कल्याण पूर्व नांदीवलीत वाहन पासिंग मध्ये भ्रष्टाचार ? उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे होतेय चौकशीची मागणी

वाहन पासिंग मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तृतीय पक्षा मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली असून याबाबत पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी महासचिव राहुल काटकर, पवन दुबे, प्रविण के. सी., राज द्विवेदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील नंदिवाली तलाव येथे कल्याण व ठाणे आरटीओ मधील गाड्यांचे पासिंग करण्यात येते. या ठिकाणी  आरटीओ अधिकारी, दलाल व काही स्थानिक मिळून वाहन पासिंग करताना वाहन चालक, मालक यांची लुट व फसवणूक करत आहेत. या ठिकाणी वाहन पासिंग करताना लाखों रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. शनिवार व रविवार या दिवशी काही विशेष दलालांच्या गाड्यांचे पासिंग करण्यात येत आहे. आरटीओ नियमानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी वाहन पासिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक अधिकारी जास्तीत जास्त ४० वाहन पासिंग करु शकतात.

काही दलाल गाडी पासिंग करण्यासाठी ऑनलाइन मध्ये देण्यात आलेल्या तारखेला वाहन पासिंग न करता शनिवार व रविवार या दिवशी वाहन पासिंग करतात. वाहन पासिंग साठी आरटीओ नियमानुसार गाडी मध्ये काही त्रुटी असताना व आवश्यक कागद पत्र नसताना देखील अधिकारी व दलाल आर्थिक संगणमत करुन वाहन पासिंगकरत आहेत. तसेच वाहन पासिंग साठी बुक मध्ये लेखा जोखा देखील करत नाहीत. पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्या कडुन अनधिकृत पणे पार्किंग साठी १०० रुपये घेतले जात आहेत. पार्किंगची पावती (बनावट पावती) असल्या शिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत.

पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्याकडुन अनधिकृत पणे गाडी सॅनिटायझर करण्यासाठी म्हणून जबरदस्ती १०० रुपये घेतले जात आहेत. सॅनिटायझर केल्याशिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत. पासिंगसाठी आलेल्या वाहन चालक मालक यांना गाडीला विशेष व्यक्ती कडुन गाडीला रेडीयम लावण्यासाठी सक्ती अधिकारी यांच्या कडुन करण्यात येत आहे. हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकार असून यामुळे  नागरिकांची मोठी लुट होत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

या सर्व मुद्दयांवर ७ दिवसात तृतीय पक्षा मार्फत चौकशी करुन चालु असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा राष्ट्र कल्याण पार्टी तर्फे आरटीओ कार्यालयामध्ये तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर नांदिवली येथील भ्रष्टाचार करणाऱ्या बऱ्याच अधिकारी, दलाल व सामील असलेल्या काही स्थानिकांच्या व्हडीओ ऑडिओ क्लिप्स देखील असल्याचे बोलले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’चा कोकणातील आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात; भाग १

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ कडून कोकणात आलेल्या पुरातील नुकसानग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. मंडळातील लोकांनी मदत गोळा करून जवळपास ३५ टन जीवनावश्यक साहित्य कोकणातील गरजूंना वाटप केले. साहित्य गोळा करण्यापासून वाटप करून परतण्या पर्यंतचा एक धावता प्रवास सर्वांना माहीत व्हावा या दृष्टीने लिहलेला हा लेख.

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ची स्थापना :- ‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण – कल्याण,महाराष्ट्र’ मागील अनेक वर्षांपासून कल्याण शहरात कार्यरत आहेत. स्वतःचे जीवन घडवण्यासाठी कोकणातून शहरात आलेल्या लोकांनी एकत्र येऊन या प्रतिष्ठाणची स्थापना केली. राजकारणाला थोडंस लांब ढकलून गावच्या मातीचा आभास शहरात व्हावा यासाठी कोकणातील मातीशी नाळ असलेल्या कल्याण शहरातील कोकणकरांना समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांनी एकत्र करून या संस्थेची स्थापना केली. आणि कल्याण मध्ये भव्य दिव्य असा कोकण महोत्सव सुरू झाला. कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोकणात न जाता कल्याणकरांना घडू लागले. कोकणातील जीवनपद्धती, कोकणातील आहार, एकंदरीत हापूस आंबा सोडला तर सर्वच गोष्टी या महोत्सवात मिळत कारण साधारण जानेवारी महिन्यात हा महोत्सव होत असे जेव्हा हापूस झाडावर बहरायचा कालावधी सुरू असतो.

कोकणात जाण्याचा आखला बेत :- मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान घातल्याने कोकण महोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते काही काळासाठी विखुरले गेले होते. २१ व २२ जुलैच्या पावसाने कोकणाला झोडपून काढले. नदी ओढे ओसंडून वाहू लागले. दरडी कोसळल्या, पुरात लोकांची घर बुडाली तर दरडीत कुटुंबच्या कुटुंब मातीत गाडली गेली. कोकणावर आस्मानी संकट कोसळलेले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भरातून कोकणात मदतीचा हात पुढे केला गेला. आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण देखील आपल्या गावाच्या मदतीसाठी सज्ज झाली. फोन फिरले… संस्थेचे सर्व पदाधिकारी गोळा झाले… मीटिंग झाल्या आणि पुढच्या कामाची आखणी कागदावर झाली.

प्रतिष्ठाणच्या सभासदांनी तसेच पदाधिकार्यांनी मदतीसाठी आवाहन केले. शक्य तितकी मदत लोक करू लागले. काहींनी धान्य दिले, काहींनी इतर जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. वस्तू जमा झाल्या खरे पण आता त्या नेमक्या कुठे वाटप करायचा याबाबत महत्त्वाचा विचार करण्यात आला. कारण कोकणात महाराष्ट्र भरातून मदत होत होती. आणि जिथे नुकसान झालं नाही अश्या लोकांची देखील घरं सामानांनी भरली होती. वर्षभर बसून खातील इतके समान एका एका घरात साठले होते. बाहेरून आलेला ट्रक शहरातच कुठेतरी जवळपास थांबून येईल त्याला सामान देऊन निघून जात होते. त्यामुळे कोकणात ज्याचे काही नुकसान झाले नाही त्यांचे मोठे फावले होते.

कमिटीचे व्यवस्थापन :- ही बाब कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या निदर्शनास आली होती. म्हणून संस्थेने मदत कुणाला करायची याचा एक सर्वे केला. कोणत्या भागात नुकसान झालंय त्या गावातील लोकांची यादी बनवली गेली व यासाठी प्रत्यक्ष कोकणात संपर्क साधला गेला. दुसरीकडे मदतीचे सामान देखील जमा होत होते. मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी शक्य तितकी मदत केली. जाणीव सामाजिक संस्था, कल्याण पूर्व मधील व्यापारी संघटना अशा अनेक मंडळ व संस्थांनी मदतीचा हातभार लावला. उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केली. कल्याणच्या आमदारांनी देखील मदत वाटपासाठी आर्थिक मदत संस्थेला दिली. यानंतर पुढील धोरण आखून मदतीचे दिवस आणि ठिकाण तसेच इतर गोष्टींचं व्यवस्थापन करण्यात आले.

प्रवासाची पहिली रात्र :- गुरुवार दि.२९ जुलै रोजी सकाळ पासूनच ट्रक मध्ये सामान भरायला सुरुवात झाली. साधारणपणे ३५ टन च्या आसपास माल असल्याने सर्व ट्रक भरण्यास संध्याकाळ झाली. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ट्रकचे पूजन करून सर्व गाड्यांना मार्गस्थ केले. सामानांचे मोठे ट्रक, केटरर्सची पिकअप सह पाच सहा गाड्यांच्या ताफ्यात जवळपास २५-३० लोकांची टीम सायंकाळी कोकणाकडे रवाना झाली. इतक्या लोकांचा ताफा असल्याने अडीअडचणी येणे देखील स्वाभाविक होते. इतक्या लोकांच्या जेवणाची जबाबदारी प्रितेश आचरेकर यांच्या केटरर्स टीम वर सोपवली होती. मात्र नागोठणे जवळच त्यांची पीकअप बंद पडली आणि वेळ व्यवस्थापण साधून त्यांनी तिथेच एका गेरेजच्या वर्कशॉप बाहेर जेवण बनवले. गरमागरम पुलावभात आणि लॉन्च पापड खाऊन तृप्त झालेली माणसं पुन्हा गाडीत बसून कोकणाकडे निघाली. जेवण होई पर्यंत आचरेकर यांची केटरर्सची व्हेन देखील गेरेजमधून रिपयेर होऊन आली होती.

कोकणातील महाड येथील उतेकर यांच्या गावातील बंगल्यावर पहिली रात्र जाणार होती. पण तिथे पोहोचे पर्यन्त पहाटेचे साडे चार वाजले होते. कारण रात्रीची वेळ असल्याने ताफ्यातील गाड्या मागे पुढे राहत होत्या. टेम्पो वाल्यांना आणायला पुन्हा मागे जावे लागत होते. असे करत करत ताफा महाड येथील उतेकर यांच्या बंगल्यावर पोहोचला. लाईट नसल्याने जनरेटर सुरू झाला. आणि पाच वाजता सर्वजण मिळेल त्या जागेत झोपी गेले. जनरेटरच्या आवाजाने झोप घेणे सोपे नव्हते. तरीही काही तासांची झोप घेऊन सकाळी सर्वांनी आवरले. चहा पोह्यांचा नाश्ता झाला. बाहेर पावसाने हजेरी लावली होती.

आमदार गणपत गायकवाड झाले पथकात सामील :- सकाळी उशिराच्या दरम्यान कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत महाड येथे येत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणला जॉईन झाले. दरम्यान स्थानिक आमदार भरत गोगावले हे देखील भेटीसाठी आले होते. त्यांच्या भेटीनंतर मदतकार्यासाठी प्रतिष्ठाणची टीम रवाना झाली. महाडमधील खरवळी, ब्राह्मण आळी नवले, भोई, असनपोई, आकले बौद्धवाडी येथील सावित्री व काळ नदीच्या पुराने बधितांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या सर्व भागात मदत पोहोचल्यानंतर पुन्हा संपूर्ण ताफा उतेकर यांच्या बंगल्यावर परतला. यानंतर जेवण करण्यात आले आणि दुपारच्या दरम्यान एक टीम कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत तळई दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेली. यावेळी आमदारांनी संस्थे समवेत मातीखाली गेलेल्या गावाला भेट दिली तसेच मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर बचावलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेत त्यांना मदतीचा हात पुढे केला. यानंतर सायंकाळी संपूर्ण टीम खेड तालुक्याकडे निघाली.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी खेड तालुक्यातील संजय बाबुराव मोरे यांच्या निवासस्थानी संपूर्ण टीम रवाना झाली. आधल्या दिवशी व्यवस्थित झोप न झाल्याने तसेच दिवसभरातील धावपळीत २४ तासांचा शीण इथे घालवण्यात आला. व त्यानंतर रात्री व्यवस्थितपणे झोप झाली. दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने मदतवाटप झाले आणि कोणत्या अडचणींचा सामना झाला यासाठी वाचा MH मराठीचा उद्याचा लेख. धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर

बाजारात पिशवी कापून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या दोन महिलांना केली अटक; टिटवाळा पोलिसांची कामगिरी

टिटवाळा बाजारपेठेत एक महिला खरेदीसाठी गेली असता या महिलेची पिशवी तिच्या नकळत कापून दोन तोळे सोने लंपास करण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच कसून तपास केला आणि २४ तासांच्या आतच चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली.

कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत टिटवाळा बाजारपेठेत सोमवारी पार्वतीबाई बोराडे वय ५० वर्षे रा. टिटवाळा या महिला बाजारपेठेत खरेदी करण्याकरिता गेल्या असता त्यांच्या हातातील पिशवी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून पिशवीत ठेवलेले ५२ हजार रुपये किमतीचा सुमारे २ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

       या गुन्ह्यातील आरोपींचा कल्याण तालुका पोलिस स्टेशन  पोलिस उप निरीक्षक सुर्वे, पोलिस उप निरीक्षक काजोल यादव, पोलिस कर्मचारी तुषार पाटील, दर्शन सावळे, नितीन विशे, योगेश वाघेरे यांनी शिताफीने शोध घेवून सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या  गुन्ह्यातील दोन महिला आरोपी ज्योती अनिल धोत्रे वय २७  वर्ष राहणार आंबिवली आणि पिंकी मनोज साळुंके वय ३५ वर्ष राहणार आंबिवली यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपी महिला यांना अटक करून पुढील कार्यवाही करत आहेत.

बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असते. अशावेळी गर्दीचा फायदा घेऊन हातातली पिशवी धारदार शस्त्राच्या मदतीने नकळतपणे कापून त्यातील किमती माल गायब केला जातो. यात कोणाची पिशवी कापायची यावर अगोदरच पाळत ठेवली जाते. त्याच्या पिशवीत काय असेल ? याचा अंदाज घेतला जातो. आणि त्यानंतर आखो आखो मे इशारा करीत गर्दीमध्ये पिशवी कापून चोरटे रफू चक्कर होऊन जातात. आशा प्रकारणात अनेक महिला पोलिसांत तक्रार देणे टाळत असल्याने अशा चोरट्यांचा चांगलाच जम बसतो. या घटना शहरी भागात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे गर्दीत खरेदी करताना आपल्या किंमती ऐवजाकडे विशेष लक्ष देण्याची आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

कोकणातील तळीये भूस्खलन आणि मनसे आमदाराच्या ११ लाखांच्या मदतीने भारावले गावकरी

कोकणातील महाड तालुक्यातील तळीये गावात दोन आठवड्यांपूर्वी डोंगरावरील जमीन सरकून वाहून गेली. या भूस्खलनात जवळपास ८४ लोकांचा मृत्यू झाला. मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतीच या ठिकाणी जाऊन भेट दिली तसेच मृतकांच्या कुटुंबियांना ११ लाखांची मदत देखील केली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी मुंबई,पुणे,कोल्हापूर सह कोकणात देखील अतिवृष्टीमुळे हाहाकार पसरला होता. अनेक ठिकणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकणात दुर्गम भागात दरडी कोसळल्या तसेच भूस्खलन देखील झाले. यातीलच महाड तालुक्यातील तळीये गावात देखील घडलं. संपूर्ण गावच्या गाव उध्वस्त झाले. कुटुंब मातीखाली गेली. कोसळलेला नुसता डोंगरच नव्हता तर दुःखाचा डोंगर होता. या घटनेनंतर शक्य तितके मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता अनेक लोक रोज या ठिकाणी येऊन भेटी देत आहेत. सरकार कडून देखील मदत केली जाणार असल्याचे आश्वसित करण्यात आले आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोकण दौऱ्यावर असताना या गावात भेट दिली. त्याचप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखाचे सांत्वन केले. आणि पक्षाकडून ११ लाख रुपयांचा धनादेश त्यांनी दुखवटा म्हणून मृतकांच्या कुटुंबियांसाठी गावच्या सरपंचांकडे सुपूर्द केला. मनसेच्या आमदाराने केलेल्या इतक्या मोठ्या मदतीने तेथील लोक भारावले. दिलेल्या मदतीने गेलेला माणूस परत येत नसला तरी अश्या वेळी केलेल्या मदती बद्दल तेथील लोकांनी मनसे आमदारांचे आभार मानले. त्यामुळे सरकार कडून मदत येण्या पूर्वीच मनसेच्या आमदाराने केलेली मदत कुटुंबियांना थोडाफार पाठबळ देईल. तसे पाहता कितीही मोठी मदत दिली तरी दुःखाच्या डोंगरापुढे ती मातीच्या एका कना एवढीच आहे हे मात्र खरं.

लोकांचे संसार वाहून गेलेले आज स्वत: डोळ्यांनी पाहीले. ‘घर असावं घरासारखं’ म्हणायला ना तर घर शिल्लक आहे… न घरातली माणसं. नुसतं मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहून दु:ख भरून येणार नाही, ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण तरीही एक फुंकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ११ लाख रूपये दुखवटा म्हणून तळीये गावचे सरपंच ह्यांच्याकडे सुपूर्द केला. कधीही न भरून येणारं अपरिमित नुकसान झालंय ह्या महापूरात. आज मनसेतर्फे केलेली ही मदत शेवटची नसणार एवढीच ग्वाही जाहीर देतो. पूरग्रस्तहो, तुमच्या दु:खात मी सहभागी होतो, आहे आणि कायम राहीन. आज माझ्यासोबत दौऱ्यावर आलेले सगळे मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक ह्यांचा मला सार्थ अभिमान आहे.

– राजू पाटील (आमदार,मनसे)

-संतोष दिवाडकर

कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची शिवसेनेची मागणी

मागील माही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून सर्व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना आर्थिक व सर्वोतोपरी मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुखांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

१७ ते २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व मधील खडेगोळवली, वालधुनी, अशोक नगर, शिवाजी नगर, नेहरू नगर, आनंदवाडी, साई नगर, कैलास नगर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या चाळी मध्ये पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरातील बहुतांश सामान अन्न धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत.  या विभागातील राहणारे सर्व नागरिक हे गरीब व मध्यमवर्गीय असून मोल- मजुरी व नोकरी धंदा करणारे असून या कोरोना च्या काळामध्ये अनेक नागरिक बेरोजगार आहेत. त्या मध्ये आलेल्या या नेसर्गिक आपत्ती मुळे त्यांची पूर्ण वाताहत झाली आहे.

