कल्याण रामबाग जोशीबाग परिसरात साप आणि घोरपडीचा सुळसुळाट

कल्याण :- मागील काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील रामबाग व जोशीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात साप व घोरपड आढळून येत आहेत. याच भागात मच्छी मार्केट आणि पोलीस वसाहतीच्या पडीक खोल्या असल्याने यांचा वावर असावा असा तर्क लावला जात आहे. नेहमीच साप आणि घोरपड दृष्टी क्षेपात येते असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील आठवड्यात या परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र सतीश बोबडे यांनी घोरपड पकडल्या असून एक घोरपड चार फुटाची दुसरी घोरपड दीड फुटाची आहे. परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घोरपड शिरल्याची माहिती सतीश बोबडे यांना मिळताच त्यांनी दोन्ही घोरपडी पकडून वन विभाग अधिकारी यांच्या स्वाधीन केले आहे.

सर्पमित्र सतीश बोबडे यांच्या माहितीनुसार स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस लाईन मध्ये लोकवस्ती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून यामध्ये सरपटणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची वाढ झाली आहे. तेथूनच हे घोरपड व साप लोकवस्तीमध्ये येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नेहमीच या भागात स्वच्छता आणि औषध फवारणी केल्यास वन्यजीव प्राण्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.

-रोशन उबाळे

‘वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोठ्या गृहप्रकल्पांच्या ठिकाणी अंडरपास अथवा उड्डाणपूल पुल उभारा’; मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : मेगा टाऊनशिपला परवानगी देताना भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीकोनातून संबंधित विकासकाला प्रकल्प ठिकाणी अंडरपास अथवा उड्डाणपूल करणे बंधनकारक करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

  राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु असून कल्याण ग्रामीण मतदारसंघातही लोढा पलावा, रुणवाल मायसिटी, रुणवाल गार्डन, अनंतम् रिजन्सी सारखे मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु आहेत. त्यातील काही प्रकल्प कार्यरत झाले आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील लोकवस्ती भरमसाठ वाढली आहे.तसेच हे सर्व प्रकल्प रेल्वे लोकल सेवेपासून लांब असल्यामुळे यामध्ये राहणारे बहुतांश रहिवासी नोकरी-व्यवसायानिमित्त रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना जोडणाऱ्या कल्याण-शिळ व काटई-बदलापूर-तळोजा रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी असते त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून तसे पत्रही दिले आहे.

सध्या लोढा पलावा, कासा रिओ, रुणवाल गार्डन, रुणवाल मायसिटी, अनंतम् रिजन्सी हे सर्व मेगा टाऊनशिप प्रकल्प कल्याण-शिळ रस्त्याला जोडण्यात आले आहेत. तर लोढा लेकशोर प्रकल्प काटई-बदलापूर रस्त्याला जोडण्यात आला आहे. ज्या प्रकल्पांमध्ये प्रवेश करण्यासाठी बायपासही उपलब्ध नाही. आधीच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अबरनाथ, उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्याशिवाय पर्याय नसून या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचा आहे, त्यातच आता अधिक भर पडत आहे.

अशा मेगा टाऊनशिपला परवानगी देताना परिसरात वाढणारी लोकवस्ती गृहीत धरुन प्रकल्पाच्या ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास करणेबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. तसे न केल्याने आज मुख्य रस्त्यावर वाहतुककोंडी होताना दिसते. प्रकल्प कार्यरत होऊन १०-१० वर्षे झाली तरी उड्डाणपूल किंवा अंडरपास मंजूर होत नाही व मंजूर झाल्यास निधी अभावी पूर्ण होण्यास पुढील १० वर्षाचा काळ लागतो. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना सततच्या वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो आहे, तोपर्यंत विकासक प्रकल्प पूर्ण करुन निघून गेलेले असतात. तरी या महत्त्वाच्या विषयावाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा कारण हा प्रश्न केवळ कल्याण ग्रामीण मतदार संघापुरता मर्यादित नाही.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील विविध शहरांमध्ये असे प्रकल्प सुरु आहेत आणि सगळीकडे अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत व भविष्यात होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांसह स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तरी याबाबत तातडीने निर्णय घेतला पाहिजे व मेगा टाऊनशिपसाठी परवानगी देताना वाहतुक कोंडीच्या दृष्टीकोनातून विकासकाला प्रकल्प ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास बंधनकारक करावा व त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विकासकांना सदर प्रकल्पामध्ये द्यावा असे आमदार यांचे म्हणणे असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीतर्फे १८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन लसीकरण

