डोंबिवलीत भरपावसात महिलांची सायकल रॅली; महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला अभिमान

डोंबिवली :  हिरकणी प्रतिष्ठानचा सायकल रॅलीचा उपक्रम अतिशय अभिमानास्पद आहे. असे उदगार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हिरकणी प्रतिष्ठान व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने डोंबिवली पूर्व येथील कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकापासून महिलांच्या “सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले आणि या सायकल रॅलीस शुभेच्छा दिल्या. या सायकल रॅलीत भर पावसातही सुमारे ७५ महिलांनी आपापल्या सायकलींसह अत्यंत उत्साहात आपला सहभाग दर्शविला होता. या रॅलीमध्ये महिलांसमवेत लहान मुलींची देखील उपस्थिती लक्षणिय होती.

रॅलीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कॅ. विनयकुमार सच्‍चान स्मारकास पुष्पांजली वाहिली. यावेळी महापालिका आयुक्त तसेच बँक‍ ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर देवदत्त रोकडे, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर संजय जाधव व इतर मान्यवरांचा हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ व सचिव पूजा तोतला यांच्याहस्ते फुलांचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: उपस्थित राहून रॅलीमधील महिलांना शुभेच्छा दिल्यामुळे आमचा उत्साह व हुरुप द्विगुणित झाला असे भावोद्गार हिरकणी प्रतिष्ठानच्या  सचिव पूजा तोतला यांनी यावेळी व्यक्त केले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची रिपरिप

कल्याण :- कल्याण डोंबिवली व आसपासच्या शहरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात सकाळपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. जवळपास ८ तासांपेक्षा जास्त काळापासून पाऊस नॉन स्टॉप पडत आहे. यामुळे नक्की डिसेंबर आहे की जून असा संभ्रम निर्माण झाला आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम मानला जातो. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिना हिट देतो आणि नोव्हेंबर पासूनच थंडीला सुरुवात होते. मात्र वाढलेल्या जागतिक तापमानानुसार डिसेंबर मध्येही फारशी थंडी जाणवत नाही. ज्याठिकाणी झाडी झुडूप असतील तितक्याच भागात थंडी जाणवते. कल्याण डोंबिवली सारख्या गर्दीच्या शहरी भागात थंडी फक्त सकाळच्या सुमारासच जाणवते. परंतु याच थंडीच्या दिवसांत पावसाळ्यात पडतो अगदी तसा पाऊस दिवसभर पडताना दिसत आहे.

कल्याण डोंबिवली शहरात सकाळपासून पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. स्वेटर काढून रेनकोट घालण्याची पाळीच अक्षरशः आलेली आहे. त्यात पालिका क्षेत्रात काही शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना देखील जून महिन्याचा आभास झाला. यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड मिम्स आणि विनोद पसरत आहेत. हिवाळ्या नंतर डायरेक्ट पावसाळा सुरू झाला आहे मग उन्हाळा गेला कुठं ? अश्या पद्धतीचे विनोद सध्या वाचायला मिळत आहेत. तर काहींनी पुन्हा एकदा पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखला. तर काहींनी घरच्या घरी गरमागरम भजी बनवण्याला पसंदी दिली. त्यामुळे वेळी असो की अवकाळी पाऊस पाऊस आहे.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत निष्कासित केलेली अनधिकृत इमारत पुन्हा राहिली उभी; पडद्याआड चाललेलं बांधकाम ‘ग’ प्रभागाला दिसेना ?

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महापालिकेत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणीपुरवठा न देण्याचे ठरवले आहे. मात्र छुप्या पद्धतीने पालिका आयुक्तांना चकवा देऊन अधिकारीवर्ग त्यांच्या आदेशांना बगल देण्याचे काम करीत आहे की काय असा प्रश्न आता पडू लागला आहे.

