टिटवाळा : मांडा टिटवाळ्याच्या पश्चिम भागांत असणाऱ्या माऊली कृपा सोसायटीत मांडूळ जातीचा दुर्मिळ साप आढळून आल्याने त्याला पाहण्यासाठी परिसरात एकच गर्दी उसळली होती. या सापाला देश विदेशात प्रचंड मागणी आहे. या सापाची कोट्यवधी रुपयांना बेकायदेशीरपणे तस्करी केली जाते. या सापामुळे अनेक दुर्धर आजार बरे होतात असा समाज आहे. तसेच मंत्र तंत्राचा वापर करून पैशांचा पाऊस या सापाच्या आधारे पाडता येतो अशी देखील अंधश्रद्धा समाजात आहे.
अनेकदा अंधश्रद्धेतून या मुक्या प्राण्याचा हकनाक बळी दिला जातो. मात्र, याच दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाचे वॉर या प्राणी मित्र संस्थेचे सदस्य सर्पमित्र निखील कांबळे यांनी प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले आहे.
मांडा टिटवाळ्याच्या पश्चिम भागांतील माऊली कृपा सोसायटीत स्थानिक नागरिकांकडून साप आढळून आल्याची माहिती मिळताच सर्पमित्र यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि सापाला सुरक्षितपणे हाताळून ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना या सापाविषयी माहिती देत त्या विषयी समाजात चुकीच्या पसरवण्यात आलेल्या अंधश्रद्धा याबाबत माहिती दिली व वनविभागाच्या ताब्यात या सापाला दिले.
-कुणाल म्हात्रे