कल्याण मधील युवकाचा अपघाती मृत्यू की घातपात ? नातेवाईकांसमवेत आमदारांचा यंत्रणेवर गंभीर आरोप

धुलीवंदनाच्या दिवशी चिंचपाडा कल्याण येथील आनंद मुकुंदे हा युवक होळी खेळायच्या निमित्ताने बाहेर गेला असता अचानकपणे बेपत्ता झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह अंबरनाथ चिखलोली धरणाच्या काठावर आढळून आला होता. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली असली तरी त्याची हत्या झाली असल्याचा आरोप त्याचे नातेवाईक करीत आहेत. यादरम्यान आनंद राहत असलेल्या ठिकाणचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संबंधीत यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

३० मार्च रोजी एक मृतदेह धरणा काठी आढळून आला होता. ओळख न पटल्याने शिवाजी नगर पोलिसांनी पंचनामा करीत तो मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट्रल रुग्णालयात पाठविला होता. यानंतर पोलिसांनी फोटो व्हायरल करताच तरुणाची ओळख पटली. हा मृतदेह आनंद मुकुंदे या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी आनंदच्या नातेवाईकांनी त्याच्या शरीरावर जखमा असल्याचे सांगत त्याची हत्या झाली असून पोलीस व रुग्णालय प्रशासनाने खोटा अहवाल बनवत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवाय आनंद बेपत्ता असल्याची तक्रार घेण्यास देखील पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली आणि आनंद सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. मृतदेह सापडल्यानंतर ओळख पटे पर्यंत किमान दोन दिवस वाट पाहणे अपेक्षित असताना पोलिसांनी तात्काळ बेवारस जाहीर करीत शवविच्छेदन केले कसे ? असा सवाल आमदारांनी उपस्थित करत पोलीस अधिकारी आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र सर्व आरोपांचे खंडन करीत आनंदचा मृत्यू पाण्यातच बुडून झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. सध्या नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह शिवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील उलगडा होणार आहे.

संपूर्ण व्हिडीओ मध्ये पहा काय केलेत नातेवाईक आणि आमदारांनी आरोप :-

Report by Aadiraj Media
कल्याण डोंबिवलीत कोरोनाची ऐशी तैशी; आज पुन्हा नवा रेकॉर्ड.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना हाय स्कॉर रेकॉर्ड बनवत आहे आणि दुसऱ्या दिवशी मोडत आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात आज दि.२५ मार्च २०२१ रोजी ९८७ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आणि आता हा नवा उच्चांक बनला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. एकीकडे सचिन वाझे प्रकरण तर दुसरीकडे कोरोनाचे वाढते आकडे याच चर्चा योगायोगाने महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत लाखोंच्या सभा पाहायला मिळतात. मात्र कोरोना महाराष्ट्रातच आहे का ? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. देशातील टॉप १० कोरोना हॉटस्पॉट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातीलच ९ शहरे समाविष्ट आहेत. यातील पुणे शहर देशात पहिल्या स्थानावर आहे.

कल्याण डोंबिवलीत वाढत्या कोरोनाच्या अकड्यामुळे होळी सणावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे अनेकांमध्ये नाराजी देखील आहे. शिवाय वाढत्या बेसुमार आकड्यांवर देखील नागरिक सवाल तसेच शंका उपस्थित करीत आहेत.

“मागच्या वर्षी सरकारने लावलेलं लोकडाऊन सर्वसामान्य जनतेनं मान्य केलं होतं. आताचे आकडे पाहता नक्की कोरोना आहे का ? हाच मोठा प्रश्न पडतो. बिल्डिंगमध्ये एखादा पोजिटिव्ह सापडला तर त्याच्या आजूबाजेचे देखील पकडले जातात. आणि त्यांनाही कोरोना निष्पन्न होतो. मुळात कोविड टेस्ट यंत्रणा आहे का ? हे कफ काऊंट करत आहेत का ? म्हणजे बॉडी मध्ये थोडा जरी कफ असल्यास तो पोजिटिव्ह येतोय. वाढणाऱ्या आकड्यांमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. लोकांना आता कोविड सोबत जगायची सवय लागली आहे त्यामुळे लोकडाऊन लावण्याला अर्थ नाही. वाढत्या आकड्यांतच मुळात संभ्रम आहे. ते नक्की खरे आहे की खोटे हे काही खात्रीशीर सांगता येत नाही.”

– प्रथमेश सावंत
(अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था)

होळीचा बेरंग ! कल्याण डोंबिवलीत धुलीवंदन प्रतीबंधात्मक आदेश जारी

क.डों.म.पा. क्षेत्रात आज ८८१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने होळी, धुलीवंदन या सणांवर बंधने लादली आहेत.

महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना होळी व धुलिवंदन खाजगी तसेच सार्वजनिक जागेत सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. ‘मी जबाबदार’ मोहिमे अंतर्गत वैयक्तिकरित्या देखील उत्सव टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर साथीरोग नियंत्रण कायदा तसेच आपत्ती निवारण कायद्या अनव्ये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. दि.२८ मार्च रोजी होळी तर २९ मार्च रोजी धुलिवंदन असून यावर प्रशासनाची नजर असणार आहे. त्यामुळे यावर्षी रंगाचा बेरंग होऊ शकतो यात शंका नाही.

आता तर हद्दच पार ! कल्याण डोंबिवलीत कोरोनाने कालचा रेकॉर्ड मोडीत गाठला अनपेक्षित आकडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता कहर शहरवासीय आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. कालच्याच दिवशी दि. २३ मार्च २०२० रोजी कोरोनाने शहरातील आतापर्यंतचा हाय स्कोर आकडा दिला होता. ७११ रुग्ण काल नोंदवले गेले होते. परंतु आज पुन्हा कोरोनाने तो आकडा मोडून लांब उडी घेतल्याने प्रशासनाला हादरून सोडले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आज दिवसभरात कल्पनेपेक्षाही अधिक तब्बल ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. काल प्रथमच ७०० चा आकडा पार करीत हाय स्कोर रचला होता. मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढीत कोरोना जवळ जवळ ८०० चा आकडा पार करीत सरळपणे ९०० ला येऊन खेटला आहे. आजच्या या आकड्यामुळे प्रशासन देखील हादरले आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध लागू असतानाही वाढलेला प्रकोप हा चर्चेचा विषय बनला आहे.

आज आलेल्या आकड्या नंतर महापालिका क्षेत्रात आता एकूण ५९२९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. आजच्या दिवसात दोघांनी जीव गमावला असून ४०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सापडलेल्या ८८१ रुग्णांपैकी सर्वाधिक २७१ रुग्ण कल्याण पश्चिमेतील आहेत. यानंतर २६३ रुग्ण डोंबिवली पूर्व, १४९ रुग्ण कल्याण पूर्व, १४४ डोंबिवली पश्चिम, ३८ मांडा टिटवाळा, १५ मोहना तर १ रुग्ण पिसवली येथील आहे. आजचा आकडा हा महापालिका क्षेत्रातील सर्वोच्च आकडा बनला आहे. यामुळे प्रशासन आता काय करतंय याचीच भीती येथील व्यापारी आणि नागरिकांना लागून आहे.

शहरात वाढलेल्या आकड्यांवरून मनसेनं मात्र आता थेट सवाल केला आहे.

“गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने शहरात वेकसिनेशन सेंटर वाढवावीत. बंद केलेली कोरोना हॉस्पिटले पुन्हा सुरू करावीत. अख्या देशात कोरोना फक्त महाराष्ट्रातच आहे का ? कोलकत्ता मध्ये विविध पक्षांच्या लाखोंच्या सभा होतात. हजारोंचे मोर्चे आसाम,पश्चिम बंगाल, केरळ मध्ये निघतात. तिकडे कोरोना नाही का ? ताप हा फक्त कोरोनाचाच असतो का ? डेंगू, मलेरिया हे प्रकार गेले कुठे ? लोकांना घाबरवायचे धंदे बंद करा. लोकांना जगू द्या लोक आधीच वर्षभर पिचलेले आहेत. आणि जगाला वॅक्सिन पुरवण्या आधी देशातील नागरिकांना वाटा.”

मनोज घरत (मनसे शहराध्यक्ष, डोंबिवली)
Shocking !!! कल्याणमध्ये कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड – झाली विक्रमी नोंद

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा नुसता हाहाकार माजला असल्याचे दिसून येत आहे. मागील काही आठवड्यापासून वाढते आकडे थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज मंगळवार दि. २३ मार्च २०२१ रोजी कोरोनाच्या आकड्याने विक्रमी नोंद केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज तब्बल ७११ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ७०० चा आकडा प्रथमच पार झालेला असून हा कोरोनाचा हायस्कोर बनला असून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनू लागला आहेत.

२२ मार्च २०२० रोजी लोकडाऊन घोषित करण्यात आले होते. सध्या लोकडाउनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी कडक निर्बंध बनविले होते. मात्र इतके करूनही कोरोनाचा आकडा काही केल्या थांबताना दिसत नाही. मंगळवारी सायंकाळी आकडा बाहेर पडताच पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यानंतर आता पालिका आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

आजच्या ७११ रुग्णांसह महापालिका क्षेत्रात आता एकूण ५४५९ कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात कोरोनाने तीन रुग्ण दगावल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. वाढलेल्या आकड्या समवेत ४०४ रुग्णांना आज डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. मात्र असे असले तरी अधिक काळजी घेणे आता गरजेचे ठरू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्यकारिणी जाहीर -पदांचे वाटप करून राष्ट्रवादीने भरला उत्साह

राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतुन पक्षातील पदाधिकाऱ्यांना विविध पदाच्या जबाबदाऱ्या नव्याने देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष वंडार पाटील देखील उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक आता आणखीनच लांबणीवर पडताना दिसत आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यातून विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस अशी पदे वितरित करण्यात आली आहेत. पदे मिळाल्यानंतर पदाधिकारी देखील नव्या उत्साहाने व जोमाने कामाला लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे :-

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची क.डों.म.पा.तील सध्यस्तिथी :-

    राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोदी लाटे नंतर मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. शहरातील अनेक मोठे चेहरे देखील पक्ष सोडून निघून गेल्याचे पहायला मिळाले. २०१० च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादीची राज्यातून सत्ता गेल्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत मोठी पीछेहाट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ २ च नगरसेवक निवडून आले होते. असे असले तरी आगामी निवडणुकीत पुनरागमन करण्याच्या तयारीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राज्यातील महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या पुनरागमनाला फायदेशीर ठरू शकते. परंतु ही निवडणूक स्वबळावर झाली तर मात्र राष्ट्रवादीला शिवसेना,भाजपा आणि मनसे या पक्षांचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही पक्षांचे कल्याण मध्ये आमदार असून त्यांचा विशेष असा पगडा आहे.

    वडवली पुलावरून कल्याणच्या दोन आमदारांत जुंपली – मनसेच्या उदघाटनानंतर पुन्हा बंद केला पूल

    मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी असंख्य मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मोहने वडवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे लोकार्पण केले होते. वास्तविकपणे सोमवारी या पुलाचे लोकार्पण होणार होते. मात्र ते लांबणीवर पडल्याने राजू पाटील यांनी स्वतः जाऊन पुलाचे उदघाटन करून टाकले आणि पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला. मात्र रात्री पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अधिकृत लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर खुला करणार असल्याचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. यातच आता नवा पत्रिपुल आणि कोपर पूल बनल्याने काहीसा त्राण कमी झाला आहे. शिवाय सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्याने देखील काहीसा फरक पडल्याचे दिसून येते. मोहने येथील वडवली पूल देखील आता लोकार्पण सोहळ्या साठी पुन्हा बंद करण्यात आलेला आहे.

    “काही तांत्रिक कारणामुळे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते. आणि याबाबत सर्व आमदारांना माहिती देखील दिली होती. मनसेने केलेले उदघाटन अनधिकृत आहे. केवळ खोडसाळपणे राजकीय स्टंटबाजी म्हणून त्यांनी असे केले आहे. या पुलाच्या कामासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता त्यानंतरच हा पूल बनला आहे. मनसेने अनधिकृतपणे उदघाटन केले होते म्हणून पुन्हा पूल बंद करण्यात आला आहे. आता लवकरच अधिकृत लोकार्पण केले जाणार आहे.”

    – विश्वनाथ भोईर (शिवसेना आमदार

    “जवळपास १०-११ वर्षानंतर हा पूल वापरासाठी तयार आहे. काल मंत्र्यांना वेळ नसल्याने नियोजित लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो सुरू केला होता. मात्र तो पुन्हा बंद करण्यात आला आहे. यांना लोकांची सोय महत्त्वाची आहे की उदघाटन ?”

    – राजू पाटील (मनसे आमदार)
    कल्याणमधील प्रलंबित आमराई – तिसगाव रस्ता डांबरीकरणाला सुरुवात

    कल्याण पूर्व भागात अंतर्गत रस्ते रुंदीकरण होणे तसेच दुरुस्ती होणे सध्या फार गरजेचे ठरत आहे. मुख्य रस्ता ते अंतर्गत रस्ते कनेक्टिव्हिटी समाधानकारक नसल्यामुळे वाहतूक कोंडीला कल्याण पूर्वेच्या जनतेला नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

    प्रभाग क्रमांक १०० तिसगाव गावठाणचे मा. नगरसेवक देवानंद गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक ८८ संतोष नगरचे मा. नगरसेवक महेश गायकवाड यांनी आमराई ते तिसगाव पर्यंत जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी महानगरपालिका प्रशासन व आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. चिंचपाडारोड, विजय नगर मार्गे आता शंभर फुटी रोड तसेच तिसगाव गावठाणात जाणे आता या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सोयीस्कर होणार आहे.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असली तरी कल्याणमधील अनेक ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण होत असल्याने नागरिकांना यातुन दिलासा मिळतोय.

