उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले जाते. मात्र हे पाणी उचलण्यापुर्वीच या नदीत सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले गेले आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण नदी विषारी जलपर्णीने व्यापून गेली आहे. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेते आणि दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. या नदी साठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. ठोस उपाययोजना राबवली जावी याकरिता नितीन निकम आणि काही समाजसेवक धरणे आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी भेटी दिल्या तर अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.
उल्हास नदी साठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली. उल्हासनदी साठी आश्वासन दिलं जातात परंतु होत काहीच नाही. या नदीसाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुटणारा नाही. पर्यावरण, जलसंधारण आणि प्रदूषण या तिन्ही विभागांनी मिळून ठोस उपाययोजना राबवायला हवी. अन्यथा लाखो लोकांचे आरोग्य धोक्यातच जाणार असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नितीन निकम आणि काही समाजसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी मनसे कडून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे