‘आर के बाजार’ मध्ये शेकडो कल्याण डोंबिवलीकरांनी केलं रक्तदान

डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांच्या पसंतीच ग्रोसरी मार्केट म्हणजे आर के बझार. मागील १६ वर्षांपासून ग्राहकांच्या खिशाला परवडेल असे आणि उत्तम दर्जाचे गृहोपयोगी वस्तू ‘आर के बाजार’ देत आहे. याच आर के बाजार ने सामाजिक सलोखा दर्शवित रक्तदान शिबिराचे आयोजन डोंबिवली येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात केले होते.

आर के बाजार ने गुरुवार १६ डिसेंबर रोजी डोंबिवली येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आर के बाजार, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि माजी नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील यांच्या संयुक्त विध्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आर के बाजार चे कर्मचारी, आर के बाजार चे ग्राहक तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले. संपूर्ण दिवसभरात जवळपास शेकडो लोकांनी रक्तदान केले. व्यवसाया पेक्षा ग्राहकांचा माणुसकीच्या नात्यातून विचार करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे आर के बाजारचे संचालक मनोज रामकृष्ण डुंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कल्याण डोंबिवलीतील उच्च वर्गीय तसेच मध्यम वर्गीय लोकांना मागील १६ वर्षांपासून आर के बझार ने आपली सेवा अविरतपणे दिलेली आहे. यासाठी त्यांच्या १६ शाखा कार्यरत आहेत. दिवाळी चा सण असो अथवा गुढीपाडव्याचा क्षण. प्रत्येक सण घराघरात साजरा व्हवा या मानसिकतेतुन अत्यंत माफक दरात आपल्या वस्तू जसे की धान्य, तेल, मसाले, खाद्यपदार्थ, शीतपेये, सौंदर्य प्रसाधने अशा विविध गृहोपयोगी वस्तू आर के बाजार कडून विक्रीस उतरतात.

अगदी महागाई असली तरी सर्व दुकानांपेक्षा स्वस्त आणि उत्तम दर्जा असलेल्या वस्तू मिळण्याचे आर के बाजार हे एकमेव ठिकाण मानले जाते. आणि म्हणूनच गेल्या १६ वर्षांपासून लोकांची पसंती आर के बाजारला असून कल्याण डोंबिवलीत इतर शॉपिंग मार्ट पेक्षा सर्वाधिक पसंती आर के बाजारला मिळते. असे आर के बाजारचे रिजनल हेड विशाल बोडके यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

-संतोष दिवाडकर

पहा व्हिडीओ : ‘आर के बाजार’ चं रक्तदान शिबिर
गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत

कल्याण : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होता असताना आजपासून केडीएमसी क्षेत्रातील १ली ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचेही वर्ग सुरू झाले आहेत. मुलांना शाळेत कोरोनासंबंधित शासकीय नियमावलीनुसार प्रवेशउत्सव साजरे होत असताना कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा १ डिसेंबर रोजी सुरू होणार होती. परंतु पुन्हा ओमिक्रोन यामुळे शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार असे घोषित करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १६ डिसेंबर म्हणजेच आज सुरू करण्यात येतील असे केडीएमसी प्रशासनाने जाहीर केले होते.  त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करून सर्व शाळा सुरू होत आहेत. कल्याण पूर्वेकडील नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर या  शाळेतील मुलांना शिक्षकांनी औक्षण करून त्यांचे तोंड गोड केले. प्रत्येक विद्यार्थ्यास भेटवस्तूही देण्यात आली.

 मुलांच्या प्रवेश उत्सवासाठी सगळी शाळा स्वच्छ आणि सॅनिटाइझ  करून शिवाय फुले, फुगे,व रांगोळी यांनी शाळा सजवून गाण्याच्या सुरात ढोल-ताशांच्या गजरात  अतिशय भारावलेल्या व आनंदी वातावरणात पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना  प्रवेशाचा  सोहळा साजरा करण्यात आला असल्याची माहिती शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांनी दिली. तसेच यासाठी नागरिक सेवा मंडळाचे पदाधिकारी, तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

एकाच वर्षात कल्याण डोंबिवली मनपाला मिळाला दुसरा पुरस्कार

कल्याण :- महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण या संस्थेकडे क.डो.मनपाने ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला दोन पुरस्कार मिळाले असून, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड नंतर या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे राज्यपातळीवर महापालिकेस मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.

मेडा या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत म्युन्सिपल सेक्टर, बिल्डींग सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती यावर्षीच्या सोळाव्या उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागविण्यात आली होती. महापालिकेच्या विदयुत विभागाने, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फॉरमॅटमध्ये उर्जा संवर्धन व वीज बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, जल/मल नि:सारण या विभागामध्ये जे काम केले त्या संदर्भातील माहिती सप्टेंबरमध्ये पाठविली होती.

या सादरीकरणाच्या आधारे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणाच्या निवड समितीने विदयुत विभागास प्रकल्प सादरीकरणासाठी वेळ दिली होती, त्यानुसार महापालिकेच्या विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व त्यांच्या सहका-यांनी निवड समितीसमोर केलेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या आधारे मंगळवारी दोन क्षेत्रांमध्ये मनपास पुरस्कार जाहिर करण्यात आले, यामध्ये म्युन्सिपल सेक्टरमध्ये सर्टिफिकेट ऑफ मेरीट हा प्रथम पुरस्काराचा बहुमान महापालिकेस जाहिर करण्यात आला. त्याचप्रमाणे हॉस्पिटल सेक्टरमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटलसाठी दुस-या क्रमांकाचा पुरस्कार महापालिकेस जाहिर करण्यात आला.

मनपा परिसरात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून उर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले, महापालिकेने नविन इमारतींना सौर उर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे, त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १९१० इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वर्षाला जवळ जवळ १२ कोटी युनिट विजेची बचत होत आहे, पाणी पुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नविन प्रकारचे उर्जा बचतीचे पंप बसविले, त्याचप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयातही उर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून एलईडी दिवे तसेच उर्जा कार्यक्षम वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली.

भविष्यात महापालिकेमार्फत इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्याचप्रमाणे आयरे, कचोरे, बारावे, उंबर्डे या परिसरात घनकच-यापासून जैविक इंधन तयार करण्याचे ५ प्रकल्प उभारण्यात आले. या सर्व माहितीच्या सादरीकरणाअंती राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महापालिकेस हे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

-कुणाल म्हात्रे

अनधिकृत बांधकामांवर पालिकेची टांगती तलवार; डोंबिवलीत पाच मजली इमारतीवर कारवाई

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने शहर आणि ग्रामीण विभागातील बेकायदेशीर असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा सुरूच ठेवला असून, बिनधास्तपणे धडक कारवाया केल्या जात आहेत. गेल्या वर्षभरातून अनेक अनधिकृत इमारतींवर अशी धडक कारवाई सतत होत असल्याने स्थानिक भुमाफिया हद्दपार होवू लागले आहेत. विकासक आणि जमीन मालकांचा बेकायदेशीर बाजार मनपाने उठवून लावला आहे. अशा कारवाया सुरू राहिल्यास बांधकामांच्या परवानग्या घेऊन पालिकेच्या महसुलीत वाढ होईल तसेच ठेकेदार आणि भूमाफियाना जरब बसेल यात दुमत नाही.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भूमाफियांचा बेकायदेशीर इमारतीचा धंदा बंद केल्याने भूमाफियांनी हळूहळू पळ काढला आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार १०/ई प्रभागातील सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आपले कर्तव्य निभावून आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत बेधडक कारवाई करत डोंबिवली पूर्व, सोनारपाडा येथील विकासक रुपेश म्हात्रे व विजय जाधव यांच्या चालू असलेल्या तळ+५ मजल्याच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई मंगळवार १४ डिसेंबर रोजी केली आहे.

सदर बांधकामधारकास यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी आणि मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व ४ गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये मुलाने केला बापाचा खूण; आईवरही केला प्राणघातक हल्ला

कल्याण :- शहरातील चिकनघर परिसरात हत्ये प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या हल्ल्यात मध्ये येणाऱ्या आईवरही प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणाऱ्या प्रमोद बनोरिया यांचा २७ वर्षीय मुलगा लोकेश हा विद्यार्थीदशेत आहे. या पिता पुत्रांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. याच दरम्यान प्रमोद यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रमोद यांची पत्नी व लोकेश ची आई कुसुम वर देखील लोकेशने ८ते १० वार करून तिला देखील जखमी केले. यानंतर कट रचून स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. यानंतर रात्रभर त्याने जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरातच ठेवला. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता.

पहाटे च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाचा काहीतरी अनुचित घडले असल्याचा संशय बळावला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. सोसायटी मधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरात सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे दिसले. आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पुढे पोलीस आल्यानंतर मात्र लोकेश याने वडिलांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करत आईला जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तसेच आईने आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी लोकेशवर संशय व्यक्त करीत तपास सुरू केला.

डॉक्टर आणि पोलिसांनी लोकेशच्या आईला विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर तिने मुलाच्या कृत्याचा पाढा वाचला. यानंतर दोघांवरही मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी मुलगा लोकेश विरोधात गुन्हा दाखल करत पूढील तपास सुरू केला आहे. या हत्या मागे नक्की कोणते कारण आहे की इतक्या टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्या बापाला आयुष्यातुन संपवले ही बाब मात्र अद्यापही गुलदस्त्याबाहेर येऊ शकलेली नाही. मात्र लोकेशच्या चौकशी नंतर हत्येमागचे नेमके कारण पोलिसांच्या हाती लागणार आहे.

-रोशन उबाळे

‘शरद पवार’ – एक पॉजिटिव्ह एनर्जी

शरद पवार…. लहानपणा पासून हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. अगदी राजकारण कळत नव्हतं तेव्हा पासून. आता पत्रकार असल्याने पवार साहेबांची भाषण पाहण्यात येत होती. भाषण पाहण्यात असल्याने आणि मिमिक्रीची आवड असल्याने या माणसाचा आवाज मला काढता येऊ लागला. आज राष्ट्रवादी पक्षातील कोणीही जेव्हा माझा तो आवाज ऐकतो जाम खुश होतो. आजही त्यांचे जितके चाहते असतील तितके विरोधक देखील नक्की असतील. पण प्रत्येक वेळी माणसाला राजकारणाच्या चष्म्यातून तोलण किती योग्य आहे ?

ज्यांना मी मानतो, ज्यांचे व्यक्तिमत्त्व मला भावते त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काही भाषणात पवार साहेबां बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. अदृश्य हात, तेल लावलेला पहिलवान अश्या नानाविध उपमा देऊन जे प्रसंग वर्णन त्यांनी केलं त्याबद्दल खरंच विचार करायला भाग पाडलं.

आता तर पवार साहेबांचं खूप वय झालं आहे. या वयात राजकारणातुन संन्यास घेऊन काही वर्षे विश्रांती घ्यायला हवी असे काहींना वाटते. पण मला वाटत नाही ही व्यक्ती असा विचार कधी करत असेल का? आजच्या तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा यांच्यात आजही आहे. चाहते म्हणतात आमच्या साहेबांनी पावसात भिजून भाषण केले. विरोधक म्हणतात राजकीय स्टंट होता, केवळ मत मिळवण्यासाठी केलेला. काहीही असो… या वयात कसलीही तमा न बाळगता स्वतःला झोकून देणं म्हणजे एक मोठी ऊर्जा आहे आणि हे सत्य मान्य करावेच लागेल.

