Kalyan Dombivli : खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला आहे. पावसाने उसंती देत नसल्याने खड्डे भरण्याचे कामाला अडथळा ठरला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊन शहरातील रस्त्यावरील खड्डे पाहता हा दावा आता संशोधनाचा विषय ठरला आहे. शहरातून जाणाऱ्या एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी अंतर्गत असलेल्या रस्त्यावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. एकंदरीतच संबधित यंत्रणांकडून खड्डे बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे वाहतुकीस अडचण आणि परिणामी होणारी वाहनाची संथ गती आता खड्डे भरण्यासाठी वाहतूक पोलीसच सरसावले आहेत.

नागरिक खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवता सोडवता दमछाक होतेय. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली पूर्वकडील टिळक चौक ते शेलार नाक्यापर्यत पडलेले खड्डे बुजवन्यासाठी पुन्हा वाहतूक पोलीसच सरसवल्याचे आज दिसून आले. वाहतूक व्यवस्थेबरोबर रस्त्यावर अपघात होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून वाहनचालकांना थोडा का होईना पण दिलासा देत प्रशासनाला शिकवण दिली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Dombivli : Traffic police on roads to plug potholes

Barvi Dam : बारवी धरण झाले ओव्हरफ्लो

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरी तसेच ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आज रात्री आठच्या दरम्यान ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातील क्षमते पेक्षा जास्त पाणी होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे.

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोरदार बरसात केल्याने बारवी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. मात्र नंतर पावसाने उसंत घेतल्याने धरणातील पाणीसाठ्यात होणारी वाढ थांबली होती. यानंतर मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने थांबलेली वाढ पुन्हा सुरू झाली. यानंतर धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे.

बारवी धरण उप अभियंते संजय माने यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार बारवी धरण १००% भरले असुन धरणात ७२.६० घन मिटर इतका पाणीसाठा झालेला आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने सतर्क रहावे लागणार आहे. मात्र असे असले तरी पावसाने उसंत घेतला असून पूरपरिस्थिती ओढवण्याची शक्यता नसून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर मात्र विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासना कडून केले जात आहे. सध्या धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर

Barvi Dam : Barvi Dam overflowed

Maratha Morcha : मंगळवारी कल्याण मध्ये मराठा जनआक्रोश मोर्चा

Maratha Morcha : मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात कल्याणच्या शासकीय विश्राम गृहात नुकतीच बैठक पार पडली. मंगळवारी सकाळी १० वाजता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून ५० टक्क्यांच्या आतील मराठा आरक्षण ओबीसी मधून, इडब्ल्यूएस आरक्षण, शासकीय सेवेमधील विद्यार्थ्यांना नियुक्तीचा अडचणीबाबत, सारथी संस्थेमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा प्रश्‍न व इतर मागण्यांसाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, दिवा, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कर्जत, कसारा, मुरबाडसह  संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

Maratha Morcha: Maratha Janakrosh Morcha in Kalyan on Tuesday