कल्याण पूर्वेत सहा हजार रोपांच्या माध्यमातून साकारणार शिवरायांची प्रतिमा

Kalyan Shiv Jayanti : कल्याण पूर्वेतील गेल्या ३६ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने १९ फेब्रुवारी या शिवजयंती दिनी वृक्ष रोपांच्या माध्यमातून भव्य अशी शिवप्रतीमा निर्माण करण्यात येणार असून शिव जयंती नंतर हीच वृक्षांची रोपे विविध संस्था संघटनांना वृक्षारोपणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.

गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षीही भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंध कायम असल्याने कोरोना संदर्भातील सर्व अटी शर्तींना अधिन राहून १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती उत्सव तिसगांवातील तिसाई मंदीराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या उत्सवा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  चेहर्‍याची विविध प्रकारच्या सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून प्रतीकृती निर्माण करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश तसेच विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुमारे पंधराशे चौरस फुटामध्ये साकारण्यात येणाऱ्या शिवप्रतीमेत वापरली जाणारी वृक्षांची रोपे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था संघटनांना देण्यात येणार असुन ज्या संस्था संघटना या रोपांचे पुढच्या वर्षा अखेर चांगल्या प्रकारे जतन आणि संवर्धन करतील अशा संस्था संघटनांचा पुढील वर्षीच्या जयंती उत्सवात विशेष असा सन्मान करण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमातील साकारण्यात येणाऱ्या शिव प्रतीमेचे दर्शन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

Web Title : The image of Shivaji maharaj will be created through 6,000 saplings in Kalyan East

Raju Patil : शिवसेनेने स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा मनसे आमदाराचा आरोप

कल्याण :- मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे मनपाने आज जाहीर केले आहेत. मात्र या प्रभाग रचनेवर राजकीय नेत्यांसह काही सर्वसामान्य नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

कल्याण डोंबिवली मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली मधील काही नागरिकांनी नकाशे प्रभाग रचना पाहून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केल्या असल्याचा आरोप केला आहे. मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांनी या प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप घेतला असून शिवसेनेने फायदा होईल अशीच रचना करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. “जिसकी लाठी उसकी भैस” या पंक्ती प्रमाणे शिवसेना सत्तेचा फायदा घेत आहे आणि आपल्या सोइ नुसार प्रभाग पाडले जात असल्याचा घणाघाती आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कोरोनामुळे KDMC निवडणूक बरीच लांबणीवर पडल्याने महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुकेचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने आरोप केल्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवल्या जातात की नाही हे देखील पहावे लागणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र आता युतीतून वेगळे झाल्यानंतर भाजपची काय भूमिका असेल हे देखील पहावे लागणार आहे.

-रोशन उबाळे

Raju Patil: MNS MLA alleges that Shiv Sena has formed wards according to its own convenience

KDMC New Ward : ‘इतके’ आहेत नवे प्रभाग; तुमचा प्रभाग जाणून घ्या

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून आज नवी प्रभाग रचना ( KDMC New Ward ) जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यादृष्टीने आता सर्व पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी मतदारांची आकडेमोड करायला सुरुवात केली आहे.

क.डों.म.पा.ने जाहीर केलेल्या यादीनुसार आता १२२ ऐवजी ४४ प्रभाग असणार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रभागांची संख्या कमी वाटत असली तरी प्रत्येक प्रभागाचा भौगोलिक विस्तार आणि सीमा वाढविण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि भौगोलिक रचनेच्या आधारावर नवे प्रभाग बनविण्यात आले आहेत. एका प्रभागात चार जागांसाठी निवडणुका रंगतील तर काही प्रभागात मात्र तीन जागा असणार आहेत. अश्या एकूण १३३ जागांवर क.डों.म.पा.ची निवडणूक रंगणार आहे.

नव्य प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्ष यांना आपल्या योजना आखण्यासाठी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे OBC आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात सुरू असून राज्यसरकारचे लक्ष त्यावर आहे. मुंबई, पुण्यासह आणखी काही महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत आला असून तेथेही प्रशासकीय राजवटीची तयारी केली जात आहे. त्यामुळे प्रभाग रचना जरी जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात निवडणुका केव्हा होतील हे काही सांगू शकत नाही.

-संतोष दिवाडकर

KDMC New Ward : New ward structure of Kalyan Dombivali Municipal Corporation announced