Murbad News : घरात बसलेल्या व्यक्तीचा वीज अंगावर कोसळून मृत्यू

Murbad News : मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. भरदिवसा अंधार दाटून जोरदार पावसाचा थैमान पहायला मिळतोय. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे अनेक लोकांच्या जीवाला घोर लागून राहतो. तर प्रकृतीच्या या रौद्रअवतारा मुळे लहान मुलांचा देखील थरकाप उडतोय. या विजेच्या तांडवामुळे मुरबाडमध्ये एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुरबाडमध्ये काल मुसळधार पाऊस सुरू होता. याचदरम्यान शिरगाव येथे वास्तव्यास असलेल्या परशु पवार यांच्या अंगावर वीज कोसळली. सदर व्यक्ती आपल्या घरातच बसली होती. मात्र दुर्दैवाने वीज अंगावर पडून या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अधिक घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांचा तांडव सध्या सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर झाडांखाली आडोसा न घेता सुरक्षित ठिकाणी जावे. अशावेळी विजसेवा खंडित केली जाते. नागरिकांनी देखील आपल्या यांत्रिक उपकरणांचे प्लग बोर्डपासून वेगळे केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. संपूर्ण वातावरण शांत होई पर्यंत खबरदारी घेणे गरजेचे असेल.

Murbad News : A person sitting in the house died due to electric shock

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पण गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांचे काय? राजेश दाखिनकर यांचा सवाल

अक्षय शिंदे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले. शिवसेनेकडून राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखिल भारतीय सेनेचे पक्ष प्रमुख अरुण गवळी उर्फ डॅडी यांचे विश्वासू खंदे समर्थक अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख राजेश दाखिनकर यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधक दोघांवरही सवाल उपस्थित केले आहेत.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्या चिमुरड्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे यावेळी राजेश दाखिनकर म्हणाले. जो माणूस मुलींवर अत्याचार करतो त्याची बाजू कोण कशी घेऊ शकतो? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात ज्या शाळेत हा प्रकार घडला ते संस्थाचालक राजकीय पक्षाशी संलग्न असून ते सध्या फरार आहेत. त्यांना आतापर्यंत अटक होऊन त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचे उत्तर गृहमंत्री व राज्य सरकारने जनतेला द्यायला हवे. शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेले आहे. त्यामुळे या घटनेत आणखीन समाविष्ट असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन व्हायला हवे अशी प्रतिक्रिया राजेश दाखिनकर यांनी एमएच मराठीला दिली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या. परंतु अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात मग सरकार कोणाचेही असो, महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे. ‘शक्ती कायदा’ जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे. त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही अखिल भारतीय सेनेतर्फे करतच आहोत. परंतु इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही, याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?

डोंबिवलीत घडलेल्या घटनेत आम्ही महिलांवरील अत्याचारासंदर्भात ‘शरिया’ सारखे कायदे महाराष्ट्रात लागू झाले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसेल, असे स्पष्ट मत मांडले होते. राज्य शासनाने कठोर पावले उचललीच पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला पुरा’ होईल.

– राजेश दाखिनकर
(ठाणे जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय सेना)

Akshay Shinde’s encounter but what about others involved in the crime? Question by Rajesh Dakhinkar

Dwarli ते नेवाळी नाका पर्यंत घरफोड्या वाढल्या; रात्रीच्या पोलीस गस्तीची मनसेची मागणी

Dwarli : श्री मलंगगड रोडवरील द्वारली ते नेवाळी नाका परिसरात अलीकडल्या काळात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून महिलांची छेडछाड होत असल्याची माहिती मनसेचे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी हिल लाईन पोलिसांना निवेदनाद्वारे दिली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व भागात असलेला द्वारली ते नेवाळी नाका पर्यंतचा भाग हा शहरी वर्दळीपासून बाहेर असलेला भाग आहे. त्यामुळे येथील लोकवस्ती ही अलीकडे हळूहळू वाढू लागली आहे. त्याचबरोबर परिसरात घरफोड्या, दुकानफोडी वाढल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग भयभीत झाला असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत.

गर्दुल्ल्यांचा वावरामुळे या भागात महिला सुरक्षित नसून छेडछाडीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी निवेदनात केली असून, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना भेटून प्र.क्र.११९ चे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी निवेदन दिले आहे.

Burglary increased from Dwarli to Newali Naka; MNS’s demand for night police patrolling

डोंबिवली ते मुंबई थेट KDMT बससेवा सुरू करण्याची मागणी

KDMT : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस सध्या नवी मुंबई मार्गावर यशस्वी व प्रवाशांना सोयीस्कर अशी धाव घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता डोंबिवली मोठागाव येथून नव्याने बांधण्यात आलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मुंबईकडे बस सेवा सुरू करण्यासाठी युवासेनेचे दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळेल असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत लवकरच शंभरहून अधिक नवीन बस दाखल होणार आहेत. या बसमुळे डोंबिवली ते घोडबंदर रोड, डोंबिवली ते ठाणे, डोंबिवली ते मुलुंड चेक नाका आणि डोंबिवली ते घाटकोपर मेट्रो स्टेशन या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाल्यास, रेल्वे प्रवासाला उत्तम पर्याय मिळेल. ही सेवा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वेवरचा भार काहीसा कमी होईल असे दीपेश म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहरांवर येणाऱ्या लोंढ्यामुळे लोकसंख्या दुप्पटीने वाढू लागली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा देखील बोजवारा उडाला आहे. ज्याचा ताण रेल्वे वाहतुकीवर अधिक होतो. त्या दृष्टीने कल्याण डोंबिवलीतुन मानकोली पुलावरून मुंबई बससेवा सुरू केली तर नक्कीच सोयीस्कर बाब ठरू शकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Dipesh Mhatre’s demand to start direct KDMT bus service from Dombivli to Mumbai

डोंबिवली शहर होणार ग्रीन एनर्जी सिटी; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्यास सुरुवात

रवींद्र चव्हाण : डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल व या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समास्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती. विशेष म्हणजे या योजनेत सोलार पॉवर युनिटच्या फिटिंग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया मोफत पार पडणार आहे. यामुळे सोसायट्यांना सोलार पॉवर युनिट बसवणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नाहीत.

सदर योजनेसाठी सोलार पॉवर कंपन्या, सोसायट्या आणि महावितरण कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी या प्रक्रियेतील माईलस्टोन गाठला आहे. यावेळी ५४ सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी लेटर ऑफ इंटेंट साईन केले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या स्नेहा रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये सोलार पॉवर युनिट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला.

या योजनेमुळे सोलार पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या कनेक्शनसाठी पुढील २५ वर्षे स्थिर वीजदर शक्य होणार आहे. परिणामी तब्बल ५० ते ६०% रक्कमेची बचत होईल. यामुळे डोंबिवलीकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या ग्रीन एनर्जी सिटी संकल्पनेचे स्वागत केले आहे.

एसटी महामंडळ : यावर्षी पावला गणपती बाप्पा; नऊ वर्षांत प्रथमच एसटी आली नफ्यात

एसटी महामंडळ : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ वर्षांनी ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळ नफ्यात आल्याने व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.

या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख ६१ हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे. भविष्यात येऊ घातलेल्या स्व: मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळ : For the first time in nine years, ST turned a profit

Gajanan Rane : कामगारांना पावला राज ठाकरेंचा ‘गजानन’; करून दिली घसघशीत पगारवाढ

Gajanan Rane : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महापे येथील नामांकित कंपनी प्रोटोलॅबच्या कामगारांना अखेर न्याय मिळाला असून, मनसेच्या पाठपुराव्यामुळे येथील कामगारांना पगारवाढ मिळाली आहे. यासाठी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने या कामगारांनी गणेश चतुर्थीला मनसेचा गजानन पावल्याची भावना व्यक्त केली आहे.

ऑगस्ट महिन्यात प्रोटोलॅब, इलेक्ट्रोटेक्नोलॉजिस्ट
कंपनीच्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्य अंकुश राजपूत यांच्या समवेत सरचिटणीस गजानन राणे यांची भेट घेतली होती. या वेळी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यतत्व स्वीकारले होते. या वेळी सर्व कामगारांनी गजानन राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचे ठरवले होते. परंतु या प्रसंगी राणे यांनी आज तर तुमच्या कंपनीमध्ये युनियनची स्थापना झाली आहे, जेव्हा तुमच्या सर्व मागण्या मान्य करून घेईन, तुम्हाला चांगली पगारवाढ मिळवून देईन तेव्हाच हा सत्कार मी स्वीकारेन, असे सांगितले होते.

अनेक वर्षापासून रखडलेली पगारवाढ अखेर या गणेशोत्सवात पूर्ण झाली असून त्रैवार्षिक करारही पूर्ण झाला. यामुळे आनंदी झालेल्या कामगारांनी “राज ठाकरेंचा गजानन आम्हाला पावला” असे उदगार काढत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही आभार व्यक्त केले. यादरम्यान कामगारांनी गजानन राणे यांचा तसेच प्रथम पुढाकार घेणाऱ्या कल्याण मधील युवा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांचा यथोचित सन्मान केला.

