सेंट मेरीज हायस्कूल कल्याण (पूर्व) येथे मातृ-पितृ दिन सोहळा भावनिक वातावरणात पडला पार

कल्याण : शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सेंट मेरीज हायस्कूल कल्याण (पूर्व) येथे विद्यार्थ्यांनी मातृदेवो भव पितृ देवो भव ही भावना मनात ठेवून पालकांची पूजा केली. हा कार्यक्रम याच उद्देशाने साजरा करण्यात येतो की विद्यार्थ्यांनी पालकांच्या प्रति कृतज्ञता, प्रेम, आदर, जिव्हाळा या भावना व्यक्त कराव्यात. हा संस्कार त्यांच्यामध्ये रुजावा आणि है पवित्र नातं उजळून निघावं.

देवांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पूज्य स्वामींनी निष्कलानंदाजी यांनी धार्मिक पद्धतीने विधिवत पूजेला सुरुवात केली आणि सगळं वातावरण भावनिक झालं विद्यार्थी व पालक यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. पूजापाठ, श्लोक, भजन या सर्वांनी वातावरण मंगलमय केलं.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिगंत पदयात्री माननीय विद्याधर भुस्कुटे सर आणि सी दिपाली काळे लाभले होते. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दिव्या बोरसे मॅम आणि सीईओ माननीय विंदा भुस्कुटे मॅम यांनी पालकांची उपस्थिती व कार्यक्रमाचे आयोजन याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांवर बालवयात केले जाणारे संस्कार व विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा होणारा व्यक्तिमत्व विकास पाहून पालकांनी आनंद व्यक्त केला.

या भव्यदिव्य सोहळ्याचा समारोप इयत्ता पाचवीच्या विद्याध्यनि आभार प्रदर्शनाने केला.

ठाणे जिल्हा क्रीडा संघटनेतर्फे आर्य गुरुकुलमध्ये मेगा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

कल्याण : 20 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या मेगा बुद्धिबळ स्पर्धेत 25 हून अधिक शाळांतील 250 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. ठाणे जिल्हा शालेय क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आर्य गुरुकुल आणि आर्य स्पोर्ट्स अकादमी द्वारा संचालित आर्य गुरुकुल शाळा नांदिवली, कल्याण पूर्व येथे होता.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुण बुद्धिबळप्रेमी एकत्र आले आणि त्यांनी या खेळाबद्दलची त्यांची आवड आणि ज्ञान प्रदर्शित केले. बुद्धिबळ हा एक अद्भुत खेळ मानला जातो जो मुलांचे तर्क कौशल्य, समस्या सोडवणे आणि एकूणच संज्ञानात्मक कौशल्ये वाढवतो.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती अर्चना जोशी यांच्यासह ठाणे जिल्हा शालेय क्रीडा संघटनेचे सरचिटणीस श्री.जे.पी.सिंग उपस्थित होते. ठाणे जिल्हा शालेय क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष आणि आर्यग्लोबल ग्रुपचे क्रीडा प्रमुख दीपक वर्मा यांनी स्पष्ट केले.

“आर्य स्पोर्ट्स अकादमी शहरातील तरुणांना त्यांच्या क्रीडा कौशल्यांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नियमितपणे स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करते. बॉक्सिंग, बुद्धीबळ, जिम्नॅस्टिक्स, कॅरम आणि तिरंदाजीच्या नियमित स्पर्धांमुळे आम्हाला क्रीडा कौशल्याची माहिती मिळते आणि मुलांना नवीन खेळ शिकण्यासाठी आणि नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ देखील मिळते.

