कल्याण रामबाग जोशीबाग परिसरात साप आणि घोरपडीचा सुळसुळाट

कल्याण :- मागील काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील रामबाग व जोशीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात साप व घोरपड आढळून येत आहेत. याच भागात मच्छी मार्केट आणि पोलीस वसाहतीच्या पडीक खोल्या असल्याने यांचा वावर असावा असा तर्क लावला जात आहे. नेहमीच साप आणि घोरपड दृष्टी क्षेपात येते असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील आठवड्यात या परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र सतीश बोबडे यांनी घोरपड पकडल्या असून एक घोरपड चार फुटाची दुसरी घोरपड दीड फुटाची आहे. परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घोरपड शिरल्याची माहिती सतीश बोबडे यांना मिळताच त्यांनी दोन्ही घोरपडी पकडून वन विभाग अधिकारी यांच्या स्वाधीन केले आहे.

सर्पमित्र सतीश बोबडे यांच्या माहितीनुसार स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस लाईन मध्ये लोकवस्ती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून यामध्ये सरपटणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची वाढ झाली आहे. तेथूनच हे घोरपड व साप लोकवस्तीमध्ये येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नेहमीच या भागात स्वच्छता आणि औषध फवारणी केल्यास वन्यजीव प्राण्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.

-रोशन उबाळे

‘वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोठ्या गृहप्रकल्पांच्या ठिकाणी अंडरपास अथवा उड्डाणपूल पुल उभारा’; मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : मेगा टाऊनशिपला परवानगी देताना भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीकोनातून संबंधित विकासकाला प्रकल्प ठिकाणी अंडरपास अथवा उड्डाणपूल करणे बंधनकारक करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

  राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु असून कल्याण ग्रामीण मतदारसंघातही लोढा पलावा, रुणवाल मायसिटी, रुणवाल गार्डन, अनंतम् रिजन्सी सारखे मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु आहेत. त्यातील काही प्रकल्प कार्यरत झाले आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील लोकवस्ती भरमसाठ वाढली आहे.तसेच हे सर्व प्रकल्प रेल्वे लोकल सेवेपासून लांब असल्यामुळे यामध्ये राहणारे बहुतांश रहिवासी नोकरी-व्यवसायानिमित्त रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना जोडणाऱ्या कल्याण-शिळ व काटई-बदलापूर-तळोजा रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी असते त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून तसे पत्रही दिले आहे.

सध्या लोढा पलावा, कासा रिओ, रुणवाल गार्डन, रुणवाल मायसिटी, अनंतम् रिजन्सी हे सर्व मेगा टाऊनशिप प्रकल्प कल्याण-शिळ रस्त्याला जोडण्यात आले आहेत. तर लोढा लेकशोर प्रकल्प काटई-बदलापूर रस्त्याला जोडण्यात आला आहे. ज्या प्रकल्पांमध्ये प्रवेश करण्यासाठी बायपासही उपलब्ध नाही. आधीच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अबरनाथ, उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्याशिवाय पर्याय नसून या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचा आहे, त्यातच आता अधिक भर पडत आहे.

अशा मेगा टाऊनशिपला परवानगी देताना परिसरात वाढणारी लोकवस्ती गृहीत धरुन प्रकल्पाच्या ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास करणेबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. तसे न केल्याने आज मुख्य रस्त्यावर वाहतुककोंडी होताना दिसते. प्रकल्प कार्यरत होऊन १०-१० वर्षे झाली तरी उड्डाणपूल किंवा अंडरपास मंजूर होत नाही व मंजूर झाल्यास निधी अभावी पूर्ण होण्यास पुढील १० वर्षाचा काळ लागतो. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना सततच्या वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो आहे, तोपर्यंत विकासक प्रकल्प पूर्ण करुन निघून गेलेले असतात. तरी या महत्त्वाच्या विषयावाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा कारण हा प्रश्न केवळ कल्याण ग्रामीण मतदार संघापुरता मर्यादित नाही.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील विविध शहरांमध्ये असे प्रकल्प सुरु आहेत आणि सगळीकडे अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत व भविष्यात होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांसह स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तरी याबाबत तातडीने निर्णय घेतला पाहिजे व मेगा टाऊनशिपसाठी परवानगी देताना वाहतुक कोंडीच्या दृष्टीकोनातून विकासकाला प्रकल्प ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास बंधनकारक करावा व त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विकासकांना सदर प्रकल्पामध्ये द्यावा असे आमदार यांचे म्हणणे असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीतर्फे १८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन लसीकरण

कल्याण : सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केल्या नुसार “युवा स्वास्थ कोविड-१९  च्या लसीकरण मोहिमेचे नियोजन” कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फतही करण्यात येत असून आता महापालिका क्षेत्रातील १८  वर्षावरील महाविदयालयीन विदयार्थी/ विदयार्थींनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच लसीकरण आता प्रत्यक्ष महाविदयालयात जावून केले जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातून तेथील विदयार्थी व इतर कर्मचारी वर्गाची यादी प्राप्त करुन त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत त्यांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे.

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकुण ८ लाख ९८ हजार ९० नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली असून एकुण ४ लाख ४९ हजार ४६ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली असून आतापर्यंत १३ लाख ४७ हजार १३६ इतके लसीकरण महापालिका क्षेत्रात झाले आहे. लसीकरणास अधिकाधिक चालना देण्यासाठी भारतातील शंभर कोटी लसीकरण टप्पा पूर्णत्वाचे औचित्य साधून महापालिकेच्या महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या शंभराव्या लाभार्थ्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रावर १००  करोड लसीकरण उत्सवाचा टप्पा संपन्न करण्यात आला.

कोविड लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. तसेच लसीकरण केल्याने संबंधीत व्यक्तीस संसर्गाचा धोका कमी असतो आणि त्यास कोविड झाल्यास त्याचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात राहतो. तसेच कोविड लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. महापालिकेत आता मुबलक प्रमाणात लस साठा शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद दिल्यास महापालिका क्षेत्रातील कोविडचा संसर्ग कमी होण्यास तसेच येणा-या तिस-या लाटेला थोपविण्यास मदत होऊ शकेल.

 तरी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरा नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले कोविड लसीकरण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात किंवा घराशेजारी आजारी, वृध्द नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित राहिले असल्यास त्याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राकडे कळवावी म्हणजेच या नागरिकांच्या घरी जावून त्यांचे लसीकरण महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत केले जाईल.

-कुणाल म्हात्रे