आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार ई प्रभाग सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व, देसलेपाडा येथील विकासक विकास राठोड, जागा मालक अशोक म्हात्रे यांचे तळ अधिक ३ मजली चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. या बांधकाम धारकास यापूर्वी ते बांधकाम निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी आणि १ पोकलेन, ४ कॉम्प्रेसर व २ ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे ग प्रभागातही सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील टावरेपाडा, नांदीवली येथे चालू असलेले अक्षय सोलकर यांच्या तळ अधिक ७ मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. हि कारवाई सहा.आयुक्त भरत पाटील यांच्यासह संयुक्त रित्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच ४ कॉम्प्रेसर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

आय प्रभागातही विभागीय उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे आडीवली-ढोकळी गावठाण येथील विकासक जगदंब सिंग राणा यांच्या तळ अधिक ४ मजली अनधिकृत इमारतीवर, सहा. आयुक्त, आय प्रभाग राजेश सावंत यांनी निष्कासनाची कारवाई केली. हि कारवाई ४ ब्रेकर, १ जेसीबी, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात आली. यासमयी आय प्रभाग अधिक्षक किशोर खुताडे, ड प्रभाग सहा आयुक्त सविता हिले, क प्रभाग सहा आयुक्त संजय साबळे, अधिक्षक सुखदेव धापोडकर, मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
-कुणाल म्हात्रे
