वसार गावात प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कल्याण : श्री नानासाहेब धर्माधिकारी ( Nana saheb Dharmadhikari ) आई गांवदेवी प्रसन्न प्रवेशद्वाराचे लोकार्पण आज होळीच्या निमित्ताने वसार गावात करण्यात आले. स्व.तुळशीराम गायकर यांच्या स्मरणार्थ रमेश गजानन फुलोरे यांच्या सौजन्याने व सुभाष गायकर तसेच सागर फुलोरे यांच्या प्रयत्नाने व स्वखर्चाने करण्यात आले आहे.

प्रत्येक गावात अथवा शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कमानीतून जावे लागते. यातून आपण कोठे प्रवेश करीत आहोत हे सर्वांना समजते. या दृष्टीने वसार गावात आता नवे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून यावर विचार केला जात होता. मात्र उद्योजक सुभाष गायकर, सागर फुलोरे, रमेश फुलोरे आणि सहकाऱ्यांनी मिळून या प्रवेशद्वाराच्या निर्मितीला सुरुवात केली. होळीच्या शुभमहूर्तावर सकाळी फीत कापून या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

आयोजित लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर तसेच प्रमुख अतिथी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र भुषण विश्वनाथ महाराज वारींगे उपस्थित होते. त्याचबरोबर शंकर महाराज म्हात्रे, अभिमन्यू चिकणकर, अशोक म्हात्रे, गणेश कोळेकर, दिलीप फुलोरे, नरेश वायले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ देखील उपस्थित होते. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार देखील मानण्यात आले.

उद्योग क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना आपण समाजासाठी देखील काहीतरी देणं लागतो हा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि याच विचारातून आम्ही हे प्रवेशद्वार उभे करण्यासाठी पुढे सरसावलो असे उद्योजक सुभाष गायकर यांनी एम एच मराठीशी बोलताना सांगितले. यापुढेही लोकोपयोगी कार्य व समाजसेवा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे गायकर म्हणाले.

-संतोष दिवाडकर

Web Title : Dedication of entrance to Vasar village

पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची Kalyan Mahotsav ला भेट

Kalyan Mahotsav : कल्याण पूर्वेतील तिसगाव गांवदेवी मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या कल्याण महोत्सवाची सांगता काल झाली. अंतिम दिनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण महोत्सवाला भेट दिली. यावेळी आयोजकांनी कोरोना काळात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

अध्यक्ष दिलीप दाखिनकर आणि आधारस्तंभ महेश गायकवाड यांच्या आयोजनातून १२ मार्च पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली होती. पाचही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या हस्ते महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेवर कार्यरत असणारे ‘देवा’ यांचे आयोजक महेश गायकवाड यांनी देखील कौतुक केले.

संपूर्ण पाचही दिवस कल्याण महोत्सवात हजारोंच्या संख्येने लोकांनी भेट दिली. एम्युजमेंट पार्क, खाण्या पिण्याचे स्टोल, कपडे व इतर वस्तूंचे स्टोल या महोत्सवात लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या सर्वांबरोबर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी देखील प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. मागील दोन वर्षे कोरोनामुळे अश्या पध्दतीचे महोत्सव होत नव्हते. त्यामुळेच आम्ही लोकांना आनंद वाटण्याच्या उद्देशाने कल्याण महोत्सव आयोजित केला असल्याचे अध्यक्ष दिलीप दाखिनकर व महेश गायकवाड यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

Web Title : Deputy Commissioner of Police Sachin Gunjal visits Kalyan Mahotsav