लालचौकी येथील सिग्नलचा खांबाआड लपंडाव; मनसेने चिटकवले खांबाला स्टिकर

कल्याण : लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्यांवर स्टिकर लावून आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या दिखाव्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मधून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत २० ठिकाणी सिग्नल ची संख्या निश्चित करण्यात  आली. या मधील लालचौकी चौकात काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब असल्याने  दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसतच नाही. यामुळे दुचाकीवर मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

एखाद्या वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. तर अनेकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सिग्नल योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्या साठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपकवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून महानगरपालिकेची पैशाची उधळपट्टी होत असल्याने हे नियोजन शून्य पद्धतीने प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या द्वारली पाड्यातील घरात शिरलं अजगर

कल्याण : जंगल शेती भागातून भक्ष्याच्या शोधात भलामोठा अजगर घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. अजगर घरात घुसल्याचे पाहून त्या कुटूंबाची एकच पळापळ झाली होती. मात्र, सर्पमित्राच्या मदतीने त्या भल्यामोठ्या अजगराला शिताफीने पकडले. ही घटना कल्याण – मलंगगड रोडवरील द्वारली पाडा परिसरात असलेल्या एका घरात घडली आहे.

बाबासाहेब गोरे यांची कल्याण – मलंग रोडवरील द्वारली पाडा या ठिकाणी वीटभट्टी आहे. त्या लगतच त्यांचे घर आहे. त्यातच दुपारच्या सुमारास या घरामध्ये मोठा अजगर घुसल्याचे त्यांनी पहिले. त्यामुळे त्यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोबे यांना अजगरविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी कल्याण पूर्वेत राहणारे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्यासह मुंबई हायकोर्टमधील कुलदीप चिकनकर मानद पशु कल्याण अधिकारी, यांना माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गोरे यांच्या घरामध्ये आठ फूट लांबीचा अजगर घराच्या एका कोपऱयात आडोशाला दडून बसल्याचे त्यांना दिसला होता.

विशेष म्हणजे, हा भलामोठा अजगर भक्ष्य शोधण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोरे यांच्या घराच्या आसपास त्यांना दिसत होता. मात्र, घराच्या बाजूलाच असलेल्या वनसदृश क्षेत्रांमध्ये निघून जात होता. पोलीस कर्मचारी, सर्पमित्र जाधव व चिकनकर यांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून, या भल्यामोठ्या अजगराला वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थित निर्सगाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले.

-कुणाल म्हात्रे

विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचार्यांची संपात उडी

विठ्ठलवाडी :- महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी एसटी कामगारांकडून सध्या संप पुकारला गेला आहे. या संपात आता विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचारी देखील उतरले आहेत. दरम्यान आज आगाराबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपाची घोषणा करीत निदर्शने केली.

एसटी म्हणजेच महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच एसटीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या हलाखीचे जीवन काढावे लागत आहे. अगदी कमी पैशात या कर्मचार्यांना राबवून घेत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी हाल अपेष्टा कर्मचारी सहन करीत आहेत. त्यात विलीनीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने शासना विरोधात कामगारांनी महाराष्ट्रभरात संप पुकारला आहे.

रविवार दि. ७ नोव्हेंबर पासून विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील या संपात उडी घेतली आहे. कर्मचाऱ्यांकडून एसटी आगाराबाहेर निदर्शने करण्यात आली. आमचा कोणत्याही युनियन, संघटना तसेच समितीवर विश्वास राहिलेला नसून आता आमचा लढा फक्त आमच्यासाठी असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी बोलून दाखवल्या. मागण्या पूर्ण करा अन्यथा संप सुरू ठेवू असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर

मांडा-टिटवाळ्यातील ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण :  महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात मांडा-टिटवाळा येथील ३१ जणांविरुद्ध ८ लाख ४ हजार ४८० रुपयांची ५९ हजार ८५५ युनिट वीज चोरल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकांच्या तपासणी मोहिमेत ८ ऑक्टोबरला ही वीजचोरी उघडकीस आली होती.

दिनेश धर्मा घायवत, शितल विश्वनाथ गांगुर्डे, मोहम्मद याकूब वायलाल, भारती ज्ञानू वरपे, तरुना गौतम प्रधान, विजयदत्त किसन गवळे, नरेश नंदकुमार अमुकर, पदमावती दशरथ पगारे, बळीराम वामन चौधरी, खातुन शहाजान खान, परशुराम यशवंत कुचीकुरे, लक्ष्मण हरी पारधी, आयशा खातून मोहम्मद, के के भोईर, संदिप संभाजी मालेकर, छोटेलाल पी गुप्ता, गणेश अनिल काशिवले, विकास अनिल काशिवले, कोंडु भिल्या काशिवले, स्वप्निल नटूराम मेंढे, विष्णु मोहन धिंडके, प्रकाश जाधव, शितल शांताराम दळवी, निशिगंधा  निलेश ताम्हणकर, महिपालभाई पी गांधी, रोहिणी सचिन पगारे, सुमित्रा लक्ष्मीराम, अन्सारी झरीना, बाळु गोविंद गायकर, एम .एस. ओमकार, मयुर विनोद तिवारी (सर्व राहणार मांडा व टिटवाळा परिसर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधितांकडून मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले होते. सहायक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात संबंधित ३१ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५  नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

२७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मिळणार मुबलक पाणी; पालिका आयुक्तांचे आश्वासन

कल्याण : २७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वसन पालिका आयुक्तांनी भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच २७ गावातील सन २००२ पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर देखील कमी करण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आज मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आज भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी बोलावत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी चंद्रकांत मोटे यांच्यासह मोहन काळन, रवींद्र भंडारी, प्रकाश पाटील आणि गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला होता. त्यानुसार आज मोर्चाची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट घडवून आणली. यावेळी आयुक्तांनी २७ गावातील नागरिकांना अमृत योजनेच्या माध्य्मानातून डिसेंबर पर्यंत मुबलक पाणी मिळणार असून ज्यांची घरे सन २००२ पर्यंतची आहेत त्यांनी आपल्या मालमत्ता कारच्या पावतीसह अर्ज केल्यास त्यांचा मालमत्ता कर कमी केला जाईल असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती चंद्रकांत मोटे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

लेखी आश्वासनानंतरही रस्ता न बनविल्याने म्हारळ येथील स्थानिकांनी पुकारले आमरण उपोषण

कल्याण : लेखी आश्वासनानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता न बनविल्याने स्थानिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हारळगाव थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम कांबा पावशे पाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिकांनी २९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय उपोषण करत आंदोलन केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता २० ऑक्टोंबर पर्यंत बनविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी आश्वासन देऊन देखील रस्त्याचे काम सुरु न झाल्याने येथील स्थानिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे.   

कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळ ते ताबोर आश्रम पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी रोज अपघात होत असतात, स्थानिकानी सतत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तरीही कोणती ही कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव, महेश देशमुख, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, विशाल मोहपे, योगेश देशमुख, लक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफ़ाक शेख, प्रवीण नागरे, दत्तू सांगळे, दिलीप भोईर, जगन्नाथ शेट्टी, रमेश गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वी आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी २० ऑक्टोंबर पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वसन दिले होते.  

      मात्र अद्यापही या रस्त्याचे काम सुरु न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून धुळीचे देखील साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत देखील वाढले आहे. त्यामुळे आता रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरु ठेवणार असून लेखी आश्वसनाची पूर्तता न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी सांगितले.

     तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून कामासाठी ठेकेदार देखील नेमण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काम सुरु झाले नसून येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होईल असे त्यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

दिवाळी तोंडावर आणि KDMT कामगारांना पगार नाही; मनसेचा प्रशासनाला दोन दिवसांचा अलटीमेटम

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. एकीकडे दिवाळीचा सण समोर असताना, कामगारांना पगार मिळत नसल्याने कामगार त्रस्त झाले आहेत. याविषयी मनसेने केडीएमसी परिवहन विभागाचे व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. येत्या  दोन दिवसात कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळाला नाही, तर मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागात बसेसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ५० कामगार नियुक्त केले आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून हे कंत्राट ‘जय भवानी’ या संस्थेला देण्यात आले आहे. या कंत्राटी कामगारांना परिवहन आगारामध्ये सोयी सुविधा देखील मिळत नाही अशी ओरड आहे. त्यांना चेंजिंग रूम नसून काम करतांना काही लागल्यास अथवा एखादा अपघात झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी प्रथमोपचार सुविधा देखील नाही. यामुळे जीव मुठीत धरून हे कामगार काम करत आहेत. असे असतांना देखील या कामगारांच्या ठेकेदाराने या कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. यामुळे ऐन दिवाळीच्या सणावर त्यांच्यावर संक्रात कोसळली आहे.

हि बाब मनसे शहर संघटक भोईर यांना समजताच त्यांनी परिवहनचे मुख्य कार्यालय गाठत परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांना याबाबत जाब विचारला. यामध्ये ठेकेदाराला कामगारांचा थकीत पगार त्वरित देत एक महिन्याचा पगार अग्रिम देण्याची मागणी केली. तसेच कामगारांना वेठीस धरणाऱ्या या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.   

याप्रकरणी परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत म्हणाले की, कामगारांना त्यांचे पगार देण्याची जवाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराचे बिल पालिका अदा करणार असून कामगारांना दिवाळीपूर्वी त्यांचे पगार दिले जातील असे आश्वासन दीपक सावंत यांनी दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

२७ गावातील पाणीप्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ‘भूमिपुत्र पार्टी’चा इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे २७ गावांमध्ये इतर सोयी सुविधा पुरविण्यास पालिका असमर्थ ठरत असल्याने अवास्तव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी देखील आयुक्तांकडे करण्यात आल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास बुधवारी याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून एकाची तलवारीने गळा चिरून हत्या

डोंबिवली :- ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा मच्छी विक्रेत्या महिलेला तिच्या व्यवसायात मदत करणाऱ्या सहकाऱ्या सोबत तिच्या दिराने वाद घातला. आणि रागाच्या भरात त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र या वादात स्व:ताचाच जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय ही वर्तविण्यात येत आहे.

भानुदास चौधरी हे मासळी विकन्याचा व्यवसाय करतात. तसेच त्यांची वहिनी ही मासळी विकण्याचा व्यवसाय करीत असे. मात्र हितेश उर्फ काळ्या नकवाल हा फक्त भानुदास चौधरी यांच्या वाहिनीस व्यवसायात मदत करीत असे. आणि हा राग मनात ठेवून अनेक वेळा दोघांमध्ये भांडणही व्हायची. यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार झाला. दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. भानुदास ने हितेश यास शेतावर बोलावले. भानुदास ने माझ्याकडे तलवार आहे असे त्यांना धमकावले. मात्र हितेश काल्याने तीच तलवार घेऊन भानुदास यांचा गळा चिरला. त्यात ते जखमी होऊन मरण पावले. सदर तक्रार त्यांच्या पुतण्याने टिळक नगर पोलिसात केली आहे.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय अफाले यांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून हत्येतील आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. यावर अधिक तपास केला जात असून विविध बाजूने हत्येच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलीसां कडून सांगण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

टिटवाळ्यात आढळला मांडूळ जातीचा दुर्मिळ साप

टिटवाळा :  मांडा टिटवाळ्याच्या पश्चिम भागांत असणाऱ्या माऊली कृपा सोसायटीत मांडूळ जातीचा दुर्मिळ साप आढळून आल्याने त्याला पाहण्यासाठी परिसरात एकच गर्दी उसळली होती. या  सापाला देश विदेशात प्रचंड मागणी आहे. या सापाची कोट्यवधी रुपयांना बेकायदेशीरपणे तस्करी केली जाते. या सापामुळे अनेक दुर्धर आजार बरे होतात असा समाज आहे. तसेच मंत्र तंत्राचा वापर करून पैशांचा पाऊस या सापाच्या आधारे पाडता येतो अशी देखील  अंधश्रद्धा समाजात आहे.

अनेकदा अंधश्रद्धेतून या मुक्या प्राण्याचा हकनाक बळी दिला जातो. मात्र, याच दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाचे वॉर या प्राणी मित्र संस्थेचे सदस्य  सर्पमित्र निखील कांबळे यांनी प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले आहे. 

मांडा टिटवाळ्याच्या पश्चिम भागांतील माऊली कृपा सोसायटीत स्थानिक नागरिकांकडून साप आढळून आल्याची माहिती मिळताच सर्पमित्र यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि सापाला सुरक्षितपणे हाताळून ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना या सापाविषयी माहिती देत त्या विषयी समाजात चुकीच्या पसरवण्यात आलेल्या अंधश्रद्धा याबाबत माहिती दिली व वनविभागाच्या ताब्यात या सापाला  दिले.

-कुणाल म्हात्रे