कल्याण फाटा – महापे उड्डाण पूल ४ लेन करण्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून कल्याणफाटा-महापे उड्डाण पूल ४ लेन करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ऐरोली काटई एलिव्हेटेड प्रकल्पातल्या अडचणी दूर झाल्या असून   शिळफाटा येथे लवकरच उड्डाणपुलाचे तर  कल्याणफाटा येथे अंडरपास व उड्डाणपुलाच्या कामास ऑक्टोबर पासून सुरवात होणार आहे.

नगरविकासमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, एम.एम.आर.डी.ए. आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघात  एम.एम.आर.डी.ए.च्या अंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात आली. ऐरोली काटई मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचे काम वेगात सुरु असून ऐरोली बाजूस असलेल्या बोगदातल्या मार्गात “विजेच्या टॉवर” (ट्रान्समिशन टॉवरमुळे) कामांमध्ये अनेक अडचणी सामोरे जावे लागत होते. आज बैठकीत सदर टॉवर दुसऱ्या जागी हलवण्यासाठी वनविभागाने मंजुरी दर्शवली असून टॉवरची पर्यायी जागा वनविभागातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 ह्या एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवीमुंबई आणि कल्याण-डोंबिवली हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ह्या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मी. मध्ये पार करणे शक्य होणार आहे. “ऐरोली ते मुंब्रा येथील व्हायजंक्शन पर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

कल्याण फाटा व शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी ह्यासाठी कल्याण शिळफाटा येथे उड्डाणपूल व कल्याणफाटा येथे अंडरपास आणि ओव्हरब्रिजचे काम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल. कल्याण फाटा येथे ग्रेड सेपरेशन  ह्या प्रणाली द्वारे मुंब्रा बायपास  येथून येणारी वाहतूक अंडरपास द्वारे तळोजा-पनवेल मार्गाकडे जाण्यास मदत होईल व डोंबिवली-नवीमुंबई वाहतुकीसाठी कल्याणफाटा येथेच उड्डाणपुलाच्या उभारणी करण्यात येणार आहे.

 कल्याणफाटा येथील उड्डाणपुलासाठी शिळफाटा-महापे मार्गातल्या एम. आय. डी. सी. च्या पाईपलाईन पर्यायी जागी स्थलांतरित करणे गरजेचे होते परंतु पाईपलाईन स्थलांतरित करणे अतिशय खर्चिक असल्या कारणाने कल्याण फाटा येथील उड्डाणपुलाचे अलाईंगमेंट बदलण्यात येणार आहे व हा उड्डाणपूल महापे येथील एम.आय.डी.सी. ची पाईपलाईन ओलांडून महापे-शिळफाटा  मार्गावरच उतरवण्यात येईल. सुमारे ९० कोटीचा हा उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा अश्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व ४ लेन साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास एम.एम.आर.डी.ए. च्या आयुक्तांनी संमती दर्शवली आहे.

४ लेन उड्डाणपुलाच्या कल्याणफाटा येथील वाढीव जमीन अधिग्रहणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी बैठकीत सांगितले. पत्रीपूल व दुर्घडी किल्ल्याजवळील खाडीपुलाच्या उभारणी नंतर निळजे येथील उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रगतीपथावर आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत सुरू होणार पासपोर्ट सेवा केंद्र; जवळच्या शहरातील नागरिकांना दिलासा

कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सन २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली व लवकरात लवकर हे केंद्र सुरू व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे नेहमीच तत्पर होते. परंतु जागेअभावी सदर पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब होत होता, त्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश प्राप्त झाले, परंतु त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाला. त्यासाठी खा. शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली असता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी दिरंगाई न करता लवकरच लवकरच पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु करण्याचे आश्वासित केले. आणि ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याचे संचार राज्य मंत्रालयाकडून खा. डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवंगत परराष्ट्रमंत्री मंत्री स्वराज यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली एम आय डी सी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली. यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालय व टपाल खात्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे.

       ठण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एम एम आर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

-कुणाल म्हात्रे

नाका बंदी दरम्यान दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत; विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी

कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात नाका-बंदी दरम्यान दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यावर वाव पोलीस कर्मचाऱ्याने काठी घातल्याचा आरोप केला जात आहे. बाईकस्वराच्या डोक्यावर काठी लागल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विनाकारण मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात राहणारे
निलेश कदम, भुपेंद्र झुगरे हे दोघे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून उल्हासनगर च्या दिशेने जात होते. याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोळशेवाडी पोलिसांची चेकिंग सुरू होती. निलेश व भुपेंद्र जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले असल्याचे तरुणाकडून सांगण्यात आले. दरम्यान निलेश च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला दहा टाके पडले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यास गेलेल्या तरुणांचा पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले आहे.

-रोशन उबाळे

गणेश मंडपात शॉक लागून तरुणाचा मृत्यू; कल्याण बेतूरकरपाडा परिसरातील दुर्घटना

विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील एव्हरेस्ट नगर येथे घडली. प्रशांत चव्हाण (28) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा, एव्हरेस्ट नगर परिसरात गेल्या ३८  वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही या मंडळाकडून भक्तीभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी संध्याकाळी या मंडळात विसर्जनाची तयारी सुरू होती. त्याचवेळी जोरदार आलेल्या पावसामुळे मंडपातील लाईट चालू बंद होऊ लागले. ते पाहण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण पुन्हा मंडपात गेला आणि तिकडे तपासणी सुरू असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता प्रशांत खाली पडल्याचे त्यांना दिसून आले. क्षणाचाही विलंब न दवडता कार्यकर्त्यांनी त्याला  रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रशांत मृत्यू झाला. या घटनेमुळे एव्हरेस्ट नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

-कुणाल म्हात्रे

घरगुती गणपतीला शैक्षणिक साहित्याची आरास; विसर्जनानंतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप

गणेशोत्सव म्हटलं की सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सण. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. हा उत्सव आणखी द्वीगुणीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणपती उत्सवादरम्यान शैक्षणिक साहित्यांची आरास केली जाते. गणेशमूर्ती विसर्जनानंतर मखरातील सजावटीचे शैक्षणिक साहित्य आणि काही गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.

दरवर्षी प्रमाणे यंदादेखील अशाच दुर्गम भागातील तुंगारेश्वर पर्वतरांगेतील,तालुका भिवंडी येथील जि.प.शाळा पालिवली येथील आदिवाशी पाड्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सदरील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक साहित्याची मखर सजावट आणि याच शैक्षणिक साहित्य वाटपाची संकल्पना येथील काही शिक्षकांनाही आवडली असून तेही आपल्या घरगुती गणेशोत्सव काळात राबवत आहेत. यावेळी सर्व पक्षिय युवा संघटनेचे प्रमुख संघटक तथा शिक्षणप्रेमी गणेश पाटील, गजानन पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, मंगेश खुटारकर, युवराज पाटील आदी जण उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

गणपती विसर्जनासाठी केडीएमसीची यंत्रणा सज्ज; पालिका आयुक्तांनी केली गणेश घाटाची पाहणी

गणेशोत्सवात गणपती विसर्जनासाठी केडीएमसीची यंत्रणा सज्ज असून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी येथील गणेश घाटाची पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

गणेश भक्तांच्या सोयीसाठी दुर्गाडी गणेश येथे गणेश घाटाची उंची वाढविणे आणि गणेश घाट परिसरात लादया बसविणे ही कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे या परीसरात 125 KV चे 3 जनरेटर, 11 लाईटिंग टॉवर, 80 हॅलोजन, 4 cctv तसेच दुर्गामाता चौक येथे 8 ccstv देखील विदयुत विभागामार्फत लावण्यात आले आहेत. दुर्गाडी येथे सरंक्षक भिंत बांधणे, गणेश घाटाला स्टिल रेलींग करणे आणि गणेश घाट बगीचा सुशोभिकरण करणे हि कामे प्रस्तावित असून सदर कामे शीघ्र गतीने करणे बाबत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना निर्देश दिले आहेत.

गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका क्षेत्रात कोराना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली होती. त्यामुळे यावर्षी सर्व गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. तसेच विसर्जन आपल्या दारी हा उपक्रमही महापालिका क्षेत्रात राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दुर्गाडी येथील गणेश घाट परिसरात “पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याकरीता अनुदान” या योजने अंतर्गत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सुचविलेल्या महापालिका क्षेत्रातील गणेश घाट परिसरातील कामांसाठी एक कोटी दहा लाख इतक्या रकमेचे अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 55 लाख रुपयांचा निधी  महापालिकेस प्राप्त झाला आहे. उर्वरित अनुदान सर्व काम पुर्ण झाल्यावर प्राप्त होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

दावडीतील इमारत वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते २५ लाख; बिल्डरच्या आरोपाने उडाली खळबळ

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उपायुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पालिका क्षेत्रात काही इमारतींवर तोडक कारवाई होत आहे. त्यामुळे अनधिकृत पणे इमारती उभ्या करणाऱ्या बिल्डरांचे, बांधकाम ठेकेदारांचे तसेच त्यांना मिळालेल्या काही लोकांचे धाबे दणाणले आहेत. त्यानंतर तथाकथित सीसीटीव्ही फुटेज आणि लाच घेतल्यांचे आरोप आता होऊ लागले आहेत. धडक कारवाई नंतर आरोपांच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत.