राजकारणाचा चष्मा जरा बाजूला करा आणि आता फक्त एक व्यक्ती म्हणून पहा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्या काळी म्हणजेच साधारण २० वर्षांपूर्वीही शरद पवार हे ज्येष्ठ व्यक्तीमत्वच होत. 1999 साली त्यांनी पक्ष उभा केला. त्यावेळी त्यांचं वय 60 च्या घरात होत. या वयात रिटायर्ड होऊन पुढील आयुष्य आरामात घालवायच असा एक समज असतो. मात्र त्याच वयात यांनी पक्षाची स्थापना केली.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीचे पहिले दशक म्हणजे सोशल मीडियाचा लवलेश देखील नाही. सोशल मीडिया दूरची गोष्ट त्याकाळी साधा मीडिया देखील नव्हता. मोजके टीव्ही चॅनल्स आणि मोजकेच काय ते वर्तमानपत्र. ना कसलं इंटरनेट ना कसला मोबाईल फोन. या अश्या काळात स्वतः महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाची पाळमूळ रुजवली. दिवसभरात छोट्या छोट्या गांवखेड्यात जाऊन सभा घेतल्या. सभेतून लोकांशी जवळीक निर्माण केली. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ लोकांच्या पक्क डोक्यात बसल. विशेषतः पुणे,सातारा या सर्व भागात जाऊन त्यांनी संघटन वाढवले. हळूहळू त्यांची कीर्ती वाढत गेली आणि आज ते सर्वानाच ज्ञात आहेत.

एखाद्याच्या नावाने बोट मोडन किंवा एखाद्या बद्दल वाईट बोलणं सोपं आहे. पण त्या व्यक्तीची कारकीर्द, त्याने घेतलेली अपार मेहनत देखील कधीतरी पाहिली पाहिजे. राजकारणात भले तुम्हाला ते आवडत नसतील. पण त्यांच्या कडे जी ऊर्जा या वयात आहे. ती खरंच अजब आहे. मनातून ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या जवळच असेल हे त्यांच्याकडून शिकता येईल. परिस्थिती काय आहे ? यापेक्षा ती कशी बदलायची हे ज्याला कळलं तो अर्धा खेळ तिथेच जिंकला.

अलिकडल्या काळात त्यांच्या तोंडाला सूज आल्याचे पत्रकार परिषदेत पाहिले. मनात विचार आला की व्यवस्थित बोलत येत नसतानाही ही व्यक्ती पत्रकार परिषद घेत आहे. खरंच अजबच.. पण नंतर एक लेख वाचल्या नंतर समजले की शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तुम्ही त्यांचे समर्थक असाल, विरोधक असाल किंवा कुणीही असाल…. पण त्यांच्या या अदृश्य शक्तीला किंवा सकारात्मक उर्जेला नाकारू शकत नाही. हीच ऊर्जा राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीसाठी अजस्त्र आधारवडाची छाया बनलेली आहे.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
कल्याण 8767948054

बॉक्सिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडुंची चमकदार कामगिरी

कल्याण : मुंबई आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा ही आशिया खंडातील सर्वात जुनी व मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे.  मुंबई विभागातील सर्व बॉक्सर्स आपण सुद्धा या स्पर्धेत चॅम्पियन बनावे अशी स्वप्ने पाहत असतात. गत वर्षी ही स्पर्धा कोरोना प्रादुर्भावाने घेण्यात आली नव्हती व या वर्षी निवड चाचणी स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली. मुंबई येथील ठाकूर  कॉलेज येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण येथील बिर्ला कॉलेजच्या यश पाटील आणि शुभम सिंग या दोन बॉक्सर्सनी फायनल सामना जिंकून मुंबईच्या संघात आपले स्थान निश्चित केले.

यश पाटील याने 63.5 या वजनी गटात तर शुभम सिंग याने 63.5 ते 67 या वाजनी गटात हे यश मिळवले. यश पाटील ला फायनल मध्ये प्रकाश  कॉलेजच्या सोहन कांचन यांचे कडवे आव्हान होते पण त्याने चोख प्रत्युत्तर देत  सामना एकहाती जिंकला. तर शुभम सिंग याला सुद्धा ठाकूर कॉलेजच्या अभिषेक यादव याचे आव्हान होते  पण शुभम च्या डिफेन्सीव्ह खेळापुढे त्याला गुण मिळवणे कठीण झाले व शुभम याने अचूक प्रहाराने गुण मिळवत सामना आपल्या बाजूने फिरवला.

अखिल भरतीय आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा या 24 डिसेंबर पासून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे सुरू होणार आहे. दोघे बॉक्सर्स कल्याण येथील बॉक्स2 फिट बॉक्सिंग अकॅडमी येथे प्रशिक्षक विकास गायकवाड यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहेत .दोन्ही बॉक्सर्स अतिशय उत्तम रीतीने सराव करत असून नक्कीच अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेत पदक प्राप्त करतील अशी खात्री प्रशिक्षक विकास गायकवाड यांना आहे.

-कुणाल म्हात्रे

पेट्रोल भरताना असं काढतात येड्यात; या ट्रिक बद्दल माहिती करून घ्या

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे वाहनचालक अगोदरच चिंतेत आहेतच पण पंपावरील पेट्रोल माफियांचं काय ? पंपावर होणारा गफला ही सर्वात मोठी डोकेदुखी असून यावर तोडगा कसा काढावा हाच एक प्रश्न आहे. आणि आजवर अनेक ठिकाणी अश्या घटना उघडही झाल्या आहेत.

भेसळयुक्त पेट्रोल :- पेट्रोल पंपावर अनेक वेळा भेसळयुक्त पेट्रोल विकले जाते. अशा प्रकारच्या घोटाळ्यात पेट्रोल पंप चालक प्रामुख्याने समाविष्ट असतो. पेट्रोल मध्ये भेसळ करून त्याचे प्रमाण वाढवले जाते. ज्याप्रमाणे दुधात पाणी टाकले जाते अगदी तशीच ही प्रक्रिया असून पाण्याऐवजी वेगळा पदार्थ वापरला जातो.

कमी पेट्रोल :- इंटरनेटवर शोध घेतल्यावर आणखीन एक घोटाळा असा समोर येईल की पंपावर पेट्रोल सोबत तुम्हाला हवेचे पैसे देखील मोजावे लागतील. याचा अर्थ असा की निर्धारित पेट्रोल भरायला सांगितले असता आपल्या गाडीच्या टाकीत त्या पेक्षा कमी पेट्रोल पडते. मुळात पेट्रोल पडतंय की नाही हे पाहण्यासाठी पाईप पारदर्शक असावा अशी मागणी ग्राहक करीत आहेत.

ओव्हर स्मार्ट ग्राहकांना हेरणे :- पंपावर पेट्रोल भरणारा कामगार हा बहुतेक वेळा गफला करण्याचा प्रयत्न करतो. अति घाईत असणारी किंवा स्वतःला ओव्हर स्मार्ट, स्टॅण्डर्ड समजणारी माणसं त्यांचे मुख्य शिकार असतात. कारण हीच माणसं पेट्रोल भरताना आपण खूप मोठे आहोत आणि आपल्याला मीटर पाहण्यात वेळ नाही असे दाखवतात. खिडकीतुन नोट देऊन ही लोक पेट्रोल भरून घेतात. आणिक अशा वेळी माफिया कामगार मीटर रिसेट न करताच पुढे पेट्रोल भरतो आणि सुशिक्षित माणसांना चुना लावतो.

मिटरची शाळा :- सध्या पेट्रोल पंपावर काम करणारे काही माफिया या ट्रिकचा वापर करीत आहेत. आणि या ट्रिक बद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी येता तेव्हा तुम्ही त्याला खिशातून पैसे काढता काढता पेट्रोल भरायला सांगता. समजा तुम्ही त्याला “४०० रुपयांचं टाक” असे म्हणालात तर तो कमी ऐकल्या सारखे १०० चे पेट्रोल टाकून स्टॉप करतो. त्यावर तुम्ही पुन्हा सांगितलत की तो हसून एखादा न ऐकले असल्याचा डायलॉग मारतो. या नंतर तो तुमच्याशी शाळा करू लागतो. ती अशी की, “मी १०० चे टाकले म्हणजे आता किती टाकायचं ?” असा प्रश्न तो तुम्हाला करतो. त्यावर तुम्ही साधे भोळेपणाने ३०० म्हणता. याचदरम्यान त्यांचा एक माणूस तुम्हाला पैशांच्या देवाणघेवाण किंवा अन्य कारणा वरून तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधतो. आणि याच संधीचा फायदा उचलून पेट्रोल भरणारा मीटर शून्यावरून रिसेट न करता तो १०० पासूनच सुरू करून ३०० वर थांबतो. आणि आपल्याला वाटत की १००+३०० म्हणजे ४०० चं पेट्रोल भरलं गेलं आहे. पण मुळात ३०० चं पेट्रोल टाकून त्याने आपल्या खिशातून १०० रुपयांची चोरी केलेली असते. आणि ती आपल्या लक्षातही येत नाही.

एक लक्षात घ्या दिवसभरात शेकडो गाड्यांमध्ये पेट्रोल टाकले जाते. परंतु ही ट्रीक ते माणूस पाहूनच करतात. समजा या लोकांनी दिवसभरात १०० लोकांवर जरी ही ट्रिक वापरली तरी ३० लोक तरी सहज फसतील. आणि दररोज या ट्रिकचा वापर करून महिन्याला पगारा पेक्षा दुप्पट रक्कम हे यातूनच कमावतात.

पेट्रोल भरनारे सारेच कर्मचारी हे बेईमानी करीत नाही. काही कामगार इमानदार देखील आहेत. मात्र याच इमानदारांच्या गर्दीत काही बेईमान, लुटारू आणि माफिया तुमच्या समोर येणार नाहीत हे कशावरून ? तेव्हा पेट्रोल भरताना सतर्क रहा. आपली फसगत होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास पंप चालका कडे त्वरित तक्रार करा. पेट्रोल पंपाच्या कारभारावर संशय असल्यास पोलिसात कळवा. संबंधित माहिती इतरांनाही पाठवा. तुम्हाला असा अनुभव आला असल्यास कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवावा.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
8767948054

एका युट्युबरला आलेला असाच एक अनुभव
ऐतिहासिक कल्याण नगरीत शिवप्रताप दिन साजरा; कालीचरण महाराजांची विशेष उपस्थिती

कल्याण :- ऐतिहासिक कल्याण नगरीत श्री शिवप्रताप फाउंडेशन तर्फे भव्यदिव्य शिवप्रताप दिन तिथीनुसार साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी अफझल खानाचा वध केला होता. या समरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज जवळ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मयुरेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य मान्यवर व शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमातील पोवाड्यांच्या गजराने संपूर्ण ऐतिहासिक नगरी दुमदुमली होती. महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर देवानंद माळी यांच्यासह त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते ज्यांनी पोवाडा सादर केला.

नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद (किल्ले पन्हाळा), सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती मोडक महाराज, वीर जिवाजी महाले पुरस्कृत शंकरजी गायकर, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

श्री शिवप्रताप फाउंडेशन आयोजित शिवप्रताप दिन सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. समस्त कल्याण करांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान कालीचरण महाराजांनी या विशेष दिनाचे औचित्य साधत तमाम शिवप्रेमींना आपल्या भाष्या द्वारे संबोधित केले. यानंतर कालीचरण महाराजांनी प्रेरित शिवभक्तांना शुभाशीर्वाद तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण पूर्वेतील समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील कालीचरण महाराजांच्या हस्ते करण्यात आले.

-संतोष दिवाडकर

कल्याण डोंबिवलीत सापडलेला ओमीक्रोन रुग्ण झाला बरा; केडीएमसी आयुक्तांनी दिली माहिती

कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिका मध्ये ओमीक्रोनचा रुग्ण सापडला होता. मात्र त्या रुग्णाची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्याला विलगिकरण कक्षेत ७ दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्या ओमीक्रोन रुग्णाला डिस्चार्ज दिला असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

डोंबिवली मध्ये दक्षिण आफ्रिकाच्या कॅपटाऊनहुन आलेला रुग्ण नवीन व्हेरियांट ओमिक्रोन संक्रमित झाला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये चिंताजनक आणि भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचबरोबर पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागावरही ताण आला होता. मात्र आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार केल्याने रुग्णाची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

या रुग्णाला ७ दिवस घरी विलगिकरण कक्षेत राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या कोरोना सेंटर मधून त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-रोशन उबाळे