डोबिवली पूर्वेतील दत्ता नगर भागात पालिकेने इमारती वर एप्रिल महिन्यात तोडक कारवाई केली होती. अनधिकृत बांधकाम केले म्हणून तोडण्याचा खर्च बांधकाम व्यावसायिकाकडून घेतला. यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रभाग अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक प्रफुल गोरे यांना नोटीसही बजावली होती. असे असताना आता सद्य स्थितीत त्या शासकीय भूखंडावर नव्याने तळमजला +३ बांधून पडद्याआड उभे आहेत. कायदेनियम धाब्यावर बसवून कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे? अशी चर्चा परिसरात केली जात आहे. संबंधित बांधकाम मोक्याच्या ठिकाणी आणि नेहमीच रहदारीचे असून ‘ग’ प्रभाग कार्यालयाला का दिसून आले नाही? लोकप्रतिनिधीना कसलीही माहिती कशी नाही? हा आश्चर्यकारक विषय आहे. यात प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्त प्रसारित करू नये म्हणून २० ते २५ हजाराची बिदागी देऊन त्यांचे तोंड बंद केले असल्याच्या देखील चर्चा जोरात सुरू आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित बांधकाम दिसत नसावे असेही म्हटले जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील ‘ग’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कायदे नियम पायदळी तुडविले जाऊन बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. याच बांधकामावर काही महिन्यापूर्वी तोडक कारवाई करण्यात आली होती. या बांधकामाला कुठलीही पालिकेची परवानगी नव्हती तीच इमारतीचे मोठ्या जोमाने मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे बांधकाम सुरू आहे. सद्यस्थितीत ग्राउंड प्लस थ्री बांधकाम पूर्णही झाले आहे. शासकीय भूखंडावर उभी राहणारी इमारत तोडली असताना कुठलेही नियम कायदे न पाहता केवळ रेड कार्डच्या आधारे इमारत उभी राहत असल्याचे मानले जात आहे.

यात चक्क डोंबिवलीतील कर्मचारीच बांधकाम व्यावसायिक कडून पैसे घेऊन बिदागी सारखे वाटप करत आहे असे बोलले जात आहे. आणि यात काही माध्यम प्रतिनिधी तसेच प्रसिद्धी प्रमुखांनी दहा ते वीस हजार घेऊन बातम्या दाबण्याचे ठरवले आहे असे देखील म्हटले जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी आणि चौथ्या स्तंभा साठी लाजिरवाणी आहे. चांगले काम करणाऱ्या प्रतिनिधी आणि वार्ताहरा साठी येणारा काळ घातक ठरणार आहे याची थोडी सुद्धा खंत काही वेठबिगरीना नसून ही शरमेची बाब आहे. हा प्रकार खरंच घृणास्पद आणि चीड आणणारा आहे.

हा प्रकार ‘ग’ प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांच्या लक्षात आणून दिला गेला. दरम्यान त्यांनी याप्रकरणी ४७८ अनवये नोटीस बजावली असून चार-पाच दिवसात पोलीस आरक्षण मिळाल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने तोडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. याबाबत पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

-रोशन उबाळे

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला इसम पॉजिटीव्ह; ओमीक्रॉन बाबत दक्षता घेण्याचं पालिका आयुक्तांच आवाहन

डोंबिवली : दक्षिण आफ्रिका येथून आलेला एक ३२ वर्षाचा इसम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेस संबंधित लॅब कडून प्राप्त होताच या व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या इसमाच्या ८ जवळच्या नातेवाईकांची करोना चाचणी केली असता त्यांचे सर्वांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले असून सदर बाब दिलासादायक आहे. तर या विषाणूचा धोका लक्षात घेता मास्क परिधान न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. परदेशात इतरत्र ओमीक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता, महानगरपालिका क्षेत्रातही महापालिकेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा व आपले कोविड लसीकरण वेळीच करून घ्यावे व संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत न घाबरता पुरेपुर खबरदारी व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या  मार्फत करण्यात आले आहे.

हा विषाणू आत्यंतिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सदर विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर कुठेही फिरतांना नाक व तोंड झाकेल अशा पध्दतीने मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या नागरिकांवर त्याचप्रमाणे एखादया दुकानामध्ये, मॉलमध्ये विना मास्क येणा-या नागरिकांवर तसेच संबंधित दुकानदारांवर  कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

-कुणाल म्हात्रे

कल्याण मध्ये हरविलेले मोबाईल नागरिकांना केले परत; सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाची कामगिरी

कल्याण : कल्याण मध्ये म.फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध लावत ते नागरिकांना परत करण्याची कामगिरी कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या टीमने केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, यांच्या अंतर्गत असलेली म.फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१८, २०१९, २०२० या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉप्रटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेण्या बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील व त्यांच्या वाहन चोरी विरोधी व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच. जी.ओऊळकर, पोहवा  पवार, पोना गायकवाड, वाघ, पोशि  चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे एकुण ४४ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षात नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून परत करण्यात आले असून, स्टेशन परिसर, गर्दीच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल अथवा इतर वस्तू चोरी होतात अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली असून चोरीच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील यांनी दिली.

       दरम्यान नागरिकांना आपले हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ओतूर येथील उषा तांबे यांचा २०१९ साली कल्याण पश्चिमेतील रामबाग येथून मोबाईल गहाळ झाला होता. त्यांना देखील आपला मोबाईल मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेतील तीन-चार माजी नगरसेवक शिवसेनेत येण्यास इच्छुक; माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा गौप्यस्फोट

कल्याण :- डोंबिवली पूर्वेतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील तीन ते चार माजी नगरसेवक हे शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचा दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. हे नगरसेवक कोण आहेत ? व कोणत्या पक्षातील आहेत ? अशा चर्चा कल्याण पूर्वेतील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे या भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. तर कल्याण पूर्वेत देखील असे पक्षप्रवेश होउ शकतो असा दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे करीत आहेत. याबाबत महेश गायकवाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली असल्याचे सांगितले गेले. मात्र त्या माजी नगरसेवकाचे सामाजिक,राजकीय कार्य आणि निवडून येण्याचं गणित समजल्या नंतरच त्यांना शिवसेनेत प्रवेश देणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितले.

क.डों.म.पा. मध्ये २०१५ च्या निवडणुकी नुसार कल्याण पुर्व भागात २५ प्रभाग होते. यातील १५ ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तर ९ ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तर १ जागा काँग्रेसने जिंकली होती. त्यामुळे या आकडेवारी नुसार महेश गायकवाड यांनी दावा केलेले संभावित नगरसेवक हे कोणत्या पक्षाचे असू शकतात याबाबत फारसा विचार करावा लागू शकत नाही.

कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक (२०१५-२०२०) :-

शिवसेना (१५)

१. मल्लेश शेट्टी (४२-लोकग्राम)
२. नवीन गवळी (४३-गावदेवी,नेतीवली,मेट्रो मॉल)
३. राजवंती मढवी (८७-शास्त्रीनगर तिसगांव)
४. महेश गायकवाड (८८-संतोष नगर)
५. सुशीला माळी (८९-मंगल राघो नगर)
६. संगीता गायकवाड (९०-चिकणीपाडा)
७. निलेश शिंदे (९१-जरीमरी नगर)
८. स्नेहल पिंगळे (९४-आनंदवाडी)
९. रमेश जाधव (९६-जाईबाई विद्या मंदिर/साई नगर)
१०. राजाराम पावशे (९७-शनी नगर)
११. शीतल मंढारी (९८-विजय नगर)
१२. माधुरी काळे (९९-आमराई)
१३. देवानंद गायकवाड (१००-तिसगाव गावठाण)
१४. सारिका जाधव (१०२-भगवान नगर)
१५. उर्मिला गोसावी (१०६-चिंचपाडा,नांदिवली तर्फ अंबरनाथ)

भारतीय जनता पार्टी (९)

१. रेखा चौधरी (४५-कचोरे)
२. सुनीता खंडागळे (८६-गोळीवली पिसवली)
३. सुमन निकम (९२-गणेशवाडी)
४. विशाल पावशे (९३-लक्ष्मीबाग)
५. विक्रम तरे (९५-नेहरू नगर)
६. हेमलता पावशे (१०१-हनुमान नगर)
७. मनोज राय (१०३-कैलास नगर)
८. मोनाली तरे (१०४-खडेगोळवली)
९. मोरेश्वर भोईर (१०७-पिसवली)

काँग्रेस (१)

१. जान्हवी पोटे (४१-कोळशेवाडी)

महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया

-संतोष दिवाडकर

नागरिकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाची मुल्य ख-या अर्थाने जोपासली जातील; महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

कल्याण :- नागरिकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाचे मूल्य खऱ्या अर्थाने जोपासले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. शुक्रवारी या संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.

संविधान दिनानिमित्त आज महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी, माजी महापौर रमेश जाधव शासनाचे निवृत्त उपसचिव आय.एम.मोरे व उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्याच प्रमाणे, या समयी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले.

दि. २६/११/२००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दाहशवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि दहशदवाद्यांशी लढा देताना शहिद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून मौन पाळण्यात आले. तद्नंतर बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि.) यांच्यामार्फत अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारतीय संविधान गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात जेष्ठ संविधान अभ्यासक व ॲड. विजय निरभवने यांनी उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधान विषयक मार्गदर्शन केले. यावेळी संबोधी सप्तसूर या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय सरकटे आणि समाधान मोरे यांनी केले.यावेळी सार्वजनिक जीवनात वागताना ,वावरताना ,हक्कसाठी आणि प्रगती साठी संविधान किती आवश्यक आहे याची ‘महत्व ” यावेळी सांगण्यात आले.

-रोशन उबाळे

आता प्रभाग कार्यालयात होणार जनता दरबार; क.डों.म.पा. चा नवा उपक्रम

कल्याण : नागरिकांना  त्यांच्या विविध कामासाठी  महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या  सोयीसाठी,  त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरित करण्यासाठी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करण्यासाठी  आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला असून विभागीय उपआयुक्तांनी या दिवशी  त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

 या जनता दरबाराची  रुपरेषा खालीलप्रमाणे आहे :-

 1/अ प्रभाग–बुधवार–दुपारी 3.00 ते 4. 00 – 1/अ प्रभाग कार्यालय

2/ब प्रभाग– गुरुवार–दुपारी 4.00 ते 5.00  –  2/ब प्रभाग कार्यालय

 3/क प्रभाग– मंगळवार दुपारी 3.00 ते 4.00 – 3/क प्रभाग कार्यालय

 4/जे प्रभाग- बुधवार–दुपारी 4.00 ते  5.00 – 4/जे प्रभाग कार्यालय

 5/ड प्रभाग– बुधवार–दुपारी  3.00 ते 4.00 – 5/ड प्रभाग कार्यालय

6/फ प्रभाग–बुधवार –दुपारी  3.00 ते 4.00 – 6/फ प्रभाग कार्यालय

7/ह प्रभाग- गुरुवार-दुपारी  3.00 ते 4.00 – 7/ह प्रभाग कार्यालय

8/ग प्रभाग– गुरुवार – दुपारी  4.00 ते 5. 00 – 8/ग प्रभाग कार्यालय

9/आय प्रभाग–गुरुवार –दुपारी 4.00 ते 5. 00 – 9/आय प्रभाग कार्यालय

10/ई प्रभाग– शुक्रवार – दुपारी 4.00 ते 5. 00 –10/ई प्रभाग कार्यालय

या जनता दरबाराचा प्रारंभ पुढील आठवडयापासून होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी उकळून प्या; उल्हासनदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

कल्याण :- कल्याण मुरबाड रोड उल्हास नदीत रायते पुल ते मोहना धरणापर्यंत नदीत फेसयुक्त केमिकल दोन दिवसांपूर्वी दिसून आला होता. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईची विनंती केली होती. यानंतर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी नदीतील पाण्याचे नमुने घेतले आहेत.

पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण होत असलं तरी अति प्रदूषित पाणी व केमिकल्स थेट उल्हास नदीत सोडल्याने नागरिकांना पोटाचे विकार व इतर परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्यातरी पाणी गाळून आणि उकळून पिण्यापेक्षा दुसरा पर्यायच दिसत नाही. मंडळाने नदीतील तीन ठिकाणचे नमुने घेतले असून पंचनामा केला आहे. परंतु प्रदूषण मंडळाने कारखान्यांवर धाडी टाकून पाहणी करण्याचे आवाहन समितीकडून करण्यात येत आहे.

उल्हासनदीचं पाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर देखील पोहोचवले जाते. जवळपास करोडो लोकांची तहान ही नदी भागवत असल्याचे सांगितले जाते. या नदीपात्रात कधी जलपर्णीचे साम्राज्य वाढते तर कधी केमिकल्सचा थर जमा होतो. विविध सामाजिक राजकीय संघटना वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेतात मात्र प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई का केली जात नाही ? असा सवाल आता पडू लागला आहे.

-संतोष दिवाडकर

“भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे”; शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी नगरसेवकाची भाषणात भूल

डोंबिवली :- डोंबिवलीतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशा नंतर मंचावर भाषण करण्यासाठी माजी नगरसेवक महेश पाटील यांना संधी दिली गेली. मात्र भाषणा दरम्यान महेश पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण मंचावर हश्या पसरला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळी स्वतःला हसण्यापासून रोखू शकले नव्हते.

सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी सायली विचारे, सुनीता पाटील आणि महेश पाटील या भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान महेश पाटील हे भाषण करीत होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीने भारावून मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे असे अनवधानाने ते बोलून गेले. मात्र उजव्या बाजूला बसलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी चटकन चूक लक्षात आणून दिली. यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी देखील चुकीचा शब्द पकडला. महेश पाटील यांच्या डाव्या बाजूला पालकमंत्री एकनाथ शिंदे मोबाईल पाहत असताना त्यांचेही लक्ष चुकीच्या वाक्याने वेधले गेले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना हसू आवरता आले नाही. सर्वत्र हास्याची लाट उसळली. यानंतर महेश पाटील यांनी वाक्याची दुरूस्ती करीत मला ते सवयीचे आहे असे म्हणत आणखीन एक विनोद केला. सध्या ही व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

क.डों.म.पा. ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने पक्षप्रवेश आणि राजकीय उलथापालथ शहरात सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुमचा नगरसेवक कोणत्या पक्षातून येणारी निवडणूक लढवणार आहे हे कदाचित तुम्ही देखील सांगू शकणार नाही.

व्हडीओ पहा

-संतोष दिवाडकर