कल्याण डोंबिवली मध्ये पालिका प्रशासनाने धडक कारवाई अनाधिकृत इमारतीवर सुरू केल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दावडी येथील एका इमारतीवर कारवाई केली गेली होती. त्यावरून आता तथाकथित आरोपाच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कारवाई केलेल्या इमारती बाबत पैसे दिले असल्याचे आरोप होत आहे. दावडी गावातील ६ मजली बेकायदा इमारत वाचवण्यासाठी केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका बिल्डराने केला आहे. बिल्डर आणि अधिकारी यांच्यातील मिटिंग हॉटेलच्या तथा कथित
सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दाखवले जात असल्याचे एक चित्रीकरण समोर आले आहे. यानंतर कल्याण महापालिका मुख्यालयात खळबळ उडाली आहे.

सध्या काही प्रसार माध्यमांवर सीसीटीव्ही दाखवला गेला आहे. तो खरा आहे की खोटा याची सत्यता तपासल्या नंतर काय गौडबंगाल आहे हे समोर येणार आहे. दरम्यान याबाबत पालिका आयुक्तांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत की तथाकथित सीसीटीव्ही चित्रीकरणाची सत्यता तपासून आणि चौकशी नंतर कारवाई करण्यात येईल असे ते स्पष्टपणे म्हटले आहेत.

-रोशन उबाळे

कल्याणच्या गांधारी येथे महिलेच्या हत्येने खळबळ; पोलिसांचा जवळच्या माणसावर संशय

कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात घर काम करणाऱ्या एका महिलेच्या हत्येने आज सकाळी खळबळ उडाली होती. दगडाने ठेच्चून निर्घृणपणे या महिलेची हत्या करण्यात आली आहे. एखाद्या वैमनस्यातुन जसे एखाद्याची हत्या केली जाते त्याच प्रमाणात प्रचंड संतापातून ही हत्या केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून हत्येचा संशय महिलेच्या पतीवर आहे. सध्या खडकपाडा पोलिस या हत्येचा तपास करीत आहेत.

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरु आहे. आज सकाळी १० च्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. खडकपाडा पोलिस पथकासमवमवेत घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते असे आहे. ही महिला त्याच परिसरात घर काम करणारी आहे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण सध्या तो बेपत्ता आहे.

लक्ष्मीची हत्या मोठ्या निर्दयीपणे दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ही घटना मुख्य उच्चभ्रू वस्तीत घडल्याने परिसरात या महिलेच्या हत्येने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि पंचनामा केला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी पोलीस पथक तपास करीत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

कल्याण ग्रामीण भागात चोरट्यांनी फोडलं एटीएम; लाखो रुपयांची चोरी सीसीटीव्हीत रेकॉर्ड

कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ येथे आय सी आय सी आय चे ए टी एम चोरटयांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास  फोडले असून त्यातील लाखोंची रक्कम लंपास केली आहे. विठ्ठल नगर येथे चोरट्याने गॅस कटर च्या साहाय्याने बँकेच्या ए टीएम वर डल्ला मारला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून कोरोना काळात चोरांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीही रायते गावात याच महामार्गावर आठ दुकाने फोडण्यात आली होती. संबंधित घटनेचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून लवकरच दरोडे खोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळणार आहे असे समजते. दरम्यान कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी  घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. शोधकार्यासाठी इमारतील कॅमेऱ्याचे फुटेज देखील ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याचा तपास  साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई आणि साहय्यक पोलीस निरीक्षक आर पी पवार यांचे पथक  करीत आहे.

-रोशन उबाळे

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाचा होतोय कायापालट; खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला कामाचा आढावा

कल्याण लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रेल्वे विषयक कामांचा पाहणी आढावा घेण्याकरिता आयोजित दौऱ्यामध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक बी.के. झा यांच्यासोबत विठ्ठलवाडी स्थानकात जाऊन तेथे सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. सदर कामे आता पूर्णत्वास आली असून या सर्व कामांची पाहणी करुन नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उ.म.पा.चे नगरसेवक धनंजय बोराडे उपस्थित होते.

विठ्ठलवाडी स्थानकात पूर्व दिशेला नागरिकांना जाणे सोयीचे जावे यासाठी तिकिट घर बांधण्यात आले असून येत्या महिन्याभरात ते नागरिकांकरिता खुले करण्यात येणार आहे. विठ्ठलवाडी येथील पूर्व दिशेकडील रस्त्यावरुन स्थानकात जाण्यासाठी थेट पर्याय उपलब्ध करुन तेथे प्रवाशांकरिता २ सरकते जिने (एस्कलेटर्स) बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे एस्कलेटर्स नागरिकांच्या सेवेत रुजू होतील. तसेच अंबरनाथ दिशेकडील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे सोयीचे व्हावे याकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविण्यात आले असून येत्या २० दिवसांत ही सुविधा सुरु होणार आहे.

विठ्ठलवाडी स्थानकातील पादचारी पूल पश्चिमेला उतरण्यात यावा या नागरिकांच्या मागणीची दखल घेत यासाठी प्रयत्नशील राहून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विठ्ठलवाडी स्थानकात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार आहे. या मार्गिकांच्या संरेखनाचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच या पुलासाठीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर