कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. एकीकडे दिवाळीचा सण समोर असताना, कामगारांना पगार मिळत नसल्याने कामगार त्रस्त झाले आहेत. याविषयी मनसेने केडीएमसी परिवहन विभागाचे व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळाला नाही, तर मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागात बसेसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ५० कामगार नियुक्त केले आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून हे कंत्राट ‘जय भवानी’ या संस्थेला देण्यात आले आहे. या कंत्राटी कामगारांना परिवहन आगारामध्ये सोयी सुविधा देखील मिळत नाही अशी ओरड आहे. त्यांना चेंजिंग रूम नसून काम करतांना काही लागल्यास अथवा एखादा अपघात झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी प्रथमोपचार सुविधा देखील नाही. यामुळे जीव मुठीत धरून हे कामगार काम करत आहेत. असे असतांना देखील या कामगारांच्या ठेकेदाराने या कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. यामुळे ऐन दिवाळीच्या सणावर त्यांच्यावर संक्रात कोसळली आहे.
हि बाब मनसे शहर संघटक भोईर यांना समजताच त्यांनी परिवहनचे मुख्य कार्यालय गाठत परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांना याबाबत जाब विचारला. यामध्ये ठेकेदाराला कामगारांचा थकीत पगार त्वरित देत एक महिन्याचा पगार अग्रिम देण्याची मागणी केली. तसेच कामगारांना वेठीस धरणाऱ्या या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रकरणी परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत म्हणाले की, कामगारांना त्यांचे पगार देण्याची जवाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराचे बिल पालिका अदा करणार असून कामगारांना दिवाळीपूर्वी त्यांचे पगार दिले जातील असे आश्वासन दीपक सावंत यांनी दिले आहे.
-कुणाल म्हात्रे