कल्याण डोंबिवलीत पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग १५ डिसेंबर पर्यंत बंद

कल्याण :- राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात केडीएमसीच्या शालेय समितीची बैठक केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. नवीन येणाऱ्या व्हेरीयंटचा अंदाज घेऊन नियोजन करता येईल असे प्रशासनाचे धोरण असू शकते.

या बैठकीत सध्याच्या परिस्थितीतील कोविड -१९ प्रादुर्भाव व जागतिक पातळीवर आलेला कोविड -१९ चा नवीन व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार यावर चर्चा करण्यात आली. कोविड -१९ चा व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरु न करता १५ डिसेंबर २०२१ पर्येंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान १५ डिसेंबर नंतर कोविड-१९ ओमीक्रोनच्या प्रसाराबाबतची त्या वेळची स्थिती लक्ष्यात घेउन समितीचे पुन्हा बैठक घेऊन पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करायचे कि नाही हे ठरविण्यात येईल असा निर्णय सुद्धा झालेल्या या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे तूर्तास कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा ह्या १५ डिसेंबर पर्येंत बंद राहतील हे स्पष्ट झाले आहे.

-रोशन उबाळे

डोंबिवलीत भरपावसात महिलांची सायकल रॅली; महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला अभिमान

डोंबिवली :  हिरकणी प्रतिष्ठानचा सायकल रॅलीचा उपक्रम अतिशय अभिमानास्पद आहे. असे उदगार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हिरकणी प्रतिष्ठान व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने डोंबिवली पूर्व येथील कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकापासून महिलांच्या “सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले आणि या सायकल रॅलीस शुभेच्छा दिल्या. या सायकल रॅलीत भर पावसातही सुमारे ७५ महिलांनी आपापल्या सायकलींसह अत्यंत उत्साहात आपला सहभाग दर्शविला होता. या रॅलीमध्ये महिलांसमवेत लहान मुलींची देखील उपस्थिती लक्षणिय होती.

रॅलीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कॅ. विनयकुमार सच्‍चान स्मारकास पुष्पांजली वाहिली. यावेळी महापालिका आयुक्त तसेच बँक‍ ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर देवदत्त रोकडे, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर संजय जाधव व इतर मान्यवरांचा हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ व सचिव पूजा तोतला यांच्याहस्ते फुलांचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: उपस्थित राहून रॅलीमधील महिलांना शुभेच्छा दिल्यामुळे आमचा उत्साह व हुरुप द्विगुणित झाला असे भावोद्गार हिरकणी प्रतिष्ठानच्या  सचिव पूजा तोतला यांनी यावेळी व्यक्त केले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची रिपरिप

कल्याण :- कल्याण डोंबिवली व आसपासच्या शहरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात सकाळपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. जवळपास ८ तासांपेक्षा जास्त काळापासून पाऊस नॉन स्टॉप पडत आहे. यामुळे नक्की डिसेंबर आहे की जून असा संभ्रम निर्माण झाला आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम मानला जातो. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिना हिट देतो आणि नोव्हेंबर पासूनच थंडीला सुरुवात होते. मात्र वाढलेल्या जागतिक तापमानानुसार डिसेंबर मध्येही फारशी थंडी जाणवत नाही. ज्याठिकाणी झाडी झुडूप असतील तितक्याच भागात थंडी जाणवते. कल्याण डोंबिवली सारख्या गर्दीच्या शहरी भागात थंडी फक्त सकाळच्या सुमारासच जाणवते. परंतु याच थंडीच्या दिवसांत पावसाळ्यात पडतो अगदी तसा पाऊस दिवसभर पडताना दिसत आहे.

कल्याण डोंबिवली शहरात सकाळपासून पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. स्वेटर काढून रेनकोट घालण्याची पाळीच अक्षरशः आलेली आहे. त्यात पालिका क्षेत्रात काही शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना देखील जून महिन्याचा आभास झाला. यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड मिम्स आणि विनोद पसरत आहेत. हिवाळ्या नंतर डायरेक्ट पावसाळा सुरू झाला आहे मग उन्हाळा गेला कुठं ? अश्या पद्धतीचे विनोद सध्या वाचायला मिळत आहेत. तर काहींनी पुन्हा एकदा पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखला. तर काहींनी घरच्या घरी गरमागरम भजी बनवण्याला पसंदी दिली. त्यामुळे वेळी असो की अवकाळी पाऊस पाऊस आहे.

-संतोष दिवाडकर