आर्यग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष श्री. भरत मलिक यांनी आपले मत व्यक्त केले, “बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी वीकेंडला सामायिक आवडी असलेले अनेक तरुण एकत्र येतात हे पाहून आनंद वाटतो. बुद्धिबळ वाढत्या मनासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि त्याचा जीवनाच्या इतर पैलूंवरही परिणाम होतो. आम्ही आर्यग्लोबलमध्ये नेहमीच तरुणांना खेळासाठी त्यांचा कल शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य करत असतो. या प्रयत्नात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि अशा स्पर्धांदरम्यान आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही TDSSA चे आभारी आहोत. आर्य स्पोर्ट्स अकॅडमी आणि ठाणे जिल्हा शालेय क्रीडा संघटना नजीकच्या भविष्यात अशा आणखी स्पर्धांसाठी तयारी करत आहेत ज्यामुळे ठाणे जिल्हा क्रीडा प्रतिभांचा केंद्र बनू शकेल.

watch video

संतोष दिवाडकर

Organized Mega Chess Tournament in Arya Gurukul by Thane District Sports Association

Rahul Patil – गोळीबार करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी

कल्याण : माझ्यावर बेछूट गोळीबार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी राहुल पाटील ( Rahul Patil ) यांनी पोलिसांकडे केली आहे. पंढरीनाथ फडके ( Pandharinath Phadke ), कुणाल पाटील ( Kunal Patil ) अशा एकूण ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर अटकेत असलेल्या आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे.

मागील १५ वर्षांपासून पंढरीनाथ फडके हे नाव बैलगाडा शर्यतीत चर्चेत आहे. तर राहुल पाटील आणि त्यांचा मथूर बैलाचा मागील ३ वर्षात सर्वत्र नावलौकिक झाला असून ही बाब डोळ्यात खुपत असल्याने कट रचला गेला असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात आडीवलीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचाही हात असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे.

राहुल पाटील यांना संपण्याचा कट रचून त्यांच्या गाडीवर पंढरीनाथ फडके आणि त्यांच्या सहकार्याने बेछूट गोळीबार केला. सुदैवाने आपण बचावलो आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. बेछूट गोळीबार करणारे उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राहुल पाटील यांनी केली आहे.

संतोष दिवाडकर

Take action against thugs who commit shootings; – Rahul Patil : Watch full video

Video : राहुल पाटील यांची पोलिसांकडे मागणी
खऱ्या दानाचा आनंद काय असतो ? – An experience at the base of Aai Ekvira

खरं तर न राहवून काही तरी सांगावंसं वाटलं आणि बरेच दिवस काही लिहल नव्हतं म्हणून मुद्दामच हे लिहतोय. आज माझ्या ऑफिसमधील स्टाफ सोबत मी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. खूप गर्दी असल्याने आम्ही फक्त मुख दर्शनच केले. ज्यावेळी दर्शन करीत होतो त्यावेळी सर्व जण हाताला येतील तितके पैसे दहा, वीस, पन्नास , शंभर आईच्या चरणी वाहत होते. (Experience aai ekvira)

आता खरं सांगतो मी देवाच्या चरणी कधीही एकही रुपया दान न करणारा व्यक्ती असल्याने मी याही वेळी असे काही केले नाही. पण आशीर्वाद घेताना जे मागितले त्यावरून फक्त आईला इतकेच बोललो की मी काही पैसे वाहणार नाही आणि तुला त्याची गरज पण नाहीये. तू फक्त आशीर्वाद दे आणि माझ्याकडून गरजूंची मदत करून घे. हे मी मनातल्या मनातच बोललो. मुखदर्शन केले माथा टेकला आणि तिथून निघालो. थोडे फार फोटो सेशन झाले आणि आम्ही सर्व खाली उतरायला सुरुवात केली.

यादरम्यान आमच्यातील तिघे जण पुढे निघून गेले. मी आणि माझा सहकारी मित्र विशाल आम्ही मागून चालत होतो. या दरम्यान पायर्यांवर अनेक जन भेटले. त्यात काही महिला परडी हातात घेऊन दक्षिणा घेत होत्या, काही जण देवाच्या नावाने भिक्षा मागत होते. पण या ठिकाणी मी कधीच दान करीत नसल्याने हात जोडून पूढे निघालो.

जिथून पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणी आल्या नंतर एका बाजूला बसलेल्या वयस्कर आदिवासी महिलेने आवाज दिला, दिसायला अशक्त वाटत होती. अंगावर ठाकरी पेहराव म्हणजे ब्लाउज आणि कंबरे खाली साडी असे काहीतरी.

“दादा… आर खायला दे र कायतरी… दे दे चिक्की तरी दे…” तिचे आवाज ऐकून मी थांबलो आणि पटकन पिशवी उचकटून तिला एक चिक्कीचे पाकीट काढून दिले.

“पाणी हाय का रं? खूप वेळ तहानली हाय… दे र दादा पाणी…” तिने पाण्याची मागणी केली.

आमच्याकडे पाणी नव्हते. थोडे पाठीमागेच एक हॉटेल होते. तिथून एक पाण्याची बाटली घेतली आणि त्या महिले पर्यंत आलो. त्यांना म्हटलं…

“हे घ्या पाणी…”
हातात पाण्याची बाटली घेत तिने माझा हात ओढला आणि डोक्याला लावला. त्या आजी बाईने थेट माझ्या पायाला हात लावून पाया पडू लागली. न राहवून मी मागे सरकलो. आणि वाकून तिने पायाला हात लावल्या बद्दल तिच्या पाया पडलो. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला जाणीव झाली की ही महिला पाण्यासाठी कासावीस झाली होती.

“नको नको राहुद्या… पाया नका पडू” त्या महिलेला मी थांबवले.

का कुणास ठाऊक मी तिथून निघालो तरी जोरजोरात जिवाच्या आकांताने ती ओरडत होती…

” बाळा… लय मोठा होशील र तू… देव तुझं भलं करील… तू लय मोठा होशील…” संपूर्ण पायऱ्या संपे पर्यंत ती बाई हेच सांगत होती. का कुणास ठाऊक मी मागेही वळून पाहिले नाही. एकदा हात जोडून निघालो तर पुन्हा मागेही पाहिले नाही. माझा मित्र विशालनेही माझ्या या कृत्या बद्दल मला शाबासकी दिली.

सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खरं दान हे दानपेटीत नाही तर प्रत्यक्ष गरजू व्यक्तीला मदत करणे आहे. एकविरा मातेला फक्त म्हणालो की मी दान म्हणून इथे पैसे देणार नाही. माझ्या कडून एखाद्याची मदत करवून घे. आणि देवी मातेने हे पुण्यकर्म शेवटी जाता जाता तिच्याच दारात करवूनही घेतलं. ही माझी परीक्षा होती का आणखी काही माहीत नाही. पण हा अनुभव आणि हा प्रसंग लक्षात राहणारा ठरला आहे.

एकविरा माते की जय !!!

-संतोष दिवाडकर

An experience at the base of Aai Ekvira

MSEB Electricity Theft : कल्याण पूर्वेतील १३ बंगले मालकांची लाखोंची वीजचोरी उघडकीस

MSEB Electricity Theft :- महावितरणच्या कल्याण पुर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत विशेषत: बंगले मालकांकडून सुरू असलेल्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून १३ बंगले धारकांची ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली आहे.

कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत सर्वाधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर वीजचोरी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात १३ बंगले मालकांकडील ३ लाख २७ हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. यात भाल येथील एकाच बंगल्यात विनामीटर केबल टाकून सुरू असलेल्या ६ लाख ७२ हजारांच्या वीज चोरीचा समावेश आहे. तर नेवाळी येथील एका जीन्स कारखान्याची १३ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. नेवाळी, धामटण, भाल, वसार, व्दारर्ली आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. एकट्या ऑक्टोबर महिन्यात या परिसरात ५९ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून ६८ लाख ४७ हजार रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला. संबंधितांना वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले असून ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती व त्यांच्या टिमने ही कामगिरी केली. वीजचोरी शोध मोहीम यापुढे नियमितपणे राबविण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये तसेच अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कुणाल म्हात्रे

MSEB Electricity Theft: Electricity theft of lakhs of 13 bungalow owners in Kalyan East exposed