डोंबिवलीत कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा सप्लाय करणाऱ्या तिघांना अटक; अतिदुर्गम भागातून आणल्या जात होत्या गोण्या

डोंबिवली (Dombivli Crime) : शहरातील मानपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवम हॉटेल जवळील मैदानात अमली पदार्थ विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तात्काळ मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी पोलिसांसह सापळा रचून आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय इसमाला 20 किलो 300 ग्राम गांजाच्या दोन गोण्यासह एनडीपीएस एक्ट अंतर्गत अटक करून पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या गांजाच्या गोणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी अति दुर्गम भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक थेट शिरपूर येथील अतिदुर्गम भागात पोहोचले आणि त्यांनी रेमन डुल्या पावरा, संदीप छोटू पावरा या दोघांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. हा गांजा डोंबिवलीतील कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. अशा प्रकारचे कोणतेही गांजा विकणारी टोळी आढळल्यास ठाणे नियंत्रण कक्ष किंवा कल्याण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कॉलेजात शिकणारी तरुण पिढी गांजाच्या आहारी गेल्याने गांजाची मोठी मागणी शहरी भागात वाढली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून तो माल शहरी भागात आणला जातो. शहरी भागात विविध ठिकाणी गांजा विक्रीचे छुपे अड्डे बनवून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारची विक्री कोठे होते याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

Three arrested for supplying cannabis to college students in Dombivali

भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ठाणे वनविभागाची धडक कारवाई

कल्याण : भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले असून ठाणे वनविभागाने (Thane Forest) हि  धडक कारवाई केली आहे.  रमेश तुकाराम वाळिंबे रा.आल्यानी, बारकु गणपत हिलम रा.कळगाव, गणेश गुरुनाथ वाघ रा.कळगाव अशी आरोपींची नावे असून हे तिघेही शहापूर तालुक्यात राहणारे आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उपविभागीय वन अधिकारी मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. देवरे वनक्षेत्रपाल पडघा यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध सापळा रचून रेंज स्टाफ वनपाल वनरक्षक पडघा यांच्या समवेत नाशिक मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोड जवळ मौजे कासने गाव हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी भेकर जातीचे पिल्लू अवैध विक्री व्यवहार करताना तीन आरोपींना जिवंत भेकराच्या पिल्ला सोबत पकडले. या आरोपींना भिवंडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

या कारवाईत दिनेश माळी (वनपाल पडघा), विलास निकम (वनपाल वडपा), श्याम चतुरे (वनपाल दिघाशी), अजय राठोड (वनरक्षक सांगावं), अमित कुलकर्णी (वनरक्षक पाच्छापूर), जमीर इनामदार (वनरक्षक लोनाड), पंकज भाऊसाहेब (कार्यालयीन लेखापाल), महेंद्र भेरे (कार्यालयीन कर्मचारी), वाहन चालक विकास उमतोल, संतोष गोडांबे, वनमजूर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत आरोपीने वापरलेल्या दोन मोटार सायकल जप्त केल्या असल्याची माहिती वनपाल साहेबराव खरे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

Three arrested for selling deer calves; Action taken by Thane Forest Department

रस्त्यावरील बेवारस उभी वाहनं KDMC ने हटवली

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काही निर्देश घालून दिले होते. यानुसार ‘4-जे’ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव रोड, सुचकनाका, पत्रीपुल, कचोरे या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली व दैनंदिन साफसफाईस बाधा ठरणारी बेवारस व मोडकळीस आलेली एकुण १६ बेवारस वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.

आज सकाळी करण्यात आलेली ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, आर.टी.ओ. चे अधिकारी यांच्या सहाय्याने व टोइंग मशीन, डंम्‍पर व जेसीबी च्या मदतीने करण्यात आली.

सध्या महानगरपालिका शहरातील स्वच्छता या विषयावर मोठा भर देत असून वास्तवात शहराला बकालपणातुन बाहेर काढीत सौन्दर्यदृष्टी प्रमाणे कामकाज सुरू आहे. वेळोवेळी नागरिकांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, भिंतीवर रंगकाम अश्या सर्व बाबींवर महापालिका बारकाईने काम करत आहे. मात्र शहराला स्मार्ट करण्यासाठी शहरातील नागरिकांनी आधी स्मार्ट होणं गरजेच आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC removed unattended vehicles on the road