कल्याण :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व आकड्यांचे रेकॉर्ड्स मोडले होते. यात मृत्युदर देखील मोठ्या प्रमाणावर होता. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पूर्णतः आटोक्यात आलेला असून तुरळक रुग्ण आढळत आहेत.
क.डों.म.पा. च्या २२ नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार सोमवारी १५ नवे रुग्ण एका दिवसात नोंदवले गेले आहेत. यातील ५ रुग्ण कल्याण पश्चिम, ३ रुग्ण डोंबिवली पूर्व, ३ रुग्ण मोहने, तर प्रत्येकी २ रुग्ण डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील आहेत. तर या दिवशी २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकही मृत्यूची नोंद नसणे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. शेवटच्या आलेल्या अपडेटनुसार सध्या महापालिका क्षेत्रात फक्त २५१ रुग्ण हे पोजिटिव्ह असून ते उपचार घेत आहेत.
महापालिका क्षेत्रात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. दररोज हजारो लोकांचे लसीकरण महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोना कमी झाल्याने सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. याचबरोबर रस्त्यावर फिरताना अथवा गर्दीतून जाताना मास्क घालणे बंधनकारक असतानाही बरेच लोक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. कोरोना कमी झाला असून तो अजून संपलेला नसून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. तसेच लसीकरण करून घेण्याचेही आवाहन वारंवार पालिका प्रशासनाकडून केले जात आहे.
-संतोष दिवाडकर