‘भारत सेवा रत्न गोल्ड मेडल २०२२’ पुरस्काराने शिक्षिका ललिता मोरे सन्मानित

कल्याण : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन उडीसा राज्य तर्फे आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मनिलाल शिंपी (ब्रँड अँबेसिडर डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र) यांच्या वतीने गणेश विद्या मंदिर शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांना “भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड 2021” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कारसमयी आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठक्कर, संध्या माध्यमिक विद्यालयाचे अरविंद देवरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका छाया शिंपी,  ज्येष्ठ शिक्षिका स्मिता सोंजे, रंजना पाटील, रिता मिस्त्री या ज्येष्ठ शिक्षकांच्या व इतर शिक्षक सहकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत छाया शिंपी यांनी ललिता मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. पुरस्काराचे मानपत्र  आरएसपी कमांडर मणीलाल शिंपी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

दुचाकी वरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना सी.सी.टी.व्ही.च्या सहाय्याने केली अटक; डोंबिवली मानपाडा पोलिसांची कामगिरी

डोंबिवली : दुचाकी वरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलीसांनी सी.सी.टी.व्ही.च्या आधारे पाठलाग करून अटक केले आहे. कल्याण तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रात चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे घडल्याने, सर्वसामान्य जनतेमध्ये त्यात विशेषतः महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. अशाच प्रकारच्या अनेक चैन स्नचिंग डोबिंवली शहरामध्ये झाल्यामुळे पोलीस विभागास गुन्हे उघडकीस आणणे व आरोपींना अटक करण्याचे एक मोठे आव्हानच आरोपींनी दिले होते.

चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी विविध पोलीस पथके तयार केली होती. या पथकांनी ज्या भागातुन चैन स्नैचिंग झाली आहे. त्या भागातील ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी मानपाडा पोलीसांनी केली. चैन स्नॅचिंगचे  गुन्हे उघडकीस आणणेसाठी मानपाडा पोलीसांकडून अहोरात्र सर्वोतोपरी प्रयत्न चालु होते. मानपाडा पोलीस डोबिंवली शहरामधील  सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीचा पाठलाग करत असताना चैन स्नैचिंग करणारे दोन इसम  विकेश रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारतसिंग ठाकुर दोन्ही रा. दावडीगांव, डोंबिवली पुर्व यांना पकडुन त्यांच्याकडे चौकशी केली असता लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांनी एका बाइकवर वेगवेगळ्या ठिकाणी चैन स्नैचिंग करुन ते दागिने जबरीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींकडून ६ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० हजार किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल व २४०० रुपयांचे दोन मोबाईल असा एकुण ७ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात मानपाडा, टिळकनगर, डोंबिवली व विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीतील १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्यांचेकडे आणखी चौकशी सुरू असुन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे,  सपोनिरी. सुरेश डांबरे, अविनाश वनवे, पोहवा राजेंद्र कोळी, खिलारे, विजय, पोना महादेव पवार, यल्लपा पाटील, अनिल घुगे, प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, दिपक जाधव ,पोशि महेंद्र मंझा यांच्या पथकाने केले.

-कुणाल म्हात्रे

साकेत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ‘सायबर गुन्हे जनजागृती’चे धडे

कल्याण : कल्याण पूर्वेत साकेत महाविद्यालय व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेझिंग डे या सप्ताहानिमित्त “सायबर गुन्हे” या विषयावर जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर एम.कदम यांनी युवकांना एटीएमचा पासवर्ड कोणाला शेअर करू नये, अंतरजाल द्वारा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असा सल्ला दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले सांगितले की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण व खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबत स्टडी वेल्थ संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन खरेदी करताना कोणती फसवणूक आणि कशी केली जाते याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या बरोबर झालेल्या गुन्ह्यांबद्दल चर्चा करेल चर्चा केली. त्यावर विविध उपाय सांगण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये शाखेत ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी साकेत कुमार, सीईओ शोभा नायर, पोलीस निरीक्षक डोके, उपप्राचार्य नवनाथ मुळे, प्रिया नेरलेकर हे उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चौधरी व आभार प्रदर्शन प्रकाश जाधव सरांनी केले.

त्याचप्रमाणे आज सेंट पॉल कॉलेज, आशाळेपाडा याठिकाणी देखील सायबर जागरूकता दिवसाच्या अनुषंगाने सायबर अवेअरनेस या विषयावर वाख्यान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विध्यार्थ्यांना सायबर विषयी विविध समस्यांची, मुद्द्यांची माहिती देण्यात आली. या वाख्यान कार्यक्रमास पो. नि. धनंजय कापरे व स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीतील वाढीव कर मागे घेण्याची ‘जागरूक नागरिक’ची मागणी

कल्याण : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून त्या ठिकाणी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीची घोषणा सरकारने केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचीच सत्ता असून याठिकाणी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी न देता किमान जी २२ टक्के कर वाढ  केली आहे ती मागे घेण्याची मागणी जागरूक नागरिकच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. तसेच इतरही अनेक समस्या असून त्या ५ जानेवारी पर्यंत न सोडविल्यास १० जानेवारी पासून जागरूक नागरिकच्या वतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

जागरूक नागरिकने ५०० फुटापर्यंतच्या सदनिकांचा कर माफ करावाची मागणी कुठेही केलेली नाही. कल्याण-डोंबिवली च्या नागरिकांना जो २२ टक्के वाढीव कर भरावा लागत आहे तो माफ करावा अशी आपली मागणी आहे. मुळात विकासक आणि बिल्डर यांना त्यांच्या ओपन लँड टॅक्स मधून सवलत मिळावी म्हणून पालिका प्रशासनाने आधीच जमिनींचा रेडीरेकनरचा दर  ६४.३५ टक्के कमी केलेला आहे. हा कमी केलेला रेडीरेकनरचा दर नागरिकांच्या मालमत्ता कराला सुद्धा आपोआपच लागू होतो. त्यामुळे आत्ता जी बिले नागरिकांना मिळालेली आहेत ती बिले चुकीची असून त्यातही ६४ टक्के सवलत नागरिकांना मिळणे भाग असल्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले.

दोन्ही महानगरपालिकेमध्ये सत्ता एकाच पक्षाची असल्याने ही मागणी अत्यंत रास्त आहे. महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असेल तर ही ठीक बाब राज्यशासनाने सोसावयास काही हरकत नाही. त्याप्रमाणे कल्याण पश्चिमेस त्वरित कल्याण डोंबिवलीचा म्हणजेच कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व,पश्चिम मांडा-टिटवाळा मोहना, २७ गावे येथील ओला व सुका कचरा येऊ नये. या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी त्याचा निचरा ही होणे गरजेचे आहे. यासारख्या मागण्यांवर दिनांक ५ जानेवारी पर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास दिनांक १० जानेवारी पासून ‘जागरूक नागरिक’ बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे