Sanjay Gaikwad on Police : पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad on Police : पोलीस खात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या बुलढाणा दौ-याच्या पूर्वसंध्येला आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गृहखात्याची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या आभार यात्रेसाठी आज बुलढाणा दौ-यावर येत आहेत. या दौ-याविषयी माहिती देण्यासाठी आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस खात्यावर नानाविध आरोप केले होते. अवैध धंद्यावर कारवाई करून पोलीस हप्ता वाढवून घेतात. काही पोलीस चोरांचे पार्टनर आहेत, रेड मारल्यावर पाच लाखाची रक्कम पन्नास हजार दाखवतात. अशा आशयाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती.

महायुतीच्या घटक पक्षातील आमदारानेच पोलीस दलाविषयी असे वक्तव्य केल्याची बाब विविध माध्यमांतून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचल्यावर शनिवारी दुपारी फडणवीस यांनी, “आमदार गायकवाड वादग्रस्त वक्तव्य करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करु” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काही तासांतच गृहखात्याकडून संकेत मिळाल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रविवारी बुलढाण्यात दौरा आहे. तत्पूर्वीच गृहखात्याने आमदार गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची तत्परतेने दखल घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Sanjay Gaikwad on Police : Controversial statement about police; Case registered

डोंबिवलीच्या क्रीडापटूंना ‘द्रोणाचार्य’ व ‘शिवछत्रपती’ पुरस्कार

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हे डोंबिवलीकर असलेल्या पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले. ही डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाबा आहे. शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेले पवन भोईर तर जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ जाहीर झालेले राही पाखले, आदर्श भोईर या युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने रवींद्र चव्हाण यांनी यथोचित सन्मान केला. त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, “हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे.”

पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले. ‘माझे डोंबिवलीकर माझा अभिमान’ असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘Dronacharya’ and ‘Shivchhatrapati’ awards to athletes from Dombivali

Power Cut Kalyan : कल्याण पूर्वेत उद्या तब्बल सात तास पॉवर कट

Power Cut Kalyan : पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून सर्व वीज यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. याचकरिता उद्या दि.१६ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असणार असल्याचा एक मॅसेज समाज माध्यमांवर फिरत आहे. दोन तीन नव्हे तर तब्बल सात तास कल्याण पूर्वेतील काही भागाचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. ऐन उकाड्यात इतके तास रहायचे कसे? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

समाज माध्यमांवर फिरत असलेल्या मेसेजनुसार या सात तासांत छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, विजयनगर, आमराई, गवळी नगर, तिसगाव नाका, आदर्श नगर, संतोष नगर, चक्की नाका परिसराचा वीजपुरवठा बंद असणार आहे. देखभाल दुरुस्तीकरिता पॉवर कट घेण्यात येत असल्याने नागरिकांनी महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. अलिकडल्या काळात तापमानाचा पारा हा ४०℃ ला खेटला असून विजसेवा खंडित झाल्यावर रहायचे कसे असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

कल्याण पूर्वेतील परिसर हा चाळ परिसर असल्याने पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दुपारच्या तापमानात इतक्या तासांचा पॉवर कट सोसवणे जिकरीचे आहे. तर अनेक घरांत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तर आजारी रुग्ण देखील आहेत. शिवाय व्यापारी वर्ग, डेअरी चालक देखील या निर्णयाविरोधात आहेत. त्यामुळे हा पॉवर कट सलग सात तासांचा न घेता तो दोन अथवा तीन टप्प्यात घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. इतक्या तासांच्या पॉवर कट विरोधात लोकप्रतिनिधी अथवा राजकीय नेते आवाज का उठवीत नाहीत? त्यांच्या घरात इन्व्हर्टर व गाडीत एसी असतो म्हणून त्यांना सामान्य नागरिकांना बसणारी झळ समजणार नाही असाही रोष कल्याण पूर्वतील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे महावितरणला आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.

Power Cut Kalyan: Power cut for seven hours tomorrow in Kalyan East

“गोली मार दुगा” हिंदी भाषेतून धमकीचा फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

कल्याण : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याचे पडसाद मात्र अजूनही कल्याण शहरात उमटतच आहेत. सहा गोळ्या लागून बचावलेले महेश गायकवाड यांचे कार्यालय प्रमुख असलेले निलेश रसाळ यांना आता फोनद्वारे धमकी आली आहे. सारखे सारखे कोर्टात जातोस, तुला गोळ्या घालून मारीन अशी धमकी सदर इसमाने दिली आहे. मात्र ही धमकी देणारा व्यक्ती हा हिंदीतुन बोलत असून तो नेमका महाराष्ट्रातील आहे की परराज्यातून फोन करून अशी धमकी देत आहे ही बाब देखील तपासली जाणार आहे.

मनसेच्यागुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेक वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी न येणाऱ्या इतर भाषिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मराठी बोलता येत नसेल तर काही खैर नाही असे चित्र आता मनसेने उभे केले आहे. त्यातच कल्याण मधील निलेश रसाळ या मराठी युवकास आलेला धमकीचा फोन हा एका अमराठी भाषिकाने केल्याने आपल्याच घरात मराठी माणसाच्या गळ्यावर नख लावले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निलेश रसाळ हे महेश गायकवाड यांचे कार्यलयीन कामकाज पाहतात. त्यामुळे अनोळखी इसमाने त्यांना कोर्टात सारखा दिसू नको नाहीतर गोळ्या घालीन अशी उघड धमकी दिली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात इसमाचा शोध घेतला जात आहे. परंतु सदर इसम हा अमराठी असून येथील स्थानिक मराठी भाषिकालाच जीवे मारण्याची धमकी देत आहे ही बाब गंभीर असल्याचे बोलले जाते. आता ही बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कानावर गेल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपूर्ण संभाषण ऐका पुढील लिंकवर

https://www.facebook.com/share/v/164WouekZ1

Hindi speaker threatens to kill local man