कल्याण मध्ये भरली माणुसकीची शाळा

कल्याण :  कल्याण मध्ये माणुसकीची शाळा सुरु झाली असून शाहीर संभाजी भगत यांनी हि माणुसकीची शाळा घेतली. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे राजू काऊतकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माणुसकीची शाळा ही संकल्पना शाहिरी जलसाचे निर्माते लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांच्या हस्तेच या माणूसकीच्या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक माणुसकिचे दुत यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीर संभाजी भगत यांनी माणुसकीची शाळा या संकल्पनेवर बोलत असतांना सांगितले कि, प्रत्येक समाजामध्ये माणसातील माणूसपण कमी होत चालले आहे. समाजात वावरताना समाजामध्ये फूट पडलेली जाणवत आहे. जात धर्म पंथ याचे याचे जोडे बाहेर काढून माणसांनी माणसातील माणुसकी जतन केली पाहिजे. या देशात एक मिनिटांत सोळा लोक आत्महत्या करीत आहेत. असे एका तज्ञानी हे मत व्यक केले आहे. कारण माणसावर येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या ताण तणाव निर्माण होऊन या घटना घडत आहेत. म्हणून प्रत्येक माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे.

या देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे माणसांना बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ आली असून यामुळे माणसं  डिप्रेशनमध्ये जात आहेत. माणुसकीच्या शाळेमध्ये फक्त एका विशिष्ट जातीपूर्ती मर्यादित नसून सर्व जाती धर्माच्या  लोकांपर्यंत ही माणुसकीची शाळा पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामध्ये नवतरुण महिला आणि आबालवृद्ध यांची देखील शाळा सुरू केली असल्याचे भगत यांनी सांगितले.यावेळी शाहीर संभाजी भगत यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक आनंद नागरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती शेरकर, साक्षी डोळस, अनिता कदम, मीरा वासनिक, वर्षा काळे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. माणुसकी शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजू काऊतकर, माधुरी सपकाळे, आम्रपाली भालेराव, कविता काऊतकर  आदींनी विशेष परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत रात्री अपरात्री लुटपाट करणारे पाच वाटमारे जेरबंद

डोंबिवली :- मध्यरात्री उशिराने रस्त्याने घरी चालत जाणाऱ्या एका इसमास चाकू आणि कोयत्याचाधाक दाखवून पाच जणांनी लुटले होते. मात्र पोलिसांत तक्रार दिल्या नंतर या वाटमारू लुटारूंना डोंबिवली राम नगर पोलिसांनी आता अटक केली आहे.

संतोष कुमार शर्मा हे ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरून रात्री घरी चालत जात असताना अचानक काही लुटारूंनी त्यांची वाट अडवली. यानंतर या वाटमाऱ्यानी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील लॅपटॉप, मोबाइल, बॅग असा एकूण ४० हजार ४१० रुपयाचा वस्तू काढून घेतल्या. जीवाला घाबरलेल्या संतोष कुमार यांनी सर्व वस्तू त्यांना देऊन टाकल्या. मात्र या नंतर संतोष यांनी या संदर्भात राम नगर पोलीस स्थानकात झाल्या प्रकारची तक्रार दाखल केली.

डोंबिवली राम नगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला. विशेष म्हणजे ही लूटपाट करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हेगारांना शोधणे कठीण गेले. मात्र संपूर्ण कसोशीने तपास करून पोलिसांनी त्या पाच जणांचा सुगावा लावला. यात २० ते २५ च्या वयोगटात असलेले आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. हे तरुण डोंबिवली पूर्व येथील त्रिमूर्ती झोपडपट्टी परीसरात राहणारे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, समशेर तडवी आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.

-रोशन उबाळे