Rickshaw strike : रिक्षा चालकांचा चक्का जाम आंदोलनाचा ईशारा

Rickshaw strike : रिक्षा प्रवासात एकावेळी तीन हुन अधिक प्रवासी प्रवास करीत असल्यास सदर रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी आता संपूर्ण शहरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. सोमवारी या संदर्भात चक्कीनाका येथील वाहतूक उपशाखेत निवेदन देण्यात आले आहे.

ओव्हर सीट बसविल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून दहा हजार रुपयांचा दंड रिक्षा चालकांना ठोठावण्यात आला असून ही कारवाई अन्यायकारक आहे. एखादा प्रवासी स्वतःहून बसत असेल तर त्याच्यावर का कारवाई करीत नाहीत? आम्हालाही कुटुंब आहे. त्यांचे उदरनिर्वाह सर्व काही आम्हा रिक्षाचालकांवर अवलंबून आहे. सध्या इतक्या रिक्षा वाढल्या आहेत की आम्हाला व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. त्यात आम्ही इतका भरमसाट दंड कसा भरणार? असे अनेक सवाल रिक्षा चालकांकडून करण्यात आले. दरम्यान ही कारवाई थांबली नाही तर अर्धे ठाणे चक्का जाम करू असा इशारा रिक्षा चालकांकडून देण्यात आला.

Rickshaw drivers warn of massive strike

Waldhuni Bridge ला हाईट बॅरियर; अवजड वाहनांना नो एन्ट्री

Waldhuni Bridge : पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. त्यातीलच एक असलेल्या वालधुनी पुलावर आता अवजड वाहनांना प्रवेश नसणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस वाहतूक विभागाच्या समन्वयातून हाईट बॅरियर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उंच अवजड वाहने या बॅरियर मधून जाऊ शकणार नाहीत. मालाची वाहतूक करणाऱ्यांची मात्र आता बऱ्यापैकी गैरसोय होणार आहे.

कल्याण शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत आहे. पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी दिवसभरात शेकडो वाहने वालधुनी पुलावरून वाहतूक करतात. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीच विठ्ठलवाडी एसटी आगाराला आपली वाहने पत्रिपुलावरून नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटीची वाहतूकही या पुलावरून बंद करण्यात आली होती.

आता अवजड वाहनांचाही प्रवेश बंद केल्याने या कोंडीतून सुटका होते का हे पहावे लागणार आहे. अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद केल्याने उल्हासनगर व कल्याण पूर्वेत जाण्या येण्यासाठी शहाड अथवा पत्रिपुलाचा आधार घ्यावा लागणार आहे.

Height barrier on Waldhuni Bridge; no entry for heavy vehicles

हिंदी शिकवायची नाही! मनसेचं शाळांना पत्र

कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता पहिली पासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय दिला असून मनसेने या निर्णया विरोधात आवाज उठवला आहे. या संदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवू नये या आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व शाळांना देण्याच्या सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी मनसेने कल्याण पूर्वेत एक एक शाळा पिंजून काढीत शाळेतील मुख्यध्यापकांना राज ठाकरेंचे पत्र दिले आहे.

इयत्ता पहिली पासूनच शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जावी अशी सक्ती शिक्षण मंडळाकडून करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला विरोध होत असल्यामुळे ही सक्ती हटवून शाळेने आपल्या मर्जीनुसार हिंदी शिकवावी असे सांगण्यात आले. त्यानंतर शाळा प्रशासनाने आपल्या शाळेत हिंदी शिकवू नये याकरिता मनसेने सर्व शाळांमध्ये जाऊन राज ठाकरेंचे पत्र देण्याचा धडाका लावला आहे. कल्याण पूर्वेतील मराठी, इंग्रजी अशा सर्वच माध्यमातील शाळांना मनसे कार्यकर्त्यांनी भेट देत निवेदन दिले आहे.

या अगोदर इ.पाचवी पासून अभ्यासक्रमात हिंदी आणली जात होती. आता पहिली पासूनच विद्यार्थ्यांना जर तीन तीन भाषा लादल्या तर त्या लहान मुलांसाठी जाचक ठरेल असेही यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसून उत्तरेकडील भाषा आहे त्यामुळे ती महाराष्ट्रात लादू नये. राज्यभाषा म्हणून मराठी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी या दोन भाषाच ठीक आहेत. परंतु उत्तरेकडील लोकांना इकडे येऊन महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीच इथे आतापासून हिंदी माथी मारली जातेय. त्यामुळे आपण आपल्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकवू नये, मनसे तुमच्या सोबत असेल असे राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

Hindi should not be taught! MNS’s letter to schools

Ganesh Vidya Mandir शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं मस्तीत स्वागत

Ganesh Vidya Mandir : जून महिन्याच्या या आठवड्यापासून शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत समारंभ शाळेकडून करण्यात आला. कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचेही काहिसे असेच मजेदार स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून, कागदी टोप्या घालीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

एकेकाळी शाळेचा पहिला दिवस म्हणजे नुसतीच रडगाणी. परंतु आता बदलत्या काळानुसार पहिला दिवस म्हणजे फक्त नाचगाणी अशीच नवी प्रथा प्रचलित झाली आहे. गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षकांनी आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस चांगलाच मजेदार आणि अविस्मरणीय बनवला. लहान मुलांना आवडणारी गाणी लावून शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत थिरकू लागले. शाळेत संपूर्ण दिवसभर या विद्यार्थ्यांचा नुसता कल्ला सुरू होता. आपल्या आवडीच्या गाण्यावर चिमुकल्यांनी चांगलाच ताल धरला होता. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तकं, नव्या वह्या, नवे शिक्षक आणि नवे मित्र. एकंदरीतच सारे काही नवे नवे.

शाळेतील मुख्यद्यापीका ललिता मोरे यावेळी म्हणाल्या की, “पूर्वी असे काही नव्हते. शाळेच्या पहिल्या दिवशी छडी चालवायची नाही एवढेच आम्हाला माहीत असायचे. पण आता शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक सोहळ्या सारखा साजरा करण्याची पद्धत बनली आहे. खरेतर ही छान गोष्ट आहे, कारण हा दिवस पुढची दहा वर्षे म्हणजेच दहावीच्या निरोप समारंभा पर्यंत ही मुले लक्षात ठेवतील”.

Ganesh Vidya Mandir School welcomes first standard students with fun

एसटीला खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांची जोड?

एसटी पर्यटन : राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करव्यात असे आवाहन परिवहन मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. एसटी महामंडळ मुख्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यादरम्यान महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सर्व खाते प्रमुख यांच्या सह खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनाचा आनंद लुटता येईल.

खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर-नाशिक दर्शन, अष्टविनायक दर्शन, अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि, या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

Private tours and travel companies join ST