होती. या प्रकरणी उल्हासनगर च्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणूक कायदा, आय टी ऍक्ट आणि जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर