कल्याण : लेखी आश्वासनानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता न बनविल्याने स्थानिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हारळगाव थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम कांबा पावशे पाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिकांनी २९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय उपोषण करत आंदोलन केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता २० ऑक्टोंबर पर्यंत बनविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी आश्वासन देऊन देखील रस्त्याचे काम सुरु न झाल्याने येथील स्थानिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे.
कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळ ते ताबोर आश्रम पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी रोज अपघात होत असतात, स्थानिकानी सतत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तरीही कोणती ही कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव, महेश देशमुख, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, विशाल मोहपे, योगेश देशमुख, लक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफ़ाक शेख, प्रवीण नागरे, दत्तू सांगळे, दिलीप भोईर, जगन्नाथ शेट्टी, रमेश गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वी आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी २० ऑक्टोंबर पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वसन दिले होते.
मात्र अद्यापही या रस्त्याचे काम सुरु न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून धुळीचे देखील साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत देखील वाढले आहे. त्यामुळे आता रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरु ठेवणार असून लेखी आश्वसनाची पूर्तता न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी सांगितले.
तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून कामासाठी ठेकेदार देखील नेमण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काम सुरु झाले नसून येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होईल असे त्यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे