“किती भ्रष्टाचार करायचा काय लिमिट? कमी पडले असेल तर घ्या” – मनसेच्या राजू पाटलांनी खिशातून काढल्या नोटा

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले.

अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे काही वेळेस शाळा प्रशासनाला देखील सुट्टी देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली. “किती पैसा खायचा? किती भ्रष्टाचार करायचा? याला काही लिमिट आहे. म्हणून मी नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडत असतील तर घ्या” अशी खरमारीत टीका राजू पाटील यांनी सत्ताधार्यांवर केली.

MNS, Shiv Sena ubt unite against incomplete work of Palava bridge

Kalyan East : अवेळी आलेल्या पावसाने चाळ परिसरांची उडाली दाणादाण

Kalyan East : वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरा शहरात नालेसफाईची कामे मार्गी लावावी लागतात जी साधारपणे मे महिन्यात केली जातात. मात्र पावसाने अवेळी हजेरी लावल्याने सफाई कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच दाणादाण उडाली आहे. तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठ मोठ्या नाल्यातील सफाईला ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र लहान सहान गटारातील गाळ उपसण्याचे काम महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिकणीपाडा, जिम्मी बाग, विठ्ठलवाडी हा सखल भाग बहुतांश चाळ परिसराचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान ‘४-जे’ प्रभाग क्षेत्रातील मंगल राघो नगर भागात नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र पाऊस आल्याने सफाई कामगारांनी काम थांबवून आडोसा घेतला. अर्धवट नालेसफाई असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने काही चाळींमध्ये पाणी तुंबून नागरिकांच्या उंबरठ्या पर्यंत पाणी पोहोचले होते. आणखीन काही वेळ पावसाने ब्रेक लावला नसता तर असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता होती.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या असल्या तरी पाऊसच वेळेपूर्वी आल्याने प्रशासनाची देखील गोची झाली आहे. अपुऱ्या नालेसफाईमुळे अनेक ठिकणी पाणी साठत असल्याने करदाते नागरिक संपूर्ण रोष महापालिका प्रशासनावर व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दिला असून याच काळात महापालिकेला संपूर्ण नालेसफाई करण्यास मुभा मिळणार आहे.

Kalyan East : Unseasonal rains have washed away the rice fields.

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. २७ मे २०२५ रोजी कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच अतिरिक्त पाणीसाठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे मंगळवारी २२ के.व्ही. एन.आर.सी.-२ फीडरवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. या सबस्टेशनहुन महापालिकेच्या १५० द.ल.लि. नेतीवली व १०० द.ल.लि. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास विद्युत पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी हा वीजपुरवठा बंद असणार असल्याने परिणामी जलशुद्धीकरण केंद्रही बंद राहणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरुस्ती करणे देखील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीकरिता महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८ तासांकरिता बंद असणार आहे. यादरम्यान कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाला पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Water supply to Kalyan Dombivali to be cut off on Tuesday