कल्याण : सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केल्या नुसार “युवा स्वास्थ कोविड-१९  च्या लसीकरण मोहिमेचे नियोजन” कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फतही करण्यात येत असून आता महापालिका क्षेत्रातील १८  वर्षावरील महाविदयालयीन विदयार्थी/ विदयार्थींनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच लसीकरण आता प्रत्यक्ष महाविदयालयात जावून केले जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातून तेथील विदयार्थी व इतर कर्मचारी वर्गाची यादी प्राप्त करुन त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत त्यांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे.

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकुण ८ लाख ९८ हजार ९० नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली असून एकुण ४ लाख ४९ हजार ४६ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली असून आतापर्यंत १३ लाख ४७ हजार १३६ इतके लसीकरण महापालिका क्षेत्रात झाले आहे. लसीकरणास अधिकाधिक चालना देण्यासाठी भारतातील शंभर कोटी लसीकरण टप्पा पूर्णत्वाचे औचित्य साधून महापालिकेच्या महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या शंभराव्या लाभार्थ्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रावर १००  करोड लसीकरण उत्सवाचा टप्पा संपन्न करण्यात आला.

कोविड लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. तसेच लसीकरण केल्याने संबंधीत व्यक्तीस संसर्गाचा धोका कमी असतो आणि त्यास कोविड झाल्यास त्याचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात राहतो. तसेच कोविड लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. महापालिकेत आता मुबलक प्रमाणात लस साठा शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद दिल्यास महापालिका क्षेत्रातील कोविडचा संसर्ग कमी होण्यास तसेच येणा-या तिस-या लाटेला थोपविण्यास मदत होऊ शकेल.

 तरी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरा नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले कोविड लसीकरण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात किंवा घराशेजारी आजारी, वृध्द नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित राहिले असल्यास त्याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राकडे कळवावी म्हणजेच या नागरिकांच्या घरी जावून त्यांचे लसीकरण महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत केले जाईल.

-कुणाल म्हात्रे

कल्याण- मुरबाड रेल्वेचे काम लवकर सुरू व्हावे या साठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध – प्रमोद हिंदु राव

कल्याण :- ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांचा  “राष्ट्रवादी परिवार, ” संवाद २३ ते २५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कल्याणातील खडक पाडा येथे दिली. केंद्र व राज्य सरकार कडे लवकरच  कल्याण – मुरबाड  रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागणी लावून धरणार असून जिल्ह्यातील आरोग्य आणि रोजगारासाठी एमआयडीसी स्थापन करावी यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करणार आहेत.

 ठाणे जिल्ह्यात  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या २३ ते २५ ऑक्टोबर रोजी  “राष्ट्रवादी परिवार सवांद दौरा आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकारांना माहिती दिली. केंद्र सरकारने प्रथम राज्यातील राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती चे काम लवकर घ्यावे. केवळ इतके हजार कोटी निधी मंजूर केला याची टिमकी वाजू नये अशी टीका करीत केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समाचार घेत लवकर कृतिशील कामे करण्याची वजा विनंती करीत वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे कार्यकते आणि नागरिक यांच्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा चे आयोजन केले आहे. त्याच बरोबर कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गच्या कामाला सुरुवात करावी तसेच शहापूर मुरबाड कल्याण भागात एमआयडीसी   बांधणी करावी.

