उंबर्डे रिक्षाचालक हत्येचा लागला शोध; हत्येप्रकरणी एकाला अटक

कल्याण :- दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा हत्येमुळे कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी रिक्षाचालक अभिमान भंडारी याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला अटक केली आहे. ‘विकृतीने केला घात, दुसऱ्यांच्या घरात डोकावणे पडले महागात’ अशी माहिती पोलिसांनी देऊन याच कारणाने आरोपीने हत्या केल्याचे कबुली दिली आहे.

कल्याण पश्चिमेत उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान भंडारी याची पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रने हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. या हत्येमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हत्या का व कोणी केली याचा तपास सुरू केला. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. अभिमान याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान मयत अभिमान हा रात्री अपरात्री पंजे याच्या वहिनीच्या बेडरुमच्या खिडकीत डोकवायचा. त्याने अनेकदा अभिमानला समज दिली मात्र तो ऐकत नसल्याने सोपान याने अभिमान भंडारी याची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी हत्याचे कारण सांगत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार आणि तपास पथकाने यावेळी आरोपी सोबत पत्रकार परिषदेत घेतली.

-रोशन उबाळे

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांचे कल्याणात बेमुदत उपोषण सूरु

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळ तेजश्री बिल्डिंग समोर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सूरु केले आहे.

      महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय, झोन व सर्कल सचिव पर्यंतचे पदाधिकारी यांची ऑनलाईन बैठक संघटनेचे कार्याध्यक्ष कॉमेड सि.एन.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केंद्रीय पदाधिकारी बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर  महाराष्ट्रामध्ये सर्व सर्कल कार्यालय व झोन कार्यालया समोर साखळी उपोषण संघटनेच्या आदेशानुसार करण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी कल्याण परिमंडल कार्यलयात देखील करण्यात येत आहे. याद्वारे एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रात उभे करण्या बाबत सर्व पदाधिकारी यांनी तयारी दर्शविली.

तिन्ही कंपन्यातील प्रशासनाचे कामगार विरोधी धोरण दिवसें दिवस वाढत चालले असून त्या धोरणाला विरोध करण्याकरीता सुरुवातीला उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) यांच्या समवेत १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेमध्ये मान्य झालेल्या मुद्द्यावर सुद्धा आजपर्यंत कोणतेही परिपत्रक निघाले नाही. याबद्दल महावितरण कंपनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन प्रशासनाची ही दादागिरी खपवून घेणार नाही अशी ही भूमिका संघटनेच्या नेतृत्वाने घेतली असल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार संयुक्त सचिव कॉम्रेड औदुंबर कोकरे व झोनल सचिव कॉम्रेड संतोष चचाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ तेजश्री बिल्डिंग समोर  सोमवार पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आज साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कल्याण परीमंडळा अंतर्गत सर्व कॉम्रेड सतीश म्हात्रे, जे आर पाटील, नारायण पाटील, बाळासाहेब महाले, नरेश थोरात, किशोर जयकर, सुरेश पाटणकर, पी आर बोटे, जगदीश धमके, प्रदीप म्हात्रे, नंदकुमार नाईक, साईनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कल्याण झोन सचिव संतोष चचाणे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत आता ‘इतके’ सक्रिय कोरोना रुग्ण

कल्याण :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व आकड्यांचे रेकॉर्ड्स मोडले होते. यात मृत्युदर देखील मोठ्या प्रमाणावर होता. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पूर्णतः आटोक्यात आलेला असून तुरळक रुग्ण आढळत आहेत.

क.डों.म.पा. च्या २२ नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार सोमवारी १५ नवे रुग्ण एका दिवसात नोंदवले गेले आहेत. यातील ५ रुग्ण कल्याण पश्चिम, ३ रुग्ण डोंबिवली पूर्व, ३ रुग्ण मोहने, तर प्रत्येकी २ रुग्ण डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील आहेत. तर या दिवशी २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकही मृत्यूची नोंद नसणे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. शेवटच्या आलेल्या अपडेटनुसार सध्या महापालिका क्षेत्रात फक्त २५१ रुग्ण हे पोजिटिव्ह असून ते उपचार घेत आहेत.

महापालिका क्षेत्रात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. दररोज हजारो लोकांचे लसीकरण महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोना कमी झाल्याने सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. याचबरोबर रस्त्यावर फिरताना अथवा गर्दीतून जाताना मास्क घालणे बंधनकारक असतानाही बरेच लोक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. कोरोना कमी झाला असून तो अजून संपलेला नसून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. तसेच लसीकरण करून घेण्याचेही आवाहन वारंवार पालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणात भाजपचा महाविकासआघाडी सरकार विरोधात निषेध मोर्चा

कल्याण :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर, कामगारांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती  दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक मनोज राय, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन सादर केले.

महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सरकारने  नेहमीच मायबापच्या भूमिकेत असले पाहिजे. मात्र हे सरकार विचित्र पध्दतीने वागत असल्याची टिका भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच अमरावती दंगल ही स्पॉन्सर्ड दंगल असल्यासारखे चित्र समोर यायला सुरुवात झाली असून लोकांना त्रास देणे, सर्वसामान्य माणसाना वेठीस धरणे, हे सातत्याने सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही यावेळीं त्यांनी केला.

तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते कसे थांबवावे ? काय उपाययोजना करावी यासह एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना राज्य सरकार दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सरकारचा निषेध करण्यासाठी हे ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हादरे

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकिय उलथापालथ मागील वर्षभरापासूनच होताना दिसू लागली आहे. डोंबिवलीतुन भाजपाचे तीन माजी नगरसेवकांनी आता शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे. महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे अशी त्या तिघांची नावे असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कल्याण डोंबिवली या दोन मोठ्या शहरांची मिळून महानगरपालिका तयार होते. यातील कल्याण शहर म्हणजे शिवसेना तर डोंबिवली हा भाजपचा गड मानला जातो. २०१५ साली झालेल्या निवडणुकित शिवसेनेचे ५२ तर भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगली होती. यानंतर २०२० साली कार्यकाळ उलटून गेल्याने सर्व नगरसेवक आता माजी झाले असून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे.

नव्या वर्षात २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली सह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुका रंगणार आहेत. २०१९ मध्ये राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-कोंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी सुरू झाली. राज्यातील बदलले समीकरण पाहता महानगरपालिका निवडणुकांवर देखील त्याचे परिणाम दिसणार याचा अंदाज आता नगरसेवकांना लागलेला आहे. म्हणूनच आता राजकीय उलथापालथ होताना दिसत आहेत.

साल २०१५ ते २०२० च्या काळात भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील हे प्र.क्र. ८२, अंबिका नगर चे नगरसेवक होते. तर अनुक्रमे सायली विचारे या प्र.क्र. ८३, गोग्रासवाडीच्या नगरसेविका होत्या. तर सुनीता पाटील यांनी प्र.क्र. १११ सागाव सोनारपाडाचे नगरसेवक पद भूषवले आहे. डोंबिवलीतील भाजपचे हे तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. आम्ही कुठे तरी कमी पडलो. नगरसेवक का जात आहेत याचे कारण त्यांचे त्यांनाच माहीत असल्याची खंत डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

-संतोष दिवाडकर

दुसऱ्या राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम थांबवावे; कल्याण मधील पदयात्रेतून नाना पटोलेंचं भाजपला आवाहन

कल्याण :  खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ, वाढलेली महागाई, बेरोजगारीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने रविवारी कल्याणात जनजागरण अभियान अंतर्गत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेकडो कॉग्रेस  कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या काळात जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवली जाते. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी सांगत भाजप सरकारवर सडकून टीका केली.

कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जनजागरण यात्रेला सुरुवात होऊन सहजानंद चौक ते बैलबाजार्पयत गेली. काँग्रेसची भूमिका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. ही भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काही ही स्वारस्य नाही, असं पटोले म्हणाले.

विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे. हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सैतान संबोधलं. त्यावरून पटोले यांनी सदाभाऊंना टोला लगावाल. ते पण मंत्री होते. आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपणही आधी आपल्याला समजून घेतले पाहिजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसने क्रूझ पार्टीच्या बाबतजी भूमिका स्पष्ट केली तीच पूढे येत आहे. क्रूझ पार्टीत भाजपच्या लोकांचा  हात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण ठरवून केले आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात निवडणूका येतात. तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन बनवून बदनाम करते. हे आपल्याला सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात दिसून आले. बिहारच्या निवडणूकीच्यावेळी सुशांतसिंहचे प्रकरण आणले होते. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे

स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा भडका; डोंबिवलीत एक कामगार होरपळला

डोंबिवली :- शहराच्या पूर्व भागात असणाऱ्या पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा अचानक भडका होऊन त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाळ अडसुळ वय ५१ वर्षे असे यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक पणे शव जाळणे ही आता जिकरीचे बनले आहे असे या घटने वरून वाटू लागले आहे.

शनिवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास डोंबिवलीच्या पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शव (मृतदेह) आणण्यात आले होते. त्याच्यावर गॅस शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गॅसशवदहिनीचे बटन आणि लायटर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तेथील कर्मचारी कापडाचा पेटता बोळा आतमध्ये टाकून शवदाहीनी चालू करत होते. जे की केवळ त्यांच्याच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींसाठीही अत्यंत धोकादायक बाब होती. मात्र हा धोका पत्करून गोपाळ अडसूळ यांनी स्मशानभूमीत दाखल शवावर अंत्यसंस्कारासाठी कापडाचा पेटता बोळा आत टाकला आणि त्याक्षणी गॅसचा मोठा भडका उडून त्यामध्ये अडसूळ गंभीररित्या भाजले.


दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर स्मशानभूमीतील इतर कर्मचारी आणि काही नागरिकांनी अडसूळ यांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण तिथल्या उपस्थित स्टाफकडून देण्यात आल्याने त्यांना कळवा रुग्णालयात नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र ह्या कर्मचाऱ्याची खरी होरपळ ही रुग्णालयात झाली. या रुग्णालयात अडसूळ यांना उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. दुसऱ्या रुग्णाला देण्यासाठी साधे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोप वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे या घटनेतुन समोर आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिन्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे १० दिवसांपासून या गॅस शवदाहिनीत तांत्रिक बिघाड असूनही तो दुरुस्त का केला गेला नाही? याबाबत केडीएमसीच्या संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती का? माहिती देण्यात आली असेल तर मग हा तांत्रिक बिघाड दुरुस्त का केला गेला नाही? यांसारखे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी या गंभीर विषयात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा अशा प्रकरणात स्मशानभूमीत अनेक नागरिकांचा राबता असतो. काही मोठी भीषण दुर्घटना झाली असती तर मनुष्यहानी ही झाली असती यात कुठलेही दुमत नाही.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये नाना पटोले यांची जनजागरण पदयात्रा; यात्रेत काँग्रेस सेवादलाची पक्षाच्या जिल्हाध्यक्षांविरोधात घोषणाबाजी

कल्याण : शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जनजागरण पदयात्रा सुरू असताना या पदयात्रेत काँग्रेस सेवादलाने बहिष्कार टाकून पदयात्रेतुन घोषणाबाजी देत बाहेर पडले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा आज कल्याणमध्ये आली होती. मात्र, या यात्रेत मानापमान नाट्य रंगलं. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात कल्याणमध्ये जनजागरण पदयात्रा आली होती. मात्र, सेवा दलाने या पदयात्रेवर बहिष्कार टाकला आहे. रॅलीत प्रोटोकॉल पाळला जात नाही. केवळ दादागिरी सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नाना पटोले यांनी या घटनेची दखल घेतली आहे. हा प्रकार माझ्यासमोर तर झाला नाही. असा काही प्रकार झाला असेल तर तपास करून योग्य ती कारवाई करू असं पटोले यांनी सांगितलं.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पश्चिम उंबर्डे गावात रिक्षा चालकाची हत्या; अनुचित प्रकारातुन हत्या झाल्याचा संशय

कल्याण :- शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी पहाटे अज्ञात व्यक्ती कडून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नक्की कोणत्या कारणाने निर्घृणपणे हत्या केली ? हे समजू शकलेले नाही. खडकपाडा पोलिसां समोर या खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही हत्या काही अनुचित प्रकारातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून तशी परिसरात चर्चा सुरु असल्याचे समोर येत आहे.

उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान दत्तू भंडारी वय ५३ वर्षे यांची सकाळी उंबर्डे या ठिकाणी हत्या करण्यात आली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या सुमारास आपल्या कामासाठी घराबाहेर रिक्षा घेऊन जात असावेत. त्यामुळे नक्की काय कारण असेल याचे तर्कविर्तक लढविले जात आहेत. काही अनुचित प्रकारातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात केली जात आहे.

सर्व प्रकारचा मागोवा आणि या प्रकरणाची अधिक माहिती सूत्रांकडून पोलिस घेत आहेत. लवकरच हत्येतील आरोपी आणि हत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. दरम्यान खडक पाडा पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३४ अन्वेय गुन्हा नोंदवला आहे.

-रोशन उबाळे

कल्याण पूर्वेत सलमान खान कार अपघाताची झाली असती पुनरावृत्ती; थोडक्यात बचावल्या फूटपाथवर झोपलेल्या महिला

कल्याण :- पूर्वेतील पुणे लिंक रोड तिसगाव नाक्या जवळ शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास विचित्र अपघात झाला. एका वाहन चालकाने आपली लक्झरिअस कार डिव्हायडरला ठोकली. यामुळे ती गाडी तेथील जवळच्याच एका झाडाला अडकून थांबली. याच रस्त्याच्या फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांचा बळी जाण्यापासून वाचला. सुदैवाने कार ड्रायव्हर आणि त्याचा मुलगा त्याचसोबत फुटपाथवरील दोन महिला बचावल्या.

अपघातग्रस्त कार जर फूटपाथ वर गेली असती तर फुटपाथवर झोपलेले नक्कीच चिरडले गेले असते. मात्र सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने या विचित्र अपघातात होणारी मोठी दुर्घटना टळली. लक्झरिअस कार जणू काही पार्किंगच्या स्लॉटमध्ये उभी आहे असं भासत आहे. मात्र वास्तवात काय घडलं हे तेथील प्रथम दर्शनीनी सांगितले.

या सर्व घटनेने सलमान खानच्या कार अपघाताची पुनरावृत्ती कल्याणमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झाली असती असं म्हणायला हरकत नाही. एअर बॅग मुळे गाडीतील प्रवासी बचावले तर गाडी फुटपाथवर जाण्या पूर्वी थांबल्याने गरीब महिलांचे देखील प्राण वाचले. याबद्दल त्या महिलांनी देवाचे आभार मानले.

-संतोष दिवाडकर