    क.डों.म.पा. आयुक्तांचा व्यापाऱ्यांना दिलासा. – निर्बंधांमध्ये केले नवे बदल

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १० मार्च रोजी निर्बंध लादले होते. मात्र या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या कानावर आल्या. यातून व्यापार्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी त्यांनी निर्बंधात नवे बदल केले आहेत.

    कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा दिवसाचा आकडा १०० च्या आत येत असताना अचानकच तो ४०० पर्यंत जायला लागल्याने आयुक्तांनी कडक निर्बंध लादले होते. यानुसार दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात बंद ठेवण्यास संगीतले होते. परंतु यामुळे व्यापारी वर्गात संतापाची आणि चिंतेची लाट उसळली. दुकानभाडे,घरखर्च अशा सर्व चिंता त्यांना लागून होत्या. हि बाब लक्षात घेत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिल रोजी निर्बंधात बदल करून व्यापार्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

    सकाळी १० नंतर व्यापार्यांना दुकान उघडायची वेळ निश्चित करून दिली आहे. पूर्वीची वेळ सकाळी ७ होती. ज्याचा कोणताही फायदा व्यापारी वर्गाला होत नव्हता. नव्या बदलानुसार व्यापारी आता सायंकाळी ८ वाजेपर्यंत आपले दुकान उघडे ठेऊ शकतात. वेळेच्या निर्बंधातून जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने जसे कि भाजीपाला,फळे,किराणा,दुध आदी वगळण्यात आली आहेत. तर बाकी निर्बंध तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत.

    क.डों,म.पा. क्षेत्रातील निर्बंध

    • सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत दुकाने चालू (जीवनावश्यक सेवांची दुकाने )
    • खाद्यपदार्थ व खाद्यपेय हातगाड्या तसेच फेरीवाल्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी.
    • शनिवार-रविवार P1-P2 नुसार दुकाने चालू (पालिका व पोलिसांचे नियोजन).
    • आठवडे बाजार बंद.
    • खाद्यगृह, रेस्टॉरंट आणि बार, ज्यूस व आईस्क्रीम पार्लर, परमिट रूम, पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत ५०% क्षमतेने सुरु.
    • जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यापार्यांनी गर्दी होऊ न देणे, कोरोना पासून बचावाची साधने वापरणे तसेच स्वच्छता राखणे अनिवार्य असेल.
    • रिक्षातून प्रवास करताना फक्त दोनच प्रवासी बसवण्याची मुभा.
    • सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
    • लग्न समारंभ व इतर कार्यक्रम कोरोना नियमांना अनुसरून व्हावेत. याबाबतीत आयोजकांनी प्रभागक्षेत्र कार्यालय व पोलीस स्थानकात प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य. समारंभाचे चित्रीकरण करण करून ते स्वतः जवळ ठेवणे. तसेच पालिका प्रशासन व पोलीस स्टेशनला प्रत उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.
    • जिम,स्पोर्ट्स क्लब,खेळाची मैदाने,उद्याने,स्विमिंग पूल फक्त वैयक्तिक सरावासाठी खुले.  स्पर्धा आणि इतर कार्यक्रमास परवानगी नाही.

    अशा प्रकारचे निर्बंध सध्या महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आले असून उल्लंघन करणार्यावर कारवाई करण्यात येईल. १५ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रात एकूण २३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तिघे जन कोरोनाने दगावले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात एकूण ३०६८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून कोरोनावर नियंत्रण येई पर्यंत हे निर्बंध सुरु असणार आहेत.

    क.डों.म.पा. क्षेत्रातील कोरोना आकडा पुन्हा चार अंकी – कल्याणचे खासदारही कोरोना पोजिटिव्ह

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही कोरोनाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.

    वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्र देखील या आजाराने फोफावले होते. दररोजचा आकडा हा ५०० पर्यंत देखील गेला होता. मात्र हा आकडा जानेवारी पर्यंत निवळत येत दोन अंकी झाला होता. तर एकूण कोरोना रुग्ण हे तीन अंकी म्हणजे १००० च्या आत आले होते. मात्र आता या महापालिका क्षेत्रात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत २०० चा आकडा देखील पार झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी १७८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर महापालिका क्षेत्रात आता सध्याच्या घडीला म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत १६४६ एक्टिव्ह कोरोनारूग्ण आहेत. हा चार अंकी आकडा पुन्हा तीन अंकी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं जास्त गरजेचं असणार आहे.

    कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील मागील दोन-तीन दिवस त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. १ मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती आपल्या फेसबुकद्वारे दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून जे माझ्या संपर्कात आले त्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी आता केलं आहे.