डोंबिवलीत निष्कासित केलेली अनधिकृत इमारत पुन्हा राहिली उभी; पडद्याआड चाललेलं बांधकाम ‘ग’ प्रभागाला दिसेना ?

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महापालिकेत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणीपुरवठा न देण्याचे ठरवले आहे. मात्र छुप्या पद्धतीने पालिका आयुक्तांना चकवा देऊन अधिकारीवर्ग त्यांच्या आदेशांना बगल देण्याचे काम करीत आहे की काय असा प्रश्न आता पडू लागला आहे.

डोबिवली पूर्वेतील दत्ता नगर भागात पालिकेने इमारती वर एप्रिल महिन्यात तोडक कारवाई केली होती. अनधिकृत बांधकाम केले म्हणून तोडण्याचा खर्च बांधकाम व्यावसायिकाकडून घेतला. यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रभाग अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक प्रफुल गोरे यांना नोटीसही बजावली होती. असे असताना आता सद्य स्थितीत त्या शासकीय भूखंडावर नव्याने तळमजला +३ बांधून पडद्याआड उभे आहेत. कायदेनियम धाब्यावर बसवून कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे? अशी चर्चा परिसरात केली जात आहे. संबंधित बांधकाम मोक्याच्या ठिकाणी आणि नेहमीच रहदारीचे असून ‘ग’ प्रभाग कार्यालयाला का दिसून आले नाही? लोकप्रतिनिधीना कसलीही माहिती कशी नाही? हा आश्चर्यकारक विषय आहे. यात प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्त प्रसारित करू नये म्हणून २० ते २५ हजाराची बिदागी देऊन त्यांचे तोंड बंद केले असल्याच्या देखील चर्चा जोरात सुरू आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित बांधकाम दिसत नसावे असेही म्हटले जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील ‘ग’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कायदे नियम पायदळी तुडविले जाऊन बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. याच बांधकामावर काही महिन्यापूर्वी तोडक कारवाई करण्यात आली होती. या बांधकामाला कुठलीही पालिकेची परवानगी नव्हती तीच इमारतीचे मोठ्या जोमाने मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे बांधकाम सुरू आहे. सद्यस्थितीत ग्राउंड प्लस थ्री बांधकाम पूर्णही झाले आहे. शासकीय भूखंडावर उभी राहणारी इमारत तोडली असताना कुठलेही नियम कायदे न पाहता केवळ रेड कार्डच्या आधारे इमारत उभी राहत असल्याचे मानले जात आहे.

यात चक्क डोंबिवलीतील कर्मचारीच बांधकाम व्यावसायिक कडून पैसे घेऊन बिदागी सारखे वाटप करत आहे असे बोलले जात आहे. आणि यात काही माध्यम प्रतिनिधी तसेच प्रसिद्धी प्रमुखांनी दहा ते वीस हजार घेऊन बातम्या दाबण्याचे ठरवले आहे असे देखील म्हटले जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी आणि चौथ्या स्तंभा साठी लाजिरवाणी आहे. चांगले काम करणाऱ्या प्रतिनिधी आणि वार्ताहरा साठी येणारा काळ घातक ठरणार आहे याची थोडी सुद्धा खंत काही वेठबिगरीना नसून ही शरमेची बाब आहे. हा प्रकार खरंच घृणास्पद आणि चीड आणणारा आहे.

हा प्रकार ‘ग’ प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांच्या लक्षात आणून दिला गेला. दरम्यान त्यांनी याप्रकरणी ४७८ अनवये नोटीस बजावली असून चार-पाच दिवसात पोलीस आरक्षण मिळाल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने तोडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. याबाबत पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

-रोशन उबाळे

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला इसम पॉजिटीव्ह; ओमीक्रॉन बाबत दक्षता घेण्याचं पालिका आयुक्तांच आवाहन

डोंबिवली : दक्षिण आफ्रिका येथून आलेला एक ३२ वर्षाचा इसम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेस संबंधित लॅब कडून प्राप्त होताच या व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या इसमाच्या ८ जवळच्या नातेवाईकांची करोना चाचणी केली असता त्यांचे सर्वांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले असून सदर बाब दिलासादायक आहे. तर या विषाणूचा धोका लक्षात घेता मास्क परिधान न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. परदेशात इतरत्र ओमीक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता, महानगरपालिका क्षेत्रातही महापालिकेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा व आपले कोविड लसीकरण वेळीच करून घ्यावे व संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत न घाबरता पुरेपुर खबरदारी व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या  मार्फत करण्यात आले आहे.

हा विषाणू आत्यंतिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सदर विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर कुठेही फिरतांना नाक व तोंड झाकेल अशा पध्दतीने मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या नागरिकांवर त्याचप्रमाणे एखादया दुकानामध्ये, मॉलमध्ये विना मास्क येणा-या नागरिकांवर तसेच संबंधित दुकानदारांवर  कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

-कुणाल म्हात्रे