क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी क.डों.म.पा.चं अभिवादन; १० विद्यार्थिनींना हॅपीनेस किट्सचे वाटप

कल्याण : आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, पल्लवी भागवत, अर्चना दिवे, विनय कुलकर्णी, अनंत कदम, वैदयकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जयंती दिन हा सर्वत्र “बालिका दिन” म्हणूनही साजरा केला जात असल्याने, त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महापालिकेच्या शाळांमधील १०  विद्यार्थिनींना (बालिकांना)  महापालिका शिक्षण मंडळ व अक्षयपात्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा अंतर्भाव असलेल्या हॅपीनेस किट्सचे वाटप महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,इतर अधिकारी वर्ग व शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याहस्ते करण्यात आले.

महापालिकेच्या घनकचरा विभाग मार्फत दि. ३ ते ९ जानेवारी हा सप्ताह प्लास्टिक निर्मूलन म्हणून साजरा केला जात असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे यावेळी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.

त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील पालिकेच्या जे प्रभाग कार्यालयात; अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या तमाम महिला वर्गाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणा-या अन चूल-मूल या संकल्पनेत अडकलेल्या महिलांना प्रवाहात आणणा-या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस उपायुक्त रामदास कोकरे  यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच प्लास्टिक निर्मूलनची शपथ सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, प्रमाग क्षेत्रातील आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने शपथ घेतली. यात प्रभागातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

-कुणाल म्हात्रे

मोहने आंबिवली रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडेदर सर्वेक्षण विनाविलंब करण्याची मागणी

आंबिवली:  मोहने आंबिवली शहरातील रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर सर्वेक्षण विनाविलबं करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर आणि मोहने आबिवंली विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिका, आरटीओ, वाहतुक पोलिस पोलिस प्रशासन यांचे मोहने आंबिवली विभागातील वाहतुक व्यवस्था याबाबत दुर्लक्ष होत आहे. मोहने आंबिवली हा परीसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे.  मोहने आंबिवली शहराचे झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण झालेले आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली आहे. हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असुनही मोहने आंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ही बाब खेदजनक आहे.

आंबिवली मोहने शहरात वाहतुक व्यवस्था नियोजन या करिता आजगायत वाहतुक नियमन व उपाययोजना केल्या नाहीत. कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर निश्चिती सर्वेक्षण करण्यात आले पंरतु मोहने आंबिवली शहरातील प्रवासी व रिक्षा आवश्यकता व प्रवाशी व रिक्षांची अमाप संख्या जास्त असुनही रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा सर्वेक्षण शहराअतंर्गत केले नाही ही बाब आश्चर्यजनक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणा बाबत खुलासा व अवगत करुन विनाविलंब शहराअतंर्गत रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा रुट भाडेदर निश्चित सर्वेक्षण करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

३ जानेवारी पासून क.डों.म.पा. करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

कल्याण :- दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेमार्फत केले जाणार आहे. यासाठी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबर द्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबर द्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा सध्या सुरू करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधा सुद्धा मुलांसाठी उपलब्ध आहे. यावेळी येताना लाभार्थ्यांनी स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगावा. पालिकेने नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या हद्दीत असणारे लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत.

१. रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम

२. शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम

३. सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व

४. शक्तीधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व

५. आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम

६. मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, यादव नगर रोड, आंबिवली

या लसीकरण केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) उपलब्ध राहणार आहे. लसीकरणास येताना जन्मदाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड जवळ बाळगणे अनिवार्य राहील. महापालिकेच्या लसीकरण केंद्र व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) तेथील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

-रोशन उबाळे