गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडे केली असून त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.
याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की कोकणातील बहुतांश रहिवासी नोकरी व्यवसायानिमित्त दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा-खोपोली राहतात. दरवर्षी सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आपआपल्या मुळ गावी जाऊन पारंपारीक पद्धतीने सण साजरा करतात. गेल्या दिड वर्षापासून कोविडचे संकट सुरु आहे. त्यामुळे पहिला लॉकडाऊन सुरु लागल्यापासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वरदान ठरणारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर व दिव्याला थांबा असणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या बंद करण्यात आलेल्या असून अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. आता गणेशोत्सवानिमित्त रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये दिवा जंक्शनमधून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणकर संभ्रमात पडले आहेत.

कोविडची तिसरी लाट गृहीत धरुन शासनाकडून रेल्वे प्रवासालाही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सद्यस्थिती पाहता बहुतांश जणांना दोन डोस नाहीच पण एकही डोस अजून पर्यंत मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये दिवा ते अगदी खोपोली, कसारा पर्यत राहणाऱ्या कोकणकरांना गावी जाण्यासाठी ठाणे, दादर, सीएसएमटी किंवा पश्चिम रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होणार आहेत.
त्यामुळे कोकणात जाण्यासाठी जवळपास रेल्वे सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तरी रेल्वेने याची तातडीने दखल घेऊन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे ठरणाऱ्या दिवा जंक्शनवरुन दिवा-सावंतवाडी व दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह जास्तीत जास्त गणेशोत्सव स्पेशल ट्रेन सोडून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
-कुणाल म्हात्रे