क्लस्टर योजना ठाणे शहरापूर्ती न ठेवता कल्याण डोंबिवली, उल्हासनगर , अंबरनाथ ,मुरबाड या भागात ही कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले. ३५ सेक्शन  शेतकऱ्यांचे शोषण होते यासाठी वन विभागाने हा कायदा रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे  मागणी केली जाणार आहे. कल्याण तालुक्यात मेडिकल्स कॉलेज  व्हावे यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे सांगत सरकार कडे मागणी केली जाणार आहे.

आगामी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याप्रमाणे युती ही होऊ शकते. असे बोलत आम्ही १२२ उमेदवारांची तयारी केली आहे असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी ,वंचित समूह , शेतकरी , राष्ट्रवादी पक्षाला मानणारा वर्ग जोडणार असल्याची ही माहिती  प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रमोद हिंदुराव यांची माहिती

-रोशन उबाळे

केडीएमसी निवडणूक होणार पॅनल पद्धतीने; मतदाता करणार तिघांना मतदान

कल्याण :- पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही ३ सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. यामुळे पॅनल पद्धतीने १२२ उमेदवार असले तरी ३ सदस्य प्रमाणे ४१ प्रभाग असणार आहे. ह्या मध्ये ५० टक्के म्हणजेच ६१ जागा महिलांसाठी आरक्षण असणार आहे. प्रत्येक नागरिकाला ३ जणांना मतदान करावं लागणार आहे. जवळपास एका पॅनल मध्ये ३७,५०० मतदार असणार आहेत.

२०११ च्या जनगणने नुसार कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या १५ लाख आहे. यातील मतदारानी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, त्यांचा पता बरोबर आहे की नाही, वारंवार आवाहन केल्यानंतर लोकापर्यंत महापालिकेच्या निवडणुकी संदर्भातील फेरबदल माहिती ही पोहचावी याकरिता महापालिका सर्वोतोपरी मेहनत घेत असते. असे मत केडीएमसी महापालिका सचिव संजय जाधव यांनी निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन यांच्या अंतर्गत असलेल्या वार्तालाप कार्यक्रमात केले.

मागील महानगरपालिका निवडणूकित २०१५ साली प्रभाग संख्या १२२ पर्यंत वाढवण्यात आली होती. याही वेळेस १२२ जागा असणार आहेत. मात्र पेनल पद्धत असल्याने ४२ प्रभाग करण्यात येत आहेत. तर प्रत्येक प्रभागात तीन जागा असणार आहेत. मात्र २ प्रभाग असे आहेत की ज्यात प्रत्येकी २-२ जागा देण्यात आलेल्या आहेत. पेनल पद्धत आल्याने राजकीय पक्षांना देखील आता त्या पद्धतीने राजकिय समीकरण जुळवण्याची तयारी करावी लागणार आहे.

-संतोष दिवाडकर

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून मोदींना महागाईचा चषक भेट

कल्याण : इंधनदरवाढीबाबत वारंवार निवेदने देऊन देखील केंद्र सरकारला कोणताही फरक पडत नसल्याने अखेर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना महागाईचा चषक भेट दिला आहे. महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आक्रमक झाली असून कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, प्रकाश तरे, संदीप देसाई, योगेश माळी, श्याम आवारे, प्रशांत नगरकर आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.    

       वाढती महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई कमी होण्याऐवजी पेट्रोल, डीझेल, गॅस सिलेंडर यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी शंभरी पार केली असून घरगुती गॅस सिलेंडर देखील एक हजारच्या घरात पोहोचले आहे. या सर्वामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे चांगलेच मोडले असून वाढत्या महागाईत घर कसे चालवावे हा प्रश्न गृहिणींना पडला आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद असून कोरोना आणि महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

       या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून कल्याणमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड येथून तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालया बाहेर ठिय्या मांडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी तहसीलदारांना महागाईचा चषक देण्यात आला.    

दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमतींबाबत केंद्र सरकारला वारंवार निवेदने देऊन देखील फरक पडत नसल्याने आणि याची दखल घेतली जात नसल्याने तहसीलदारांमार्फत मोदींना महागाईचा चषक भेट म्हणून देण्यात आला आहे. हे सरकार लोकशाही सरकार नसून हुकुमशाह सरकार असल्याने इंधन दरवाढ केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत त्यांना चिरडण्याचं काम सरकार करत आहे. जोपर्यंत महागाई कमी होऊन जनतेला दिलासा मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या काळा तलावात तरंगला वृद्ध महिलेचा मृतदेह

कल्याण : पश्चिमेकडील काळा तलाव येथे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या महिलेचे वय अंदाचे ६५  वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

कल्याणच्या काळा तलावा आसपास तशी बऱ्यापैकी वर्दळ असते. मात्र रात्रीच्या सुमारास काही वेळेस या ठिकाणी शुकशुकाट असतो. आता तलावात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ मजली आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून ही महिला कोण आहे? ती काळा तलाव परिसरात कशी आली? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात हे लवकरच उघड होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

शहापूर येथे आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्थे मार्फत सभासद कौटुंबिक मेळावा संपन्न

शहापूर :- आधार फाउंडेशन हे बेरोजगार, बचतगट, शेतकरी, कलाकार, सेवानिवृत्त, विध्यार्थी, पारमार्थिक या सर्वांसाठी कार्यरत असलेली एक सामाजिक सेवाभावी संस्था आहे. आता पर्यंत गोर गरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्परतेने कार्य करत आहे.

मंगळवारी श्री संगम येथे पार पडलेल्या मेळाव्यात श्रमदान कर्मसिद्ध व्याख्यान परस्परसंवादाने कार्यक्रमाची सुरवात झाली. संगमेश्वर चे मठाधीपती गोपीनाथ महाराज, प्रति पंढरपूर धणीवली येथील कमळनाथ महाराज, मुरबाड पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ तसेच धनाजी गायकर, नाथाजी शिंदे, आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष कैलास कोर, राणे सर, संजय घुडे, पद्माकर कोर आदी मान्यवर उपस्तीत होते.

-संदेश दाभणे

कल्याणच्या छम छम मध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांचा धिंगाणा; महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण :- पश्चिमेतील ताल बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह कल्याण डोंबिवली मनपाचे भाजपा माजी उपमहापौर यांच्या भावासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण सत्र न्यायालयाने आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. मंगलसिंह भंवरसिंह चौहान, हरीश्याम सिंह, रिकिन गज्जर, पोलीस कर्मचारी उत्तम घोड़े, विक्रांत बेलेकर आणि  शेखर सरनोबत आरोपींची अशी नावे आहेत .सर्व आरोपी आंबिवली, मोहने, यादवनगर, टिटवाला और हीराबाग-शनिवार पाटीलनगर  मधील रहिवाशी आहेत 

दरम्यान या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असून चाळ माफियाकडून हफ्ते वसुली करत आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि याच चाळ माफिया सोबत हा पोलिस कर्मचारी पार्टी करायला आला होता. हॉटेल मालकाला शेरकी मिरवण्याच्या नादात सर्वत्र स्वतःची बदनामी करून घेतली आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी लाखो रुपयांची वीजचोरी; सुयोग टेलेमॅटिक्स विरोधात गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट) इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यात टॉवरसाठी ८ लाख १९ हजार रुपये किंमतीची ५६ हजार १५० युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. याठिकणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. सुयोग टेलेमॅटिक्सने एअरटेल मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची ४० मीटर केबल वापरून फिडर पिलरमधून थेट व अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाले.

१८ मे पासून वीज चोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीज चोरीचे देयक व दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध वीजचोरी गुन्हा दाखल केला आहे.

-कुणाल म्हात्रे