Gajanan Rane : Raj Thackeray’s ‘Gajanan’ steps up for workers; Gave salary hike

आमदार Ganpat Gaikwad यांचे द्वितीय पुत्र Son राजकारणात? राजकीय वर्तुळात चर्चा

Ganpat Gaikwad Son : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र वैभव गायकवाड हे या घटनेनंतर अज्ञातवासात आहेत. त्यांच्या पश्चात गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या सक्रियपणे राजकारणात उतरल्या असून मागील काही काळापासून ते संपूर्ण मतदारसंघात वावरताना दिसत आहेत. त्यातच आता आमदार गणपत गायकवाड यांचे द्वितीय चिरंजीव प्रणव गायकवाड हे देखील नुकतेच एका विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी प्रथमच उपस्थित असल्याचे दिसल्यानंतर ते देखील राजकीय क्षेत्रात उतरले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

गणपत गायकवाड तरुण वयात असल्यापासूनच सामाजिक कार्यातून पुढे आले होते. त्यानंतर सलग दोन वेळा अपक्ष आमदार झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षातून तिसऱ्यांदा विजयी निवडणूक लढवली होती. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र वैभव गायकवाड यांनी देखील मागील वर्षी राजकारणात अधिकृतरित्या एन्ट्री केली होती. या संपूर्ण वर्षभरात त्यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी मतदारसंघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन कामकाज सुरू ठेवले. त्यानंतर आता त्यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रणव गायकवाड हे देखील एका राजकीय समारंभात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शुक्रवारी आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या एका विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी ते उपस्थित राहिले होते. त्यांच्याच हस्ते प्रभाग क्रमांक ११८ परिसरात विद्युत एल.ई.डी. पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले असून उपस्थितांनी याबाबत त्यांचे स्वागत केले.

प्रणव गायकवाड हे राजकीय गराळ्यापासून नेहमीच स्वतःला दूर ठेवत आले आहेत. साधी राहणी आणि सर्वसामान्य जीवनपद्धती अशी त्यांची ओळख असून याआधी ते धार्मिक,कौटुंबिक कार्य सोडता कधीही राजकीय अथवा सामाजिक प्रकाश झोतात आलेले नाहीत. मात्र आयोजित लोकार्पण सोहळ्याला काही कारणाने सुलभा गायकवाड यांना उपस्थित राहता न आल्याने प्रणव गायकवाड हे स्वतः उपस्थित राहिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रणव गायकवाड हे अद्याप राजकारणात आलेले नसून त्यांनी फक्त सामाजिक कार्य म्हणून सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे.

MLA Ganpat Gaikwad second son in politics?

MSRTC NEWS : एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये झाली वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

MSRTC News : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

MSRTC NEWS : Increase in basic pay of ST employees; Chief Minister’s announcement

KDMC News : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली

KDMC News : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने तोडक कारवाई केली होती. 4 जे प्रभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाई नंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून तक्रारदारांचा निषेध व्यक्त केला होता. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचे समोर आले आहे. परंतु ही बदली कारवाईमुळे झाली नसून महापालिकेच्या कार्यप्रणालीनुसार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता मनसे शाखेसमोरील पत्र्याचे शेड तोडणे महापालिकेला जास्त महत्त्वाचे वाटते का? असा सवाल मनसे पदाधिकार्यांनी उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षातील काही राजकीय मंडळींनी आकसापोटी महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत मनसेने शाखेसमोरील रस्त्यालगत एक भलेमोठे होर्डिंग्ज लावले होते. ज्यात ‘कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’ असा राज ठाकरेंच्या विधानाचा मजकूर लिहलेला होता. तक्रादारांच्या डोळ्यावरची सत्तेची झापड उतरविण्यासाठी आम्ही बॅनर लावला असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी 4 जे प्रभाग क्षेत्राच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांची 5 ड प्रभाग क्षेत्रात बदली केली आहे. तर 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त पदी सचिन तामखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत 5 ड प्रभाग क्षेत्राचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यावर सामान्य प्रशासन सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनसे शेडबाहेरील पत्र्यांच्या शेडवर केलेली कारवाई ही प्राप्त तक्रारीनुसार करण्यात आली होती. झालेल्या बदल्या या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी करण्यात आल्या असल्याचे बदली आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

KDMC News : Transfer of Assistant Commissioner who took action on shed in front of MNS branch