आंबिवली :- मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर झालेल्या तोडक कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक उपायुक्ताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मोहने परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या माहितीनुसार निष्कासन कारवाई मोहीम हाती घेण्यात आली होती. याच मोहिमे दरम्यान एक कारवाई करून अधिकारी ‘अ’ प्रभाग कार्यालयात आले. त्यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मुकुंद कोट आपल्या सोबत १५ ते २० जणांचा सोबत ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील सावंत यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कार्यालयात शिरले.
यावेळी मुकुंद कोट यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या माजी नगरसेवकाने सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत यांच्या कानशिलात लगावली. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त अर्चना दिवे यांच्या समोर सहाय्यक उपायुक्तांना मुकुंद कोट या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याने कल्याण डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मुकुंद कोट यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा कोट देखील उपस्थित होता.
एकिकडे बेकायदेशीर बांधकामे कुठलेही परवानगी न घेता करायची आणि तोडकाम केल्यावर दादागिरी करून मारहाण करायची. असे म्हणत अधिकारी वर्गात संताप पसरला आहे. गुरुवारी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध पालिका अधिकारी वर्गाकडून करण्यात येणार आहे.
याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात मुकुंद कोट आणि पंधरा ते वीस जणांवर
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे अशापद्धतीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.
-रोशन उबाळे