मास्क कारवाईत पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ – दोघांवर गुन्हा दाखल

विना मास्क फिरणाऱ्या विरोधातील कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यावरून दोघांना गजाआड करण्यात आलय. पुन्हा वाढणाऱ्या कोरोनावर नागरिक संवेदनशील नाहीत का? असा सवाल यातून उपस्थित होतोय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र ४ जे ची मास्क परिधान न करणाऱ्यांवर आज चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता. त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. याउलट या दोघांनी थेट पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

लग्नासाठी चाललेले हे दोघेही आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळी वेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाहीच. उलट अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी देणे, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एकाच कुटुंबातील पाच जनांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू – मुळशी तालुक्यातील घटना

मुळशी तालुक्यातील वाळेण गावात वळकी नदीच्या डोहात रविवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच जणांना जलसमाधी मिळाली. आईला वाचवण्यासाठी उडी मारलेल्या तिन्ही मुलींसमवेत पतीचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण कुटुंबाला मृत्यूने कवटाळले. या घटनेनंतर संपूर्ण मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास लायगुडे कुटुंब कपडे धुण्यासाठी वळकी नदीच्या डोहावर आले होते. याच दरम्यान कपडे धुवत असतानाच काळाने घावा घातला आणि दुर्दैवी घटना घडली. पौर्णिमा शंकर लायगुडे ही महिला कपडे धुवता धुवता पाण्यात पडली. आपली आई पाण्यात पडली हे पाहून तिच्या तिन्ही मुली. अर्पिता, अंकिता, राजश्री या तिघींनीही पाठोपाठ पाण्यात उड्या घेतल्या. दुर्दैवाने कुणालाही पोहता येत नव्हते. परंतु जन्मदात्या आईसाठी या तिन्ही मुलींनी पाण्यात उड्या घेतल्या आणि जीवनाशी संघर्ष सुरू झाला. आपले कुटुंब पाण्यात बुडतय हे पाहून या मुलींचे पिता शंकर दशरथ लायगुडे यांनी देखील पाण्यात उडी घेतली. संपूर्ण कुटुंब वळकी नदीच्या पाण्यावर हातपाय हलवत होत. पण वळकी नदीन डोळे मिटले आणि संघर्ष संपला. एकामागोमाग एक करत पाचही जणांना वळकी नदीन कवेत घेतलं आणि होत्याच नव्हतं झालं. क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबाने जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर वाळेन गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी धाव घेतली. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाळेन गावासह संपूर्ण मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘अहो नगरसेवक कोणे ?’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या समोर राजू पाटील यांनी व्यक्त केला मनसे नगरसेविकेचा अभिमान

उल्हासनदी बचाव मोहिमेला सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर यांच्याशी उल्हासनदी प्रश्नावर चर्चा केली. शिवाय मनसे पक्षाचा जाहीर पाठिंबा देखील दर्शवला.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या समवेत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. याच वेळी जवळच्याच भागातील मोहने कोळीवाडाच्या मनसे नगरसेविका सुनंदा कोट देखील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी राजू पाटील यांना राहुल कोट यांनी प्रभागात येण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत “तुमच्या प्रभागात छान आहेत रस्ते” असे म्हणत राजू पाटील यांनी मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कामाची पोचपावती दिली. याचवेळी आंदोलनकर्ते तसेच शिवसेना पदाधिकारी कैलास शिंदे यांनी देखील त्यांचा प्रभाग स्वच्छ असल्याचे सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी लगोलगच “अहो नगरसेवक कोणे?” असा असा प्रश्न शिंदे यांना करीत मनसे नगरसेविकेचे कौतुक केले.

सुनंदा कोट या क.डो.म.पा. तील १० नगरसेवकांपैकी १ आहेत. त्यांचे पुत्र राहुल कोट हे देखील मनसेचे पदाधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी प्रभागात विविध विकासकामे केली होती तसेच कोरोना काळातही त्यांनी लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. याचीच पोच पावती म्हणून मनसेच्या आमदारांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला असल्याचे मनसेचे पदाधिकारी सांगतात.

व्हिडीओ पहा

‘…अन्यथा कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात’ – मनसे आमदार राजू पाटील

उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले जाते. मात्र हे पाणी उचलण्यापुर्वीच या नदीत सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले गेले आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण नदी विषारी जलपर्णीने व्यापून गेली आहे. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेते आणि दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. या नदी साठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. ठोस उपाययोजना राबवली जावी याकरिता नितीन निकम आणि काही समाजसेवक धरणे आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी भेटी दिल्या तर अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.

उल्हास नदी साठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली. उल्हासनदी साठी आश्वासन दिलं जातात परंतु होत काहीच नाही. या नदीसाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुटणारा नाही. पर्यावरण, जलसंधारण आणि प्रदूषण या तिन्ही विभागांनी मिळून ठोस उपाययोजना राबवायला हवी. अन्यथा लाखो लोकांचे आरोग्य धोक्यातच जाणार असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नितीन निकम आणि काही समाजसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी मनसे कडून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे

माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्र.क्र.९० चिकणीपाडा येथे माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रभागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड या गेली पाच वर्षे प्रभाग क्रमांक ९० चिकणीपाडाच्या नगरसेविका म्हणून काम करीत होत्या. संगीता गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल – रिसर्च सेंटर, तेरणा डेंटल कॉलेज व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

आयोजित शिबिराचा लाभ प्रभागातील असंख्य नागरिकांनी घेतला. या शिबिरात मोफत डोळे तपासणी, दातांची तपासणी, विविध आजारांची तपासणी केली गेली. या नंतर हृदय,अन्ननलिका,एपेंडीक्स,कॅन्सर,यकृत,मणके,किडनी,मुतखडा,गर्भाशय,हाडांचे फ्रॅक्चर अशा विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. प्रभागातील गरीब नागरिकांसाठी हे शिबीर लाभदायक ठरले असल्याचे नागरिक सांगतात. तसेच गरजू व गरजू लोकांसाठी असे शिबिर आयोजित करायलाच हवे असे मत प्रभागाच्या तत्कालीन नगरसेविका संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले.

संगीता गायकवाड यांनी आयोजित केलेल्या शिबिरात शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेना शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, युवासेना शहर अधिकारी संजय मोरे, सागर घायवट, वैशाली पेटकर, सचिन राणे, सुरेश काळे, विवेक बर्वे, निंबाळकर, सूरज विर, संतोष दिघे, छबुताई रणसिंगे आदी महिला आघाडी तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे कामगारांनी लावलेल्या नायलॉन सदृश रश्शीमुळे दोघांचा गळा चिरून मृत्यू – कल्याण रेल्वे स्थानक हद्दीतील घटना

कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी एक गंभीर दुर्घटना घडली. फलाट क्रमांक ७ नजीक काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी नायलॉन रश्शी लावली. मात्र ही रश्शी न दिसल्याने दोघांचा गळा चिरून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

काम सुरू असताना ‘काम सुरू आहे’ फलकासह बेरिकेट लावणे गरजेचे होते मात्र असे न करता नायलॉन सदृश रश्शी लावली. ही रश्शी डोळ्यांना न दिसल्याने दोन तरुणांचा गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सांगळे व मुकेश राय अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

आज शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोबदला मिळणे व रस्त्यावर रश्शी बांधणाऱ्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक प्रबंधक, एरिया मॅनेजर, आरपीएक इंचार्ज, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी यांना ही निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील रिपाईच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिपाईचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मृतांना न्याय मिळावा याकरिता समाजसेवक सुमेध हुमने व शेखर केदारे देखील उपस्थित होते.

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.

कल्याणमध्ये आंदोलनातून मनसेने दाखवली ताकद

क.डों.म.पा.ची निवडणूक महिन्याभरावर आलेली असताना शहरात राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. राजकीय पक्ष आपआपला जोर दाखवू लागले आहेत. मनसेने देखील डोंबिवलीत दोन झटके झेलल्यानंतर कल्याणमध्ये आंदोलनाच्या मार्फत शक्तीप्रदर्शन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण-डोंबिवली शहराच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि वाढीव वीजबिल विरोधात महामोर्चा आयोजित केला होता. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यलयाला भेट दिली. डोंबिवली शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज घरत तसेच कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनसेचे काही नगरसेवक, माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात एकवटले होते.

शहरात होणार्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष तयार असल्याचा इशारा मनसेने विरोधकांना दिलाय का ? असाही सवाल या आंदोलनातील शक्तीप्रदर्शनातून व्यक्त केला जातोय.

कल्याण – डोंबिवलीचे उत्तर आठ दिवसांत देणार – अविनाश जाधव ,मनसे जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज घरत यांना तत्काळ डोंबिवली शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आणि ‘व्हायचं ते होणारच’ अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांना चेतावणी दिली.

बुधवारी कृष्णकुंज येथे शेकडो सेना-भाजप कार्यकर्त्यांनी तसेच ५०० उत्तर भारतीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे योगदान होते. हा पक्षप्रवेश म्हणजे डोंबिवलीचे उत्तर होते का ? असा सवाल त्यांना उपस्थित माध्यमांनी केला होता.
“कल्याण डोंबिवलीचे उत्तर कल्याण डोंबिवलीतच देणार. आठ दहा दिवस थांबा राजू पाटील मोठा पक्ष प्रवेश घडवून आणणार आहेत.” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

आठ दिवसांत मनसे कल्याण डोंबिवलीत कोणाला पक्षात आणणार याकडे संपूर्ण मनसैनिक आणि इतर राजकीय पक्ष आताच लक्ष ठेवून आहेत. मनसे बेरजेची गणित जुळवण्याची तयारी करीत असताना इतर पक्षांना वजबाकीचा सामना करावा लागू नये म्हणजे नवलच.

वाह ! कंपनीचा कामगारच निघाला चोर. – बदलापूर पोलिसांचा पाच तासात शोध

बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात ४ फेब्रुवारी रोजी मुद्देमाल चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पाच तासांच्या आतच पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. यात आरोपी कंपनीतलाच कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरियर कंपनीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. कंपनीत शिरून अज्ञात चोरट्यांनी २,४५,७०५ रुपये असलेली लोखंडी तिजोरी लंपास केली. शिवाय चोरीचा सुगावा न लागावा यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज जिथे सेव्ह होते ती २००० रुपये किंमतीची डिव्हीआर मशीन देखील काढून नेली. चोरी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांनी अथक मेहनत घेतली आणि चोरांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर गुप्त माहीतगारा कडून पोलिसांनी माहिती मिळवली आणि काही तासांतच पाच आरोपींचा शोध लावला. त्यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या कडून तिजोरी हस्तगत करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंपनीतील ३५ कामगारांची चौकशी केली. यातील एका कामगारावर पोलिसांना संशय बळावला. अधिक सखोल तपास केला असता या चोरीशी त्याचा सबंध असल्याचे उघड झाले. तो याच कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. कंपनीतील सर्व माहिती त्याला असल्याने त्याने बाहेरील साथीदारांना सोबत घेऊन कट रचला आणि चोरी केली. परंतु हि चोरी आता उघड झाल्याने त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

गुन्ह्यातील आरोपींवर बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात भा.दं. वि. कलम ३८०,४५४ व ४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.