शनिवारी कल्याणच्या खासदारांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील रेल्वेचे कामकाज कसे सुरू आहे याबाबत एक पाहणी दौरा केला होता. याचदरम्यान त्यांनी लॉकल मधून प्रवास देखील केला. लॉकलच्या शेवटच्या डब्याच्या केबिनमधून त्यांनी हा प्रवास केला आणि प्रस्तावित कामाची पाहणी केली.
कोविड काळात मध्य रेल्वेने ठाणे जिल्ह्यातील काही स्थानकांची शिल्लक कामे पूर्णत्वास नेली आहेत. ह्याच काळात डोंबिवली स्थानका जवळील कोपर स्थानकात पूर्ण झालेल्या होम प्लॅटफॉर्मची कल्याण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. हा होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्या नंतर या प्लॅटफॉर्मवरून मुंबईकडे तसेच खोपोली, कसारा मार्गाकडे गाड्या सुटतील. या नव्या प्लॅटफॉर्म नंतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र पाचव्या आणि सहाव्या लाइन चे काम येत्या फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस चा वेग वाढणार आहे आणि लोकल लाइनचा होणारा खोळंबा होणार नाही अस मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकासकामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले.
कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या स्व लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
या उद्यानात तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची साहित्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.
मंगळवार दि.३१ ऑगस्ट रोजी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला. हा मृतदेह कुणाचा आहे ? व त्याचा मृत्यू कसा झाला ? याबाबत पोलिसांकडे माहिती नव्हती. त्यामुळे ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. व आता या प्रकरणाचा यशस्वी शोध करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात त्यांना मृतकाच्या गळ्यावर जखमा दिसल्या. त्याच्या अंगावर टेटू आढळला. टेटू आणि अंगावरील कपड्यांच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला. याचदरम्यान मृतकाच्या पत्नीने देखील जवळच्या पोलीस स्थानकात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे मृतदेहाची ओळख पटली. आणि मृतकाबाबत अधिक माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली. विठ्ठलवाडी पोलिसांनी आपली सूत्र हलवली. पोलिसांनी यासाठी तपास टीम तयार केली. मिसिंग दाखल झालेल्या ठिकाणा नुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. हा तपास सुरू झाला आणि अनेक गोष्टींचा उलगडा पोलिसांना होऊ लागला. आधी अपहरण व नंतर झालेल्या हत्येचा गुन्हा कसा घडला? याचा शोध सुरू झाला. मारेकरी हे लांबून आलेत याची माहिती पोलिसांच्या हाती मिळाल्यानंतर पोलिसांनी आपल्या टीम मार्फत २४ तासातच हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली.
दोघांना ताब्यात घेतल्या नंतर पुढील प्रकरण उजेडात येऊ लागले. मृतकाच्या पत्नीशी शेजारच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मृत पतीने त्या तरुणाशी वाद घातला होता. याच वादातून त्या तरुणाने मित्राच्या मदतीने वाद घालणाऱ्या तिच्या पतीचा वचपा काढायचे ठरवले. सुरुवातीला नवी मुंबई परिसरातून त्याचे अपहरण केले गेले. आणि नंतर त्याची कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आणून हत्या केली. क्रूरपणे त्यांनी तो मृतदेह गावदेवी तलावात फेकला आणि तिथून पोबारा केला.
साजन मारुती कांबळे राहणार घणसोली नवी मुंबई आणि डिव्हाईन गोन्साल्विस राहणार वरळी कोळीवाडा, मुंबई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंद्रकांत शेलार असे हत्या झालेल्या त्या इसमाचे नाव आहे. २४ तासातच अंगावरील टॅटू आणि कपडे यांच्या सहाय्याने तपास करीत विठ्ठलवाडी पोलिसांनी या मर्डर मिस्ट्रीचा शोध लावला. मात्र या घटनेसह अनेक तलाव आणि खदानी असुरक्षित झाल्यात हे देखील अधोरेखित झाले आहे.
कल्याण पश्चिम भागात स्टेशन परिसरा लगत असलेला बैलबाजार व पत्री पूल रोड हा संवेशीलशील परिसर म्हणून ओळखला जातो. या भागालगत असलेल्या सांगळेवाडी, रहेजा कॉम्प्लेक्स या आतील भागात नेहमीच समाजकंटकांचा वावर असल्याने येथे मारामाऱ्या, छोटी मोठी लुटमार अश्या घटना घडत असतात. अश्या घटनांवर नजर ठेवण्या साठी या भागात सीसीटीव्ही केमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी या भागातील समाजसेवक नईम खान यांनी एका निवेदना द्वारे सिस्टम मॅनेजर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांना केली आहे. या निवेदनाची प्रत महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना देखील पाठवण्यात आली आहे.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैल बाजार प्रभाग क्रमांक ३६ येथे सीसीटीव्ही केमेरे अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. काही समाजकंटक प्रवृत्तीचे लोक हा कल्याण रेल्वे स्थानका जवळचा परिसर असल्याने येथे वावरत आसतात. अश्या लोकांवर नजर ठेवण्या साठी सीसीटीव्ही केमेरे लावणे येथे गरजेचे झाले आहे. बैल बाजार परिसर येथील सांगळे वाडी, रहेजा कॉम्प्लेक्स येथे हे केमेरे लावल्यास येथून येणाऱ्या जाणाऱ्या अश्या समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवू शकतात.असे केमेरे या परिसरात लावले गेल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते एक चांगले पाऊल उचलले जाईल.
तरी सदर सीसीटीव्ही केमेरे बैल बाजार प्रभागात लावण्याच्या साठी लवकरात लवकर पाऊले उचलावी. या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ही आवश्यक बाब आहे. तरी सकारत्मक विचार करून हे सीसीटीव्ही केमेरे या भागात लावण्याची कृपा करावी ही नम्र विनंती असे समाजसवेक नईम खान यांनी म्हटले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. या इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या सहा मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई केली. या कारवाई दरम्यान इ प्रभाग अधिकारी भारत पवार, अधीक्षक किशोर खुताडे हे देखील उपस्थित होते. या बांधकामाबाबत वास्तुविशारद संदीप पाटील यांनी तक्रार केली होती.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये सुमारे ३०० हून अधिक अशा इमारती आहेत. अशाच प्रकारे दावडी येथील विकासक मुन्ना सिंग यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक सहा मजल्याच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.
या इमारतीच्या बांधकामाबद्दल तक्रार आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. आज आय आणि इ प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक जॉब प्रेशर मशीन च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.
दरम्यान डीपी रोडमधील इमारती निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली असून आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणांवर कारवाई देखील सुरु आहे. यापुढे डीपी रोडवरील बांधकामांवर केवळ तोडक कारवाई न करता हि बांधकामे पूर्णतः निष्कासित केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी दिली.
एकीकडे ठाण्याला फेरीवाल्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण मध्ये महापालिकेच्या कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाने एका जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि जखमी झालेल्या नागरिकांनी केला आहे.
कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील बाबाजी चाळ ही धोकादायक झाल्याने ती तोडण्याची कारवाई गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने सुरु केली. यावेळी कारवाईस विरोध केल्या प्रकरणी पथकाने एका ७३ वर्षीय राणा देवराज प्रजापती या चाळकर्याचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ केले असून केडीएमसी प्रशासन बिल्डरच्या दावणीला बांधल्याचा आरोप जखमी झालेल्या नागरीकाने केला आहे. संतप्त झालेल्या चाळकार्यांनी कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान कारवाई पथकाने संबंधित नागरीकाला जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिका:याने केला आहे.
काळा तलाव परिसरात असलेल्या बाबाजी चाळ याठिकाणी पागडी पद्धतीने अनेक नागरिक रहात आहेत. या जागेच्या मूळ मालकाने हि जागा विकासकाला विकसित करण्यासाठी दिली आहे. विकासकाने याठिकाणी हि जागा विकसित करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली असून जागेभवती पत्र्यांचे कुंपण करण्यास सुरवात केली आहे. बहुतांश जागा विकासकाने रिकामी केली असून येथील बाबाजी चाळीतील नागरिकांनी अद्यापही आपली घरे रिकामी केलेली नाहीत. आपल्या घरांच्या जागेपेक्षा कमी जागा विकासक देत असल्याचा आरोप करत हे नागरिक हि जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे जागा मालक आणि विकासकाने पालिका प्रशासनाला हाताशी घेऊन हि चाळ धोकादायक घोषित करून चाळीवर कारवाई सुरु केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. धोकादायक चाळ असल्याची नोटीस देखील मिळाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे. त्यांना कारवाई पथकाने मारहाण केली नसून त्यांनी स्वत: स्वत:ला जखमी करुन घेतले आहे. त्याचा व्हीडीओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हीजेटीआयकडून करुन घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे. ठाणे शहरात फेरीवाला पथकाच्या अधिकार्यावर कारवाई दरम्यान हल्ला केल्याची घटना ताजी असताना आत्ता कारवाई दरम्यान नागरीकांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरुन अधिकार्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.
‘एक आदर्श घालूया- नियम पाळून श्रीगणेश उत्सव साजरा करु या’ असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत साज-या होणा-या गणेशोत्सवाबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत माहिती देतांना त्यांनी हे आवाहन केले.
कोरोनाचे संकट पाहता यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी साठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तथापि सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनी देखील फायर एनओसी घेणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या वर्षीच्या गणेशोत्सवाकरीता महापालिका सज्ज असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक शाखा यांचा ना-हरकत दाखला, अग्निशमन विभागाच्या ना-हरकत दाखला, म.रा.वि.वि.कं.लिमिटेड यांच्याकडील तात्पुरती परवानगी व पोलिस स्टेशनच्या ना-हरकत दाखला इ. करीता संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत असणा-या स्थानिक पोलिस स्टेशननिहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचा-याची नियुक्ती करुन “एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यात येत असून परवानगीसाठी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असेही ते पुढे म्हणाले.
महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून विसर्जन स्थळी व विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांची त्याचप्रमाणे 2447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील “विसर्जन आपल्या दारी” हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते बुजविणेबाबतच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती देखील आयुक्तांनी यावेळी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच असावी, गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करुन जबाबदारीने, आनंदात पण शिस्तीत त्याचप्रमाणे विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करावा आणि उत्सवादरम्यान जेष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन महापालिका आयुक्तांनी या बैठकीत केले. या ऑनलाईन बैठकीसाठी महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
कोरोना काळात राजरोसपणे मारहाण करून लुटणे, हत्यारांचा धाक दाखवणे अशा प्रकारात सर्रास वाढ झाली आहे. रात्री ११ वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली होती. प्रवाशाने आरडा ओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत लुटारूला अटक केली.
निखिल वैरागर असे या चोरट्याच नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा चोख बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.
आंबिवली येथे राहणारा तरुण हा २९ ऑगस्ट रोजी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर २ नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या निखिल वैरागर या २१ वर्षीय तरुणाने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.
सुदैवाने लोकलच्या प्रतिक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला आणि त्यांनी आरडा ओरड सुरू केली. यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांच लक्ष गेलं त्यांनी तत्काळ घटना स्थळी धावून येत. तलवार दाखवणाऱ्या निखील या लुटारूला ताब्यात घेतलं. कल्याण जी आर पी मध्ये निखीलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ सतर्क राहून आरोपी याला मुसक्या आवळल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी परत केले आहेत. मोबाईल परत करण्याची प्रक्रीया सुरुच आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल मोठय़ा प्रमाणात हस्तगत केले आहेत. नागरीकांना हे मोबाईल परत केले जात आहेत. कोरोना काळात वीस वीसच्या टप्प्यात हे मोबाईल परत करण्याचे काम सुरु आहे. आज खडकपाडा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी २० मोबाईल कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहे.
कल्याण खडक पाडा परिसरातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेले व हारवलेले पाच लाख पंचवीस हजाराचे मोबाईल स्थानिक खडक पाडा पोलीसाच्या पथकाने शोधले आहेत. खडक पाडा पोलीस अंतर्गत महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस संयुक्त अनिल पोवार व खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अशोक पवार यांही पोलीस स्थानकात एक पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.
या पथकात कार्यरत असलेल्या हवालदार सुनिल पवार व कॉन्स्टेबल कुशाल जाधव यांनी मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत ठाणे जिल्ह्याच्या विविध ठिकाण हुन ५२ मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस माधव मुंडे यांनी सोमवारी कल्याण डोंबिवली दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. मात्र त्यांचा हा दौरा राजकीय नसून सदिच्छ भेटीचा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तसेच बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय तसेच खंदे समर्थक म्हणून माधव मुंडे यांची परळी तालुक्यात एक वेगळी ओळख आहे. कल्याण मधील त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन सोनवळे यांच्या विनंतीखातीर त्यांनी हा कल्याण डोंबिवली दौरा केला होता.
सोमवारी सायंकाळी आर पी सेक्युरिटी सर्व्हिसेसच्या कार्यालयात श्री शिव साई प्रतिष्ठाण कडून त्यांचे कल्याण नगरीत स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक चंद्रसेन सोनवळे, ठाणे जिल्हाध्यक्ष ताराचंद सोनवणे, सचिव मंगेश बाईत, दीपक मोरे, अमित होरंबे, रोशन बाईत, शंकर गंगासागरे, विजय पवार, गणेश सोनवणे व महिला उपस्थित होत्या. यावेळी समस्त मित्रपरिवाराच्या हस्ते शाल श्रीफळ तुळशीच रोपट देऊन मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच उपस्थितांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
समाजसेवक अरुण गवळी स्थापित अखिल भारतीय सेनाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश दाखिनकर यांच्या कार्यालयाला देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दाखिनकर यांनी देखील त्यांचे सहर्ष स्वागत केले. पुष्पगुच्छ व साईंची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिवसेना उपशहर संघटक दिलीप दाखिनकर, शास्त्रीनगर शाखाप्रमुख अजित चौगुले यांनी आई प्रतिष्ठानच्या कार्यालयात देखील त्यांचे स्वागत केले.
कोळसेवाडी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली सार्वजनिक ग्रंथालयाला देखील भेट देण्यात आली. संचालक सहाने सर आणि राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राहुल महाजन यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी काही वाचक वर्ग तसेच शिवभक्त त्यांच्या स्वागतार्ह उपस्थित होते. राजे प्रतिष्ठाण कडून महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या निर्मनीत समाधी स्थळांचा आराखडा दाखवून त्यांना माहिती देण्यात आली. याबाबत शासन दरबारी हा प्रस्ताव मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी राजे प्रतिष्ठाणला कळवले तसेच वाचनाप्रति असलेली आवड आणि महत्त्व देखील उपस्थित वाचकांना पटवून दिले.
माधव मुंडे यांनी कल्याण दौरा संपवून पुढे डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव तेजस पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी काही युवक व युवती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. व त्यानंतर छत्रपती शिवरायांची मूर्ती त्यांना भेट स्वरूपात दिली गेली. उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.