या सर्व नागरिकांना कोणताही आधार नसल्यामुळे या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून या पूर ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करून आधार देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास करणाऱ्या सिद्धार्थ गणाईचे कल्याण मध्ये आगमन

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास “एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं” ही मोहीम घेऊन निघालेल्या सिद्धार्थ गणाईचे आज कल्याणामध्ये आगमन झाले असून त्याच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कल्याणनजीक असलेल्या बापगावच्या  सरपंचांच्या हस्ते या मोगली सफर चा सत्कार करण्यात आला.

या धाडसी प्रवासच कौतुक करत ह्या तरुण वयात ही जाणीव घेऊन एक पाऊल उचलण खूप मोठी गोष्ट असून सिद्धार्थ ने जे काम हाती घेतले आहे त्या कामाला आमचा पाठींबा असल्याचे सरपंचांनी सांगितले. तसेच याठिकाणी गणाई परिवारातील ज्योती निकाळजे व तमाम सदस्य आणी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यादेखील उपस्थित होत्या.

     एक 22 वर्षीय पछाडलेला तरुण त्याच्या स्वप्नांना साकार करत एक सामाजिक जाणिव घेऊन रायगडच्या पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून हिमालयाच्या दिशेने चालत निघाला आहे. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी मी एक हा छोटा प्रयत्न करत आहे. आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. असे सिद्धार्थ गणाई यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण गांधारी पुलाचे झाले PWD कडून परीक्षण; पुलाला कसलेही तडे नाहीत

कल्याण येथील गांधारी पुल काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे बंद करण्यात आला होता. मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाचे परीक्षण केले. तपासणीअंती पुलाला कसलेही तडे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गांधारी पुलाला तडे गेल्याची माहिती मिळताच हा पूल सोमवारी रात्री खबरदारी म्हणून तात्काळ बंद करण्यात आला. कल्याण शहरातून हा पूल पडघा भागाला जोडतो. शिवाय नाशिकला जाण्यासाठी हा एक सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावरील गांधारी येथे उल्हास आणि काळू नदीच्या संगमी पात्रावर हा पूल उभा आहे. या पुलाची पुरामुळे दुरवस्था झाली असून पिलरला तडे गेले आहेत असा संशय प्रशासनाला आल्याने काल तात्काळ वाहतूक रोखली होती.

आज मंगळवारी दुपारच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,स्थानिक रहिवासी आणि पत्रकारांसमवेत बोटीच्या माध्यमातून या पुलाची पाहणी करण्यात आली. ज्या पिलरला तडे गेले आहेत त्या पिलरवर चढून अधिकारी तथापि इंजिनिअर यांनी पिलरची तपासणी केली. पुर परिस्थितीत पिलरला लपेटलेल्या काळ्या कपड्यामुळे सिमेंट उधडल्याचा आभास निर्माण होत होता. मात्र जवळून पाहणी केल्या नंतर पिलरला वेढलेले कापड आणि गवत बाजूला सारून व्यवस्थित परीक्षण करण्यात आले. यानंतर पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक दिलासादायक माहिती अधिकाऱ्यांनी लोकशाही न्यूजशी बोलताना दिली.

गांधारी पूल सुस्थितीत असला तरीही उद्या बुधवारी पुन्हा एक एक्सपर्ट टीम या पुलाचे बारकाईने परीक्षण करणार आहे. यानंतर पुलाला हिरवा सिग्नल देऊन पुलावरील वाहतूक सुरू केली जाणार आहे. जर या पुलाचे नुकसान झाले असते तर डागडुजी होई पर्यंत वाहनचालक,स्थानिक रहिवासी आणि परिणामी प्रशासनाला मोठ्या जाचाला सामोरे जावे लागले असते. यात वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला असता. सुदैवाने पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली असून उद्याच्या पाहणी नंतर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-संतोष दिवाडकर

बहिणीच्या प्रियकराला चालत्या ट्रेनमधून दिलं ढकलून; महिन्याभरानंतर डोंबिवली जीआरपीने हत्येतील आरोपींना केली अटक

डोंबिवली जीआरपी पोलिसांनी खळबळजनक अशा हत्येची घटना उघडकीस आणली आहे. प्रेमाच्या विरोधात प्रेयसीच्या भावांनी तिच्या प्रियकराला महिन्याभरापूर्वी चालत्या ट्रेनमधून खाली फेकले होते. रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडलेला प्रेमी साहिल हाश्मी याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले .परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशीनंतर जीआरपी पोलिसांनी साहिलच्या हत्येप्रकरणी मुलीचे वडील शब्बीर हाश्मी, कासिम हाश्मी, गुलाम हाश्मी यांच्यासह १० जणांना अटक केली.

डोंबिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील रहिवासी साहिल हाश्मी हा एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. गेल्या महिन्यात १५ जून रोजी साहिलने आपल्या प्रेयसीला पळवून नेले होते. १८ जून रोजी दोघेही रत्नागिरी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांना समजले की आपली मुलगी साहिलसोबत पळून गेली आहे. आणि तिच्या वडिलांना राहवले गेले नाही.

मुलीच्या वडिलांनी आपल्या भावाला यूपीहून अंबरनाथ येथे फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर रत्नागिरी एक्सप्रेस १९ जून रोजी रात्री अकरा वाजता कल्याणला पोचणार होती. यापूर्वीच मुलीचा चुलत भाऊ आपल्या मित्रांसह कल्याण स्टेशनला पोहोचला. ट्रेन कल्याण येथे पोहोचल्यावर मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र ट्रेनमध्ये चढले आणि दोघांना शोधून काढले. साहिलला वाईट मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला कोपर ते दिवा रेल्वे स्थानक दरम्यान चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.

सुरुवातीला पोलिसांना हा अपघात आहे असे वाटले होते, परंतु जेव्हा जीआरपी पोलिसांनी साहिलच्या नातेवाईकांशी बोलून सर्व बाबींचा बारकाईने शोध घेतला, तेव्हा सर्व तथ्य उघडकीस आले. साहिलच्या हत्येतील 10 आरोपींना डोंबिवली जीआरपीने अटक केली. एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणच्या गांधारी पुलावरील वाहतूक केली बंद; पुरामुळे पूल डॅमेज ?

कल्याण पडघा मार्गावर असलेला गांधारी पुल आज रात्रीच्या सुमारास वाहतुकीसाठी अचानकपणे प्रशासनाने बंद केला आहे. मागील काही दिवसांत आलेल्या पुरामुळे या पुलाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात असून उद्या PWD द्वारे पुलाची पाहणी होणार आहे.

कल्याणहुन पडघामार्गे नाशिकला जाण्यासाठी गांधारी पुलाचा वापर केला जातो. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. शिवाय स्थानिक गावकऱ्यांना कल्याणकडे येण्यासाठी हा सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावर गांधारी येथे असलेल्या खाडीवर एक मोठा पूल आहे. नुकत्याच आलेल्या पुरामुळे या पुलाच्या पिलरला तडे गेले असल्याचा संशय प्रशासनाला लागून आहे. त्यामुळे कसलीही दुर्घटना टाळण्यासाठी पुलावरील वाहतुक सोमवारी रात्रीच्या दरम्यान प्रशासनाने तात्काळ बंद केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उद्या या पुलाची पाहणी होणार आहे. पाहणी दरम्यान पुलाचे नुकसान झाल्याचे आढळल्यास डागडुजीचे काम सुरू केले जाईल. पुलाच्या कामासाठी सहा महिने ते एक वर्ष देखील लागू शकतात अशी शक्यता आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्याने पर्यायाने भिवंडी मार्गाचा अवलंब वाहनचालकांना करावा लागणार आहे. तसेच आसपासच्या गावातील गावकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार हे निश्चित.

-संतोष दिवाडकर

कल्याण मधील पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत करण्याची कॉंग्रेसने केली मागणी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे कल्याण मधील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. पुराच्या या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई म्हणून पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत त्वरित देण्याची मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी आढाव यांच्यासमवेत कल्याण शहर अध्यक्ष विश्वास चिकणे, कार्याध्यक्ष रवी शिवाळे, सामजिक कार्यकर्ते प्रदीप गवाळे उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे कल्याणच्या विविध परिसरासह प्र.क्रं. १६, मिलिंद नगर घोलप नगर येथे संपुर्ण परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपुर्ण परिसर हा पाण्याखाली गेला होता. येथील नागरिकांचे व सर्व व्यापारी वर्गाचे खुप नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना काल खंडामध्ये लॉक डाऊन असल्यामुळे सर्व नागरिक हतबल झाले असताना या पुर परिस्थितीमुळे लोकांची परिस्थिती खुप बिकट झाली आहे. त्यामुळे या पूरपरिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून  प्रत्येकी कुटुंबास २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करण्याची मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे