कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरातल्या रेती बंदर रोडला भद्रनिसा चाळीत राहणारे अमीर बुडान शेख (५७) यांनी मंगळवारी लुटमारी संदर्भात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका भाड्यावर गेले असताना भुरळ घालून त्यांना प्रवाशांनी पेढा खायला दिला. आणि गुंगी येताच लुटारूनी आपला दावा साधला.
अमीर शेख हे शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एम एच ०५/डी झेड/ २६१८ क्रमांकाची त्यांची रिक्षा घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी डेपो समोर प्रवासी भाडे घेण्यासाठी थांबले होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी रिक्षास हात दाखवून त्यांना वालधुनी येथिल रेल्वे हॉस्पीटल येथे जायाचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर शेख यांनी ७० रूपये भाडे होईल असे सांगितले. हे दोघेजण रिक्षात बसले. वालधुनी दिशेकडे जात असताना त्या इसमांनीअमीर यांना उल्हासनगर येथे जाण्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी उल्हासनगरच्या सेंटल हॉस्पीटल येथे नेले. त्यातील एका प्रवाश्याने अमीर यांना पत्नीस भेटून येतो असे, असे सांगून रिक्षातून उतरून तो इसम निघून गेला. पुन्हा काहीवेळात पुन्हा रिक्षाजवळ आला असता त्याच्या हातात असलेला पेढ्यांचा बॉक्स पुढे करून मला मुलगा झाला आहे असे बोलून अमीर यांना पेढा खाण्यास दिला. आनंदाच्या भरात अमीर यांनी त्यातला पेढा खाल्ला.

त्यानंतर त्या अनोळखी इसमांनी मावशीला भेटण्याकरीता उल्हासनगरच्या खेमाणी येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी त्यांची रिक्षा खेमाणी येथे नेली. त्यातील एक इसम उतरून काहीवेळाने परत रिक्षात आला आणि अमीर यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे सोडण्यास सांगितले. रिक्षा चालवत असताना अमीर शेख यांना थोडे अंधुक दिसू लागले. चालकाला गुंगी आल्याचे रिक्षातील लुटारू प्रवाश्यांना हेरले. त्यांनी अमीर यांना वालधुनी जकात नाक्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितले आणि घात केला.
लुटारूंनी आपल्याकडील मोबाईल, घड्याळ आणि काही रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध केल्यानंतर ठोसा-बुक्क्याने मारहाण करून रिक्षासह बिर्ला कॉलेजसमोर सोडून पळ काढल्याचे या वयोवृद्ध रिक्षावाल्याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान कोरोना काळात लुटीच्या सर्रास घटना वाढू लागल्या आहेत .या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील फरार लुटारूंनी हुडकून काढण्याची जबाबदारी सपोनि देविदास ढोले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
-रोशन उबाळे
