CSMT Sawant Wadi Road Express लवकरच होणार सुरू

CSMT Sawant Wadi Road Express : गणेशोत्सव तोंडावर असताना कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्या लाखो कोकणवासीय चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावर नवीन दैनिक रेल्वे सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती. नवीन रेल्वे सेवा गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या नावाने दररोज धावणार आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सुमारे ५१० किलोमीटर अंतरावरील या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच सणासुदीला गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या नव्या सेवेचा मोठा लाभ होईल. कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून पर्यटन उद्योगाला नवी चालना मिळेल. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठी सोय ठरणार आहे. वाढलेली प्रवासी क्षमता आणि सुधारलेली कनेक्टिव्हिटी यामुळे कोकणातील स्थानिक अर्थव्यवस्था आणि व्यवसायालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.

नव्या दैनिक एक्स्प्रेसचे प्रस्तावित थांबे :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

CSMT Sawant Wadi Road Express

कॅन्सरमुक्त कल्याणच्या संकल्पनेसाठी २ ऑगस्टला Kalyan Monsoon Run 2026

Kalyan Monsoon Run 2026 : कॅन्सरविषयी जनजागृती, वेळेत निदान आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत या उद्देशाने ICTC फाउंडेशन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका KDMC यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कल्याण मॉन्सून रन २०२६’ या भव्य मॅरेथॉनचे आयोजन २ ऑगस्ट २०२६ रोजी रिंग रोड, कल्याण पश्चिम येथे करण्यात आले आहे. ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा तीन अंतरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ICTC फाउंडेशन Indian Cancer Treatment Centre ही सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था असून, मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कॅन्सर केमो-डेकेअर साखळींपैकी एक आहे. ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित घाणेकर आणि टाटा मेमोरियल, एम्स दिल्ली तसेच GCRI येथील अनुभवी कॅन्सरतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे. रुग्णांना त्यांच्या शहरातच जागतिक दर्जाचे, परवडणारे आणि वेळेत कॅन्सर उपचार उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

‘कॅन्सरमुक्त कल्याण’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून कॅन्सर प्रतिबंध, लवकर निदान आणि वेळेवर उपचार याविषयी जनजागृती केली जाणार आहे. आज कॅन्सरचे उपचार अधिक प्रगत झाले असले तरी अनेक रुग्ण जागरूकतेअभावी उशिरा उपचारासाठी पोहोचतात. त्यामुळे वेळेवर उपचार पूर्ण होणे हेच उत्तम परिणामांचे गमक असल्याचा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

या मॅरेथॉनमधून जमा होणारा निधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक धावपटू स्वतःच्या आरोग्यासाठी धावणारच नाही, तर एका गरजू कॅन्सर रुग्णाला उपचाराची आशाही देणार आहे.

स्पर्धेत नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला फिनिशर मेडल, सहभाग प्रमाणपत्र, अधिकृत टी-शर्ट, गुडी बॅग, अल्पोपहार व रिफ्रेशमेंट्स, तसेच विविध मनोरंजक उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ५ किमी आणि १० किमी स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ७०२१७९५६०८ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा https://ictconco.org अथवा www.indiarunning.com वर ऑनलाइन नोंदणी करावी. आयोजकांनी नागरिकांना आपल्या मित्र-परिवारासह सहभागी होऊन ‘कॅन्सरमुक्त कल्याण’ या जनआंदोलनाचा भाग बनण्याचे आवाहन केले आहे.

Kalyan Monsoon Run 2026

कल्याण पूर्व भागात मनसे आणि मनविसेतर्फे भव्य वह्यावाटप; शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्व परिसरात एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत परिसरातील असंख्य गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या पहिल्या टप्प्यातच शेकडो विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले असून, आगामी काळात पुढील टप्पे राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे आणि मनविसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने मनसे विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे, मनविसे कल्याण शहर अध्यक्ष अंकुश राजपूत, उपशहर अध्यक्ष स्वप्निल पंडित आणि शाखा अध्यक्ष विजय जाधव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या शैक्षणिक भूमिकेला अनुसरून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. कल्याण पूर्व भागातील एकही गरजू विद्यार्थी वह्या किंवा शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज केवळ पहिला टप्पा पूर्ण झाला असून, पुढील टप्प्यात आणखी विद्यार्थ्यांना मदत पोहोचवली जाईल.”​ या उपक्रमाबद्दल कल्याण पूर्व भागातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मनसे व मनविसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Grand notebook distribution by MNS and MNVS in the Kalyan East area.

Kalyan Dombivli Double Decker Metro Pattern; ​खाली रस्ता, मध्ये उड्डाणपूल आणि वर मेट्रो

​Kalyan Metro : कल्याण-डोंबिवली शहरांतील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी एमएमआरडीएने आता कंबर कसली आहे. शहरातील सर्व नियोजित मेट्रो मार्गिका आता ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वात खालच्या स्तरावर रस्ता, मधल्या स्तरावर फ्लायओव्हर आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम प्राप्त होणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या एमएमआरडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, लवकरच याचा अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये कल्याण आणि आसपासच्या परिसरातील प्रमुख मेट्रो आणि रस्ते मार्गांचा समावेश आहे.

मेट्रो १२ (कल्याण-तळोजा), मेट्रो १४ (कांजूरमार्ग-बदलापूर), मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो ५-अ (कल्याण-उल्हासनगर-चिखलोली). शिळफाटा-रांजणोली उन्नत मार्ग आणि वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग. आदींचा यात समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गिकांचे आणखी उप-टप्प्यांत विस्तारीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. यात ​मेट्रो ५-ब चिखलोली ते बदलापूर, ​मेट्रो ५-क दुर्गाडी ते टिटवाळा, ​मेट्रो १२-ब शिळफाटा ते कळवा-मुंब्रा मार्गे ठाणे आदींचा समावेश आहे.

​अंबरनाथ-उल्हासनगरला मोठा दिलासा :

मेट्रो ५-अ ही मार्गिका दुर्गाडी नाक्यावरून कल्याण शहरामार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर रस्त्याने थेट चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे अत्यंत सुलभ आणि जलद होणार आहे.

​कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या ‘डबल डेकर’ पॅटर्नमुळे जागेची बचत होईलच, पण एकाच वेळी रस्ते आणि मेट्रो वाहतूक सक्षम झाल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

Kalyan Dombivli Double Decker Metro Pattern

शिंगणवाडीचा ‘चंद्रा’; कल्याणमध्ये तेजोमय

बीड जिल्ह्यातील शिंगणवाडी गाव. चहुबाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेलं हे छोटंसे खेडं. ५ मार्च १९८७ ची ती पहाट होती. मच्छिंद्र सोनावळे यांच्या घरात एका बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले गेले—चंद्रसेन. पण कोणाला ठाऊक होतं की, हा ‘चंद्रा’ एक दिवस हजारो लोकांच्या आयुष्यातला अंधार दूर करणारा ‘तेजोमय प्रकाश’ ठरेल?

२००५ सालचे ते दिवस. रखरखतं ऊन आणि समोर पसरलेली उसाची शेतं. तरुण चंद्रसेनच्या हातात कोयता होता आणि डोक्याला फडका बांधलेला.
“चंद्रा, हात आवर लवकर! गाडी भरायची आहे,” थकून गेलेल्या मच्छिंद्र सोनावळे यांनी आपल्या मुलाला साद घातली.
चंद्रसेनने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, “बाबा, आयुष्यभर आपण हेच करणार का? रक्ताचं पाणी करूनही पदरात फक्त ऊसतोडणीच राहणार का?”
वडील सुस्कारा सोडून म्हणाले, “आपलं नशीब हेच आहे रे बाळा.”
पण चंद्रसेनचे डोळे शिंगणवाडीच्या डोंगरांपलीकडे काहीतरी शोधत होते. त्याने मनोमन ठरवलं होतं, नशिबाला साकडं घालण्यापेक्षा कष्टाने नशीब बदलायचं.

२००७ मध्ये त्याने आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून मुंबईच्या दिशेने पाऊल टाकले. खिशात काही रुपये आणि डोळ्यात अफाट जिद्द घेऊन तो कल्याण नगरीत उतरला. कल्याणमधील सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. कधी बिगारी काम, कधी भिंतींना रंग देणारा पेंटर, तर कधी टेम्पो ड्रायव्हर.

एकदा एका चहाच्या टपरीवर चंद्रसेनचा मित्र त्याला म्हणाला, “अरे चंद्रा, एवढं कष्ट करून काय मिळणार? गावाकडे जाऊन शेतीच केलेली बरी.”
चंद्रसेन हसून म्हणाला, “मित्रा, ज्या हातांनी ऊस तोडलाय ना, ते हात आता स्वतःचं नशीब लिहायला शिकलेत. थांब जरा, अजून तर ही सुरुवात आहे!”हळूहळू मेहनतीच्या जोरावर चंद्रसेनने ट्रॅव्हल्स व्यवसायात जम बसवला. पण त्याचं मन फक्त स्वतःच्या प्रगतीत रमत नव्हतं. २०१५ मध्ये चंद्रसेनने ‘श्री शिवसाई प्रतिष्ठान’ची स्थापना केली. एके दिवशी एका महिलेने त्यांना अडवले आणि विचारले, “भाऊ, आम्हा बायकांसाठी काही काम मिळेल का? घर खर्च भागवणे कठीण झालंय.”
चंद्रसेनने त्याच क्षणी ठरवलं. त्यांनी २० महिला बचत गट सुरू केले.
“ताई, आता तुम्ही फक्त चूल आणि मूल यात अडकून राहू नका. लघुउद्योग सुरू करा, मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे,” हा त्यांचा शब्द शेकडो महिलांना उद्योजिका बनवून गेला. २०२० मध्ये जेव्हा जग थांबलं होतं, तेव्हा त्याने ‘आर. पी. सिक्युरिटी सर्व्हिसेस’च्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार दिला. तो आता फक्त ‘चंद्रा’ उरला नव्हता, तो अनेकांचा आधारवड झाला होता.

पण खऱ्या सेवेची ओढ त्यांना आरोग्य क्षेत्रात खेचून नेत होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी रुग्णसेवेचे व्रत घेतले. गुरुवर्य मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी स्वीकारली. आज कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयात मोठी गर्दी असते. तिथे चंद्रसेन सोनावळे लोकांच्या फाईल्स तपासताना दिसतात.
एका वृद्ध आजोबांनी विचारले, “साहेब, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, पण पैसे नाहीत. काय करू?”
चंद्रसेननी प्रेमाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “बाबा, पैशाची काळजी तुम्ही करू नका. ही फाईल माझ्याकडे द्या. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल तुमची. मुख्यमंत्री सहायता निधी आहे ना आपल्याकडे!”
अशाच प्रकारे त्यांनी ४०० पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि २५० हून अधिक अँजिओग्राफी/अँजिओप्लास्टी मोफत करून दिल्या. दररोज ८० ते ९० रुग्ण गायकवाड यांच्या मार्फत त्यांच्याकडे आशेने येतात आणि समाधानाने परत जातात.

आज चंद्रसेन सोनावळे यांच्याकडे स्वतःची कार आहे, घर आहे, मानसन्मान आहे. पण आजही जेव्हा ते आपल्या गावी शिंगणवाडीला जातात, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवरच असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आरोग्यदूत मंगेश चिवटे,जनसेवक महेश दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार संतोष दिवाडकर यांनी त्यांना विचारले, “चंद्रसेनजी, आता तुमचं पुढचं ध्येय काय?”
चंद्रसेन नम्रपणे म्हणाले, “येणाऱ्या काळात एकच संकल्प आहे—कोणाचेही आयुष्य केवळ उपचारांविना थांबू नये. जोपर्यंत प्रत्येक गरजूला मदत मिळत नाही, तोपर्यंत हा चंद्रसेन विश्रांती घेणार नाही.”
एका ऊसतोड मजुराचा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणा बनला आहे. शिंगणवाडीचा हा ‘चंद्रा’ खरोखरच तेजोमय झाला आहे!

  • लेखन : संतोष दिवाडकर 8767948054

‘Chandra’ of Shinganwadi

गाडीच्या धडकेत श्वान ठार! आईच्या मृतदेहाजवळ पिल्लांच्या घिरट्या

कल्याण : संपूर्ण महाराष्ट्र शिवजयंतीच्या उत्साहात न्हाऊन निघालेला असतानाच, कल्याण पूर्वेतील गोपाळ कृष्ण नगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, आपली आई रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे हे न समजणाऱ्या तिच्या लहान पिल्लांनी मृत आईचेच दूध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या दृश्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

​सदर श्वान ही मादी होती आणि तिला काही लहान पिल्ले होती. आपली आई आता जिवंत नाही याची पुसटशी कल्पनाही नसलेली ही पिल्ले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती आणि भुकेपोटी तिचे दूध प्राशन करत होती. हे दृश्य पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे डोळे पाणावले. सकाळी उजेड असतानाही हा अपघात झाला की मुद्दामहून श्वानाला चिरडले गेले, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.

​घटनेची माहिती मिळताच परिसरातील श्वानप्रेमी ओमकार चासकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेशी संपर्क साधून मृत श्वानाचा देह त्यांच्या स्वाधीन केला. तसेच, उघड्यावर पडलेल्या त्या पोरक्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी एका पशुसंवर्धन संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेमार्फत आता या पिल्लांचे संगोपन केले जाणार आहे.

कारवाईची मागणी :

सदर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. एकिकडे आपण उत्सवाचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे अशा अमानुष घटना घडणे हे निंदनीय आहे. त्या मुक्या जिवाचा जीव घेणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Dog killed in car crash in Kalyan