व्यापाऱ्यांनो प्लॅस्टिक पिशव्या वापरताय तर सावधान! प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची सुरू आहे जोरदार कारवाई

कल्याण : प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध  प्रभागात प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे १६७  किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले आणि १ लाख ६० हजार  इतका दंड संबंधितांकडून आकारला आहे.

डोंबिवली येथील फ आणि ग प्रभागात रेल्वेस्थानक लगतच्या परिसरात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी तेथील नागरिक व व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करणे बाबत अवाहन करून जनजागृती केली त्याच प्रमाणे फ प्रभागातील भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. आय प्रभागात ही प्लास्टिक बंदी बाबत सहा. आयुक्त संजय साबळे यांनी व्यापारी संघटना व महिला बचत गट यांची एकत्रित सभा घेऊन त्यांना प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल न वापरणे बाबत सूचना केल्या.

-कुणाल म्हात्रे

वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार खमनी सुभाषिश बॅनर्जी यांनी १ जानेवारी रोजी त्यांचे पती सुभाषिश बॅनर्जी (६५) यांना त्यांच्या घरातुन मनजीत कुमार यादव व त्याचे दोन साथीदार यांनी पाच लाख रुपयासाठी जबरदस्तीने अपहरण करुन नेल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच सपोनिरी दत्तात्रय सानप यांना तक्रारदार यांची तक्रार घेवुन त्याप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला.

डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले. बॅनर्जी याने या तिन तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा व्हिजा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिजाची मुदत संपली. मनजीतकडून दिलेल्या पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात झाला. बॅनर्जी याने स्पष्ट सांगितले की, सर्व पैसे खर्च झाले. मात्र मनजीत काही थांबला नाही. त्याने दोन साथीदारांसह धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्यासोबत बॅनर्जी यांचे अपहरण केले.

अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या नंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. या दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच तांत्रिक बाबीचा तपास करून पोलिसांनी नालासोपारा येथील गोराई नाक्या जवळील एका हॉटेल मध्ये छापा मारून  बॅनर्जी यांची सुटका करून मनजीत यादव व त्याचे दोन साथीदार धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांना   ताब्यात घेतले. आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश मध्ये राहणारे असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

-कुणाल